Headlines

Fatherhood: मूल माणसाचे वडील असते! – adaptive changes occur in father brain and body as he shoulders responsibilities of parenthood


-डॉ. आनंद जोशी

मूल हे माणसाचे वडील असते’ ही कवी विल्यम वर्डस्वर्थ यांची गाजलेली काव्यपंक्ती केवळ साहित्यिक कल्पना नसून, त्याला आता भक्कम वैज्ञानिक आधार मिळाल्याचे सिद्ध झाले आहे. सामान्यतः नऊ महिने बाळ गर्भाशयात वाढवल्यानंतर आई त्याला जन्म देते आणि या काळात तिच्या मेंदूत तसेच शरीरात जैविक बदल होतात, हे सर्वश्रुत आहे. परंतु, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, पालकत्वाची जबाबदारी पेलत असताना आईप्रमाणेच वडिलांच्या मेंदूत आणि शरीरातही अनेक अनुकूलनीय बदल ( Adaptive Changes ) घडून येतात.

मेंदूचे शिल्पकार

पालकत्व म्हणजे केवळ मूलाचे संगोपन करणे नव्हे. त्याचा प्रभाव तळ्यात टाकलेल्या खड्याप्रमाणे कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर सतत रुंदावत जातो. पालकत्वामुळे सुरुवातीला रात्रीची जागरणे, बाळाचे रडणे, आजारपण यांमुळे शारीरिक आणि मानसिक ताण-तणाव वाढतात. माता-पित्याच्या जीवनशैलीवर याचा थेट परिणाम होतो. तरीही मेंदूतील हे बदल अखेर त्यांच्या फायद्याचे आणि ‘न्युरोप्रोटेक्टिव्ह’ (मेंदूचे संरक्षण करणारे) ठरतात.

मेंदूच्या या घडामोडींमध्ये ‘न्युरोप्लास्टीसिटी’ म्हणजेच चेतापेशींच्या जाळ्याची लवचीकता महत्त्वाची भूमिका बजावते. युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियाच्या प्राध्यापिका डार्बी सॅक्सबी (Darby Saxbe) आणि त्यांच्या चमूने पहिल्यांदाच वडील होणाऱ्या ४० पुरुषांच्या मेंदूचे स्कॅनिंग बाळाच्या जन्माआधी आणि जन्मानंतर केले. या संशोधनात एक ठळक फरक समोर आला. बाळाच्या जन्मानंतर पित्याच्या मेंदूतील ‘कॉर्टेक्स’ भागातील विशिष्ट चेतापेशींच्या (Neurons) जाळ्याचे आकारमान कमी झाले होते. हा भाग इतरांचे विचार, हेतू आणि भावना ओळखण्याचे काम करतो. हे आकारमान कमी झाल्यामुळे पुरुषांचे स्वतःवरील आणि बाहेरील जगावरील लक्ष थोडे कमी होऊन ते बाळावर केंद्रित होते. यामुळे मुलामध्ये भावनिक गुंतवणूक वाढते, वडील बाळासाठी जास्त वेळ देतात, आपुलकीचा बंध घट्ट होतो आणि पालकत्वाचा आनंद वाढतो. या सकारात्मक बदलांनाच ‘अनुकूलनीय बदल’ (Adaptive Changes) म्हटले जाते.

तसेच २०२३ च्या एका संशोधनानुसार, काही पुरुषांमध्ये ‘हिपोकँपस’ या स्मृती केंद्राचे आकारमान वाढलेले आढळले. ज्या वडिलांच्या मेंदूत असा बदल झाला, त्यांचे मूलाशी असलेले नाते अधिक दृढ होते. ते मूलाशी अतिशय मायाळू वर्तणूक ठेवतात आणि त्यांना पालकत्वाचा ताण जाणवत नाही.

बाळाच्या जन्मानंतर…

बाळाच्या जन्मानंतर पाचपैकी एका आईला आणि १० पैकी एका पित्याला ‘पोस्ट पार्टम डिप्रेशन’ (प्रसूतीनंतरचे नैराश्य) या समस्येला सामोरे जावे लागते. पालकत्व जितके अर्थपूर्ण आणि आनंददायी असते, तितकेच ते कधीकधी थकवणारे आणि ताण देणारे ठरू शकते. मात्र, दीर्घकाळात हेच पालकत्व मेंदूसाठी वरदान ठरते.

ब्रिटनमधील ‘बायो बँक’मधील १९,००० महिला आणि १७,००० पुरुषांच्या विदाचे (Data) २०२५ मध्ये विश्लेषण करण्यात आले. या विश्लेषणातून असे स्पष्ट झाले, की ज्या पालकांना जास्त मुले होती, त्यांच्या मेंदूतील कार्यक्षम जोडण्या (Functional Connections) वयानुसार होणाऱ्या झिजेशी यशस्वीरीत्या लढा देत होत्या. सोप्या भाषेत सांगायचे तर, ज्या पालकांना जास्त मूले आहेत, त्यांचे मेंदू वाढत्या वयातही अधिक तरुण आणि कार्यक्षम राहतात. यालाच वैज्ञानिक भाषेत ‘न्युरोप्रोटेक्शन’ (मेंदूचे संरक्षण) म्हणतात.

प्रेमळ नात्याच्या मेंदूतील जोडण्या

जर्मनीतील युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमधील संशोधक नगिन दानेशानिया ( Negin Daneshnia ) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी २५ पित्यांच्या मेंदूचे बाळाच्या जन्मापासून २४ आठवडे सातत्याने स्कॅनिंग केले. या अभ्यासातून आढळले, की बाळाच्या जन्मानंतरच्या पहिल्याच आठवड्यात वडिलांच्या मेंदूतील माहितीच्या देवाणघेवाणीचे मार्ग बदलू लागतात. उच्च बोधात्मक आणि भावनिक केंद्रांमधील संवाद वेगाने वाढतो. इतरांच्या भावना समजून घेणे (Empathy – सह-अनुभूती) आणि सामाजिक समाधान अनुभवणे या दिशेने मेंदूचे पुनर्घटन होते, ज्यामुळे पित्याचे वर्तन अधिक संवेदनशील बनते.

अशाच प्रकारचे संशोधन अमेरिकेतील एमोरी विद्यापीठाचे प्रा. जेम्स रिलिंग ( James Rilling ) यांनी ५१ भावी पित्यांवर केले. त्यांनी पुरुषांना नवजात बालकांचे फोटो दाखवून मेंदूचे स्कॅनिंग केले. तेव्हा मेंदूतील आनंद, आदर आणि सह-अनुभूती जागृत करणारे भाग अधिक सक्रिय झाले आणि मेंदूत ‘डोपामाईन’ हे आनंद-रसायन मोठ्या प्रमाणावर स्रवले गेले.

हार्मोनल बदल

गरोदरपणात आणि बाळंतपणानंतर स्त्रीच्या शरीरात मोठ्या प्रमाणावर संप्रेरकांचे (Hormones) बदल होतात हे उघड आहे; परंतु पुरुष जेव्हा वडील होतो, तेव्हा त्याच्या शरीरातही जैविक पातळीवर लक्षणीय बदल होतात.

प्रा. रिलिंग यांच्या २०२५ च्या संशोधनानुसार, पुरुष वडील होणार हे समजल्यापासूनच त्याच्या शरीरातील ‘टेस्टोस्टेरॉन’ या पुरुषी संप्रेरकाची पातळी कमी होऊ लागते. यामुळे पुरुषांमधील आक्रमकता कमी होऊन ‘नरमाई’ येते आणि पितृत्वाची भावना बळावते. जे वडील प्रत्यक्ष बालसंगोपनात—जसे की बाळाला अंघोळ घालणे, सांभाळणे—सक्रिय सहभाग घेतात, त्यांच्यातील टेस्टोस्टेरॉनची पातळी अधिक प्रमाणात कमी होते. ही बाब पुरुषांच्या मेंदूजैवविज्ञानाची (Neurobiology) गतिशीलता दर्शवते.

स्त्रीच्या शरीरात स्तनपान काळात ‘प्रोलॅक्टिन’ वाढते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, बाळाच्या जन्मानंतर वडिलांच्या रक्तातही हे संप्रेरक थोड्या प्रमाणात वाढते, जे त्यांना पितृत्वासाठी मानसिकदृष्ट्या तयार करते.

त्याचप्रमाणे स्त्रीमध्ये गरोदरपणात ‘ऑक्सिटोसिन’ हे लव्ह-हार्मोन वाढते, ज्यामुळे तिची क्षमाशीलता आणि बाळाशी असलेले नाते दृढ होते. वडिलांमध्येही ऑक्सिटोसिन वाढते का, हे तपासण्यासाठी ३५ वडिलांवर एक ‘डबल ब्लाइंड’ चाचणी घेण्यात आली. या चाचणीत काहींना ऑक्सिटोसिन तर काहींना ‘प्लेसबो’ (उदासीन औषध) देण्यात आले. चाचणीच्या अखेरीस असे दिसून आले की, ज्या वडिलांचे बाळाशी घट्ट बंध निर्माण झाले होते आणि जे बाळासोबत जास्त वेळ घालवत होते, त्यांच्यात ऑक्सिटोसिनचे प्रमाण अधिक होते आणि त्यांनाच ऑक्सिटोसिन दिले गेले होते. यावरून निसर्गतःच वडिलांमध्ये ऑक्सिटोसिन वाढून मेंदूत सकारात्मक बदल घडून येतात, या मताला पुष्टी मिळाली.

थोडक्यात सांगायचे तर, पालकत्व ही केवळ सामाजिक किंवा कौटुंबिक जबाबदारी नसून ती आई-वडिलांच्या मेंदूची एक नैसर्गिक पुनर्रचना (Brain Remodeling) आहे. मूलाच्या आगमनाने पित्याच्या मेंदूत आणि शरीरात होणारे जैविक, भावनिक व रासायनिक बदल त्याला अधिक संवेदनशील, मायाळू आणि जबाबदार बनवतात. हे बदल वाढत्या वयात पालकांच्या मेंदूचे संरक्षण करण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य करतात.

(लेखक वैद्यकीय व्यावसायिक आहेत.)

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत