Headlines

मातृभाषा संस्कार आणि प्रेरणा देणारी शक्ती:डॉ. संजय जगताप यांचे शिवाजी महाविद्यालयात प्रतिपादन




सुप्रसिद्ध लेखक डॉ. संजय जगताप यांनी मातृभाषेला संस्कार आणि प्रेरणा देणारी शक्ती म्हटले आहे. श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी अभ्यास मंडळाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र मेटे होते, तर प्रा. डॉ. शोभा रोकडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. डॉ. जगताप यांनी आपल्या भाषणात मातृभाषेचे मानवी जीवनातील महत्त्व अधोरेखित केले. साहित्य, संस्कृती, संवेदनशीलता आणि जीवनदायी प्रेरणा यांचा उगम मातृभाषेच्या अनुभवविश्वातून होतो, असे त्यांनी सांगितले. संत ज्ञानेश्वरांपासून ते आधुनिक साहित्यिकांपर्यंत मराठी भाषेने समाजमन घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असेही त्यांनी नमूद केले. भाषा जिवंत ठेवणे ही केवळ शासन किंवा संस्थांची जबाबदारी नसून प्रत्येक मराठी भाषकाची ती सांस्कृतिक जबाबदारी आहे, असेही डॉ. जगताप यांनी स्पष्ट केले. प्रमुख अतिथी डॉ. शोभा रोकडे यांनी मराठी भाषा आणि साहित्य विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगितले. यावेळी विदर्भ साहित्य संघाच्या कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल प्राचार्य डॉ. शोभा रोकडे, डॉ. कुमार बोबडे आणि डॉ. राजेंद्र राऊत यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. राजेश मिरगे यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. मराठी विभागप्रमुख डॉ. सुवर्णा गाडगे यांनी प्रास्ताविकातून अभ्यास मंडळाच्या स्थापनेमागील भूमिका स्पष्ट केली. जनसंवाद विभागप्रमुख डॉ. कुमार बोबडे यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत