Headlines

सावकारी लुटीविरोधात स्वातंत्र्यदिनी आंदोलन:प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर अचलपुरात आज बैठक




अमरावती, अचलपूर येथील मानव हक्क संघटनेने सावकारी कर्जाच्या आडून आदिवासींची होणारी लूट थांबवण्यासाठी स्वातंत्र्यदिनी आंदोलन केले. अचलपूर उपविभागीय अधिकारी कार्यालयात राष्ट्रीय उत्सव सुरू असतानाच, त्याच परिसरात हे धरणे आंदोलन करण्यात आले. या लक्षवेधी आंदोलनाची दखल मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सत्यम गांधी यांनी घेतली. सीईओंच्या मध्यस्थीनंतर उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत तोडगा काढण्यात आला. त्यानुसार, १७ ऑगस्ट रोजी आंदोलनकर्त्यांसोबत तालुका प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत त्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करून योग्य ती उपाययोजना केली जाईल, असे प्रशासनाने सांगितले. आंदोलनादरम्यान, सावता नगर, वॉर्ड क्रमांक ८ मधील रहिवाशांवर घरकर लागू करणे, अचलपूर नगर परिषद आणि परतवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत अतिक्रमण मोहिमेत भेदभाव न करता समान कारवाई करणे, तसेच शासनाच्या अभय योजनेचा लाभ देण्यासाठी उपअधीक्षक भूमीअभिलेख कार्यालयाकडून झालेल्या कारवाईची लेखी माहिती देणे, आदी प्रमुख मागण्या करण्यात आल्या होत्या. यावेळी उपविभागीय अधिकारी अरखराव, नगर परिषदेचे मुख्याधिकारी मोहाड आणि उपअधीक्षक भूमीअभिलेख कार्यालयाच्या प्रतिनिधींनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. त्यांनी १७ ऑगस्ट रोजी शासनस्तरावर बैठक घेऊन सर्व प्रलंबित विषयांवर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. उपअधीक्षक भूमीअभिलेख कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी संघटनेला तसे लेखी पत्रही दिले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनांचा मान राखत मानव हक्क संघटनेने आपले धरणे आंदोलन तात्पुरते मागे घेतले आहे. मात्र, १७ ऑगस्टच्या बैठकीत मागण्या पूर्ण न झाल्यास, पुन्हा उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आणि उपोषण सुरू करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. यावेळी ॲड. पौर्णिमा उपाध्याय, ममताताई आहाके, रमाबाई बंगाले, महादेवराव हिवराळे, साजिदभाई, तुळशीराम धुर्वे, प्रकाश साबळे, मोबिनभाई, संतोष ठाकूर, राजू नवले, सुरेश खडसे, रामदास हिवराळे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत