महाभारतात मयासुर नावाच्या दानवाने बांधलेल्या एका राजवाड्याचा उल्लेख आढळतो. खांडववनात लागलेल्या आगीपासून संरक्षण दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मयासुराने पांडवांसाठी इंद्रप्रस्थ नगरीमध्ये एक भव्य आणि अद्वितीय राजवाडा बांधला होता. त्याचा उल्लेख ‘मयसभा’ असा केला गेला आहे. मयासुर असुर होता आणि निष्णात वास्तुविशारद होता. त्याने या महालात येणाऱ्या पाहुण्यांच्या मनात संभ्रम निर्माण होईल अशा जागा खुबीने आणि मोठ्या कौशल्याने बनवल्या होत्या. त्यामुळे मयसभा बघायला आलेल्या दुर्योधनाची स्फटिकाच्या फरशीला पाण्याची जागा समजून आणि नंतर खऱ्या पाण्याला फरशी समजून त्यात पडल्यामुळे झालेली फजिती पुढे कुरुक्षेत्रावरील युद्धाला कारणीभूत ठरली होती.
आजही कुणी स्वतःच्या फायद्यासाठी लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करून त्यांना गोंधळवून टाकले की मयासुराची आठवण होते. शेअर मार्केटमध्ये अशा पुष्कळ घटना घडतात. कंपन्यांच्या शेअर्सचे भाव कृत्रिमरीत्या नियंत्रित करत छोट्या निवेशकांच्या मनात संभ्रम निर्माण करून त्यांना फसवून आपला गल्ला भरणारे मार्केटचे मयासुरच नाहीत का?.
गेल्या वर्षी जुलै महिन्यात सेबीने अमेरिकेतील जेन स्ट्रीट या एका खूप मोठ्या जागतिक ट्रेडिंग समूहावर कारवाई केली होती. सेबीने केलेल्या विश्लेषणाद्वारे असा निष्कर्ष काढला की जेन स्ट्रीटने जानेवारी २०२३ ते मार्च २०२५ या काळात अल्गोरिदम आणि हाय-फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग स्ट्रॅटेजी वापरत भारतीय शेअर बाजारात हेराफेरी करून जवळपास ४८०० कोटी रुपयांचा नफा कमावला. यासाठी बाजार बंद व्हायच्या काही मिनिटे आधी, मुख्यत्वेकरून ऑप्शन एक्सपायरीच्या दिवशी, त्यांच्या इंडेक्स ऑप्शन्समधील गुंतवणुकींना फायदा होण्यासाठी ठरावीक कंपन्यांच्या शेअर्सची खूप मोठ्या प्रमाणात खरेदी किंवा विक्री करून त्यांच्या आणि निफ्टी इंडेक्सच्या किमती प्रभावित केल्या. अर्थात, हे करायला लागणारे पैशांचे बळ जेन स्ट्रीटकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. त्यांनी या डावपेचांचा वापर वारंवार केल्यामुळे अर्थातच त्यांचे हे धोरण बाजारातील गैरवर्तनामध्ये समाविष्ट केले गेले. आता सेबीने केलेली कारवाई, त्याविरुद्ध जेन स्ट्रीटने दाखल केलेली याचिका वगैरे कोर्टातली लढाई पुढील काही वर्षे चालेल. पण यामुळे आपल्या शेअर बाजारातील महत्त्वाच्या त्रुटी नक्कीच प्रकाशात आल्या आहेत.
यामध्ये जेन स्ट्रीटसारख्या मुबलक साधनसंपत्ती असलेल्या समूहाला आर्थिक बळाचा वापर करून शेवटच्या काही मिनिटांत शेअर्सचे भाव त्यांना हवे तसे हलवता आले, ही शेअर्सची बाजार बंद होतानाची किंमत निश्चित करण्याच्या प्रक्रियेतील सहज जाणवण्याएवढी त्रुटी आहे. बाजार बंद होतानाची किंमत जर दिवसातल्या सगळ्यात शेवटी झालेल्या व्यवहारातली किंमतच ठेवली, तर बाजारात अफरातफरीची शक्यता वाढेल. म्हणून प्रत्येक कंपनीच्या शेअर्सच्या शेवटच्या अर्ध्या तासात होणाऱ्या व्यवहारांच्या किमतींची, प्रत्येक किमतीला किती शेअर्सची खरेदी-विक्री झाली हे लक्षात घेऊन, सरासरी काढली जाते. आणि हीच किंमत बाजार बंद होतानाची किंमत म्हणून प्रकाशित केली जाते. यालाच VWAP — व्हॉल्युम वेटेड अॅव्हरेज प्राइस — पद्धतीने काढलेली किंमत म्हणतात.
रोज हजारो कोटींची उलाढाल होत असलेल्या या शेअर बाजारात अनेक लहान-मोठे निवेशक आपले नशीब आजमावत असतात. यामध्ये कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतींवर प्रभाव पडणाऱ्या सगळ्या घटकांचा अभ्यास करून निर्णय घेणारे अभ्यासू निवेशक असतात; त्याप्रमाणेच बाजाराच्या व्यवस्थापनातील त्रुटी हेरून त्याचा आपल्या फायद्यासाठी उपयोग कसा करून घेता येईल, याचा सतत शोध घेणारे संधीसाधू गुंतवणूकदारसुद्धा असतात. यांचा ‘कायदा तिथे पळवाट’ या तत्त्वावर दृढ विश्वास असतो. जेन स्ट्रीटने VWAP पद्धतीतील त्रुटी हेरून असाच आपला फायदा करून घेतला असावा. त्यांच्या निरीक्षणाप्रमाणे त्यांना असे आढळून आले की VWAP पद्धतीने काढलेली किंमतसुद्धा आपल्याला हवी त्या दिशेला झुकवता येते, जर शेवटच्या काही मिनिटांत खूप मोठ्या रकमेचे व्यवहार त्यांना हव्या असलेल्या किमतीच्या दिशेने केले. ऑप्शन एक्सपायरीच्या दिवशी शेवटच्या काही मिनिटांत अशा प्रकारे झालेली किमतींमधील फेरफार लहान गुंतवणूकदारांचा तोटा होऊन जेन स्ट्रीटचा प्रचंड मोठ्या प्रमाणात फायदा व्हायला कारणीभूत ठरली.
सेबी नेहमीच लहान गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी झटत असते. त्यासाठी विविध प्रकारे बाजारात कशी सुधारणा करता येईल, याचा अभ्यास अखंडपणे चालू असतो. मोठ्या गुंतवणूकदारांना केवळ त्यांच्या क्षमतेमुळे ‘बळी तो कान पिळी’ होऊ न देता लहान गुंतवणूकदारांचे होऊ शकणारे शोषण रोखण्याचा सेबीचा प्रयत्न असतो. VWAP पद्धतीतल्या त्रुटी सेबीच्या लक्षात आल्या होत्याच आणि त्यावर काय उपाययोजना करता येईल, यावर संशोधनसुद्धा चालू होते. त्यामुळे केवळ जेन स्ट्रीट प्रकरणामुळे VWAP पद्धत बदलून दिवसअखेरीची शेअर्सची किंमत काढण्याची नवीन पद्धत अमलात आणली, असे म्हणता येणार नाही. पण त्यामुळे नक्कीच VWAP पद्धत बदलायच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले असावे.
३ ऑगस्टपासून सेबीने शेअर्सची दिवसअखेरीची किंमत ठरवण्यासाठी CAS — क्लोजिंग ऑक्शन सेशन — पद्धत अमलात आणली आहे. ही पद्धत दिवसाच्या सुरुवातीला ९ ते ९.१५ मध्ये होणाऱ्या ओपनिंग ऑक्शन सेशनवर आधारित आहे. यानुसार दिवसअखेरीची किंमत कोणत्याही सरासरीच्या आधारे न ठरवता, लिलावात कोणत्या किमतीला जास्तीत जास्त शेअर्सची खरेदी-विक्री होऊ शकेल ती किंमत दिवसअखेरीची किंमत म्हणून धरली जाईल. सुरुवातीला यामध्ये फक्त फ्युचर आणि ऑप्शन विभागात ट्रेडिंग होणाऱ्या कंपन्यांचाच समावेश केला गेला आहे. या CAS अंतर्गत दुपारी ३.१५ वाजता या कंपन्यांच्या शेअर्समधील खरेदी-विक्री पाच मिनिटांसाठी थांबवून पुढील २० मिनिटांची
विभागणी अशी केली जाईल:
३.१५ ते ३.२०: संक्रमण काळ — ३ ते ३.१५ या १५ मिनिटांमध्ये झालेल्या व्यवहारांमधून VWAP पद्धतीने काढलेली किंमत पुढील सेशनसाठी संदर्भ म्हणून धरली जाईल.
३.२० ते ३.३०: ऑर्डर देण्याचा काळ — या CAS सेशनमध्ये या संदर्भ किमतीच्या ३% पर्यंत जास्त किंवा कमी किमतीच्या ऑर्डर्स मार्केटमध्ये देता येतील.
३.२० ते ३.२५: लिलाव काळ I — मार्केट आणि लिमिट ऑर्डर्स देता येतील.
३.२५ ते ३.३०: लिलाव काळ II — फक्त लिमिट ऑर्डर्स देता येतील. ३.२८ ते ३.३० मध्ये कोणत्याही क्षणी पूर्वकल्पना न देता हे सेशन थांबवले जाईल, ज्यामुळे शेवटच्या क्षणी काही मोठ्या ऑर्डर्स देऊन कुणी किमतीवर प्रभाव पाडू शकणार नाही.
३.३० ते ३.३५: मॅचिंग आणि कन्फर्मेशन काळ — यामध्ये CAS सेशनमध्ये आलेल्या खरेदी आणि विक्रीच्या ऑर्डर्सवरून अशी किंमत निवडली जाते, ज्या किमतीला जास्तीत जास्त शेअर्सचा लिलाव यशस्वी होऊ शकतो. CAS सेशनमधील सगळे व्यवहार या एकाच किमतीला केले जातात आणि हीच किंमत दिवसअखेरीची किंमत म्हणून जाहीर केली जाते. यालाच संतुलित किंमत अर्थात इक्विलिब्रियम प्राइस म्हणतात.
अशा तऱ्हेने CAS मध्ये पारदर्शकपणे ज्या किमतीला जास्तीत जास्त व्यवहार व्हायची खात्री आहे, अशीच किंमत संतुलित किंमत म्हणून ठरवली जाते. VWAP बरोबर तुलना केली तर CAS प्रणाली खालील कारणांमुळे VWAP च्या तुलनेत सरस ठरते.
१. CAS मधून ठरवलेली किंमत जास्तीत जास्त शेअर्सची खरेदी-विक्री लिलावामध्ये ज्या किमतीला होऊ शकेल ती असते. त्यामुळे दिवसअखेरीच्या मोजक्या पण मोठ्या व्यवहारांवर आधारित किमतीपेक्षा ती जास्त प्रातिनिधिक स्वरूपाची वाटते.
२. पारदर्शक पद्धतीमुळे खरेदीदार आणि विक्रीदार त्यांना अपेक्षित खऱ्या किमतीच्या ऑर्डर्स लिलाव सत्रात टाकतात. या सगळ्या ऑर्डर्सची एकत्रितपणे जुळवणूक केल्याने केवळ मोठ्या संख्येच्या ऑर्डर्स देऊन CAS मध्ये निश्चित होणारी किंमत प्रभावित करता येत नाही.
३. म्युच्युअल फंडांना मोठे व्यवहार एकाच किमतीला एकाच फटक्यात करणे CAS मुळे शक्य होते. नाहीतर जास्त मोठ्या ऑर्डर्सना छोट्या-छोट्या तुकड्यांत विभागल्याने त्याचा किमतींवर विपरीत परिणाम होतो आणि खरेदीची सरासरी किंमत वाढते, तर विक्रीची सरासरी किंमत कमी होते.
४. इंडेक्स फंड आणि ETF ना दिवसअखेरीच्या प्रकाशित किमतीला व्यवहार करणे सोपे जाते. यामुळे त्यांना या किमतीबाबत अंदाज बांधून VWAP पद्धतीने शेवटच्या ३० मिनिटांत व्यवहार करत राहावे लागत नाही आणि त्यांच्या फंड योजनांचा परतावा त्या योजना ज्या इंडेक्सवर आधारित आहेत, त्यांच्या परताव्याएवढा टिकवून ठेवता येतो.
५. जगातल्या बहुतेक मोठ्या शेअर बाजारांनी आधीच CAS प्रणालीचा वापर सुरू केला आहे. आता भारतातील शेअर बाजारांनीसुद्धा CAS चा वापर सुरू केल्याने खऱ्या अर्थाने आपल्या शेअर बाजाराचे जागतिकीकरण झाले आहे. यामुळे मोठ्या जागतिक गुंतवणूकदारांचा भारताविषयी दृष्टिकोन सकारात्मक होईल.
३ ऑगस्टपासून CAS प्रणाली अमलात आली खरी. पण पहिल्या दोन दिवसांत CAS मध्ये संदर्भासाठी वापरलेली किंमत आणि अंतिम किंमत यामध्ये प्रचंड तफावत आढळून आली. त्यामुळे यात काही त्रुटी राहिल्या असून त्याचा फायदा कुणी किमती नियंत्रित करायला घेतला की काय, असा प्रश्न पडला. पण त्यानंतर CASद्वारा प्रकाशित किमती स्थिर झाल्याचे दिसते आहे. सेबीने ३ आणि ४ ऑगस्टला पार पडलेल्या CAS सेशन्सचे विश्लेषण करायला घेतले आहे. त्यातून काय निष्कर्ष निघतो ते पाहून, जर खरंच काही त्रुटी राहिल्या असतील तर त्यावर उपाययोजना करता येईल.
संतुलित किंमत काढण्याच्या क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या अल्गोरिदममुळे १००% छेडछाडविरोधी प्रणाली बनवणे कदाचित कठीण आणि वेळखाऊ असेल. पण VWAP च्या तुलनेत CASचे कवच हे नक्कीच लहान गुंतवणूकदारांचे हित जपण्यासाठी जास्त मजबूत आहे.
(लेखक अर्थतज्ज्ञ, गुंतवणूक मार्गदर्शक आणि बीएनपी पारिबा बँकेचे निवृत्त ट्रेझरर आहेत.)

