Headlines

सराफी व्यावसायिकाचे ‘पितळ’ उघडे


स्वत:च्याच दुकानात मारला डल्ला, सीसीटीव्ही फुटेजवरून चोरीचा उलगडा

त. भा. प्रतिनिधी

बेळगाव : रामदेव गल्ली सराफी दुकानातील चोरी प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. दुकान मालकालाच या प्रकरणी पोलिसांनी अटक केली असून त्याच्याजवळून 65 लाख 95 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

कृष्णानंद विश्वनाथ वेर्णेकर (वय 71) राहणार सावरकर रोड, टिळकवाडी यांना अटक करण्यात आली आहे. रामदेव गल्ली येथे व्ही. पी. वेर्णेकर अॅण्ड सन्स या सराफी दुकानात चोरी झाल्याची माहिती कृष्णानंद यांनी शुक्रवारी सकाळी खडेबाजार पोलिसांना दिली होती. चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने व रोकड पळविल्याचे सांगत त्यांनी लेखी फिर्यादही दाखल केली होती.

खडेबाजारचे पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता दुकान मालकावरच संशय बळावल्याने त्याची चौकशी केली. त्यावेळी आपणच दागिने, रोकड दुचाकीच्या डिक्कीत काढून ठेवल्याची कबुली या सराफी व्यावसायिकाने दिली. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे.

उपलब्ध माहितीनुसार कृष्णानंद यांचे सराफी दुकान फोडण्याचा प्रयत्न झाला होता. हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी माहिती देण्याआधीच कृष्णानंद यांनी आपल्या दुकानात शिरून 62 लाख 60 हजार 990 रुपये किमतीचे 519.08 ग्रॅम सोने, 6 हजार रुपये किमतीची 31 ग्रॅम चांदी, 2 लाख 83 हजार 10 रुपये रोख रक्कम दुकानातून काढून

केए 22 ईडब्ल्यू 4822 क्रमांकाच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवली होती. त्यानंतर पोलिसांना बोलाविण्यात आले.

पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर, उपनिरीक्षक एस. आर. मुत्तत्ती, ए. बी. शेट्टी, संतोष बरगी, बी. एल. सर्वी, चन्नाप्पा तेली, आरती हेग्गण्णा, सुनील चव्हाण, सदाशिव हलगीमनी, प्रकाश मादर यांच्यासह ठसेतज्ञ व सोको पथकातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेजसंबंधी विचारणा केली असता दुकान बंद करताना आपण कॅमेरा बंद करतो, असे सराफी व्यावसायिकाने पोलिसांना सांगितले होते. शेवटी शेजारच्या दुकानावरील कॅमेऱ्यांचे फुटेज काढून पाहणी केली असता फिर्याददारानेच चोरी केल्याचा संशय बळावताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. शेवटी आपणच आपल्या दुकानातील दागिने काढून दुचाकीच्या डिक्कीत ठेवल्याची कबुली त्याने दिली आहे. खडेबाजार पोलिसांनी या प्रकरणी दुकान मालकालाच अटक केली आहे.

 



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत