Headlines

दीड-दमडी: …आणि श्री विठ्ठल परतले – deed damadi tambi durai special article on ashadi ekadashi wari 2026


– तंबी दुराई

देहू आणि आळंदीहून निघालेल्या पालख्या पुणे मुक्कामी एकाच दिवशी पोहोचल्या. ज्ञानेश्वर माउलींची व्यवस्था वेगळ्या मंदिरात आणि तुकोबांचा मुक्काम वेगळ्या संस्थानात. पुण्यातला मुक्काम संपला, की दोन्ही पालख्या पुन्हा वेगवेगळ्या रस्त्याने पंढरीच्या मार्गाला लागणार होत्या. अंतिम ध्येय जरी एकच असले तरी पालख्यांचे मार्ग वेगळे होते. पालख्या विसावल्या, वारकरी भाकर-तुकड्याला लागले आणि ज्ञानेश्वर माउलींना तुकोबांची आठवण झाली. तिकडे तुकारामही माउलींच्या आठवणीने बेचैन झाले होते. पालखीतून उतार होऊन दोघेही एका अनावर ओढीने एकमेकांकडे निघाले. उराउरी भेट झाली.

३०० वर्षांचा काळ ओलांडून दोघे समकाळी झाले. ज्ञानेश्वर माउलींनी कौतुकाने तुक्याची पाठ थोपटली आणि ते म्हणाले, ‘तुकोबा, काय रसाळ लिहिता तुम्ही! सामान्य माणसाला कळावं म्हणून मी मराठी सोपी केली. ती तुम्ही किती सहज करून टाकली, वा!’ माउलींचे चरणस्पर्श करीत तुकोबा म्हणाले, ‘महाराज, तुमच्या समाधीला ३०० वर्षे लोटल्यानंतर मी लिहू लागलो. विठ्ठलावर भरवसा ठेवून राबणाऱ्या कष्टकरी वर्गाला कळावं म्हणून मी जरा सोपं लिहिलं… परंतु आता असं वाटतं, ते इंद्रायणीतच बुडालं असतं, वर आलं नसतं, तर बरं झालं असतं!’ ज्ञानेश्वरांच्या सुकुमार चेहऱ्यावर सुहास्य पसरलं. तुकोबांकडे स्नेहाळ नजरेनं पाहात ते म्हणाले,

‘वर्तमानाचे प्रकाशे, पाहो जाता भूतकाळ,
कोणावरी कैचा आळ, उगा येवो लागे…
तुकोबा, वर्तमानाकडे पाहताना उगाचच भूतकाळ आठवू नका.’ तुकोबांनीही चेहऱ्यावर थोडे हास्य आणले आणि म्हणाले, ‘मागे एकदा माझा मुखवटा चोरीला गेला होता. आजूबाजूला जे काही घडत आहे ते पाहून चेहरा निर्विकार ठेवणे कठीण जात होते, तो लपवायला मुखवटा कामी यायचा. बहुतेक त्या चोरालाही माझ्या चेहऱ्यावरचे भाव बघवेना, म्हणून त्याने मुखवटा परत जागच्या जागी आणून ठेवून दिला.’ माउलींनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, ‘तुकोबा, तुम्हाला किमान दिसतं तरी आजूबाजूचं. मला तर केवळ भूमीला बसणारे हादरे जाणवतात. अजान वृक्षाची पानं आणि खोड जे काही मुळांना सांगतं, तेवढं मुळं माझ्या कानांवर घालतात म्हणून थोडंफार मला कळतं.’ तुकोबांनी ज्ञानेश्वरांना नमस्कार केला आणि म्हणाले, ‘आपण ज्ञानाचे ईश्वर आहात, विश्वाचे आर्त आपल्या मनी प्रकटते. मी संसारी माणूस आहे माउली. मला काळज्या, चिंता, दुःखं, उदासी… सगळ्या भावना आहेत.’ ज्ञानेश्वरांनी मायेने तुकोबांच्या खांद्याला स्पर्श केला आणि म्हणाले, ‘तुकोबा, काय झालंय? एवढी उदासी का आहे तुमच्या शब्दांत?’ माउलींच्या या शब्दांनी तुकोबाचे अंतःकरण भरून आले. चिपळ्यांचा खणखणाट करीत ते म्हणाले –

‘डोळियाच्या पाणी, मीठ ना राहिले
काय आता पामरे, द्यावे सागरासी’
मग चिपळ्यांच्या नादात आणि अभंगांच्या आशयात दोघेही बुडून गेले. अभंग संपताच दोघांनीही एकमुखाने विठ्ठलाचे नामस्मरण केले. मग तुकोबा ज्ञानेश्वर माउलींना म्हणाले, ‘असं वाटतं की, लिहिलेलं सगळं वाया गेलं. व्यासपीठावर पहिल्या रांगेत कोणी बसायचं यावरून अजूनही एकमेकांच्या जाती काढल्या जातात. मराठी भाषेची लढाई लढणारे, त्या आडून राजकारण करु लागले आहेत. साधू आणि भोंदू एक झाले आहेत…’ त्यांच्या मनावर आलेले मळभ ओळखून ज्ञानेश्वरांनी स्मित केले व म्हणाले, ‘हीच तर कसोटी आहे साहित्याची. तुमचे अभंग इंद्रायणीत बुडाले आणि पुन्हा वर आले याचा अर्थ अनेकांना कळत नाही! समाजकंटकांनी तुमच्या अभंगाचा धसका घेतला आणि ते नष्ट करण्याचा प्रयत्न केला; परंतु ते अभंग सामान्य माणसाच्या हृदयात आणि ओठांवर होते म्हणून काळावर मात करून जिवंत राहिले, असा त्याचा अर्थ होतो.

आजचं चित्र निराश करणारं असलं तरी शेवटी सामान्य माणूसच कधी तरी जागा होईल, आणि ज्याची त्याला जागा दाखवून देईल.’ यावर तुकोबा काही बोलणार होते; परंतु ज्ञानेश्वर म्हणाले, ‘तुकोबा, काळाच्या ओघात काय घडतं ते पाहावं, त्याचा त्रास करून घेऊ नये.’ होकारार्थी मान हलवत तुकोबा म्हणाले, ‘माउली तुम्ही म्हणताय ते खरं आहे; परंतु इतिहासाच्या उत्खननाचे हादरे अजून १७व्या शतकालाच बसत आहेत, तुमच्यापर्यंत; म्हणजे १३व्या शतकापर्यंत अजून खोदकामाची कुदळ पोहोचलेली नाही.

ज्ञानेश्वर म्हणाले, ‘तुकोबा, मी ज्ञानेश्वरीत म्हटलं होतं, लोह उभे खाय माती। ते परिसाचिये संगती। सोने जालया पुढती। न शिविजे मळे. लोखंड मातीत असेल तर ती माती त्याला खाऊन टाकते. पण त्याच लोखंडाचं परिसाच्या स्पर्शानं सोनं झालं तर कोणत्याही मातीचा त्याच्यावर काही परिणाम होत नाही. तुम्ही निराश होऊ नका. संतांच्या उपदेशाचा परिसस्पर्श होऊन सध्याच्या वैचारिक लोखंडाचंही कधी तरी सोनं होईल. मग स्वार्थाच्या मातीचा त्यावर काही परिणाम होणार नाही. तुमच्यासारखे समाजसंत निराश झाले तर माणसाने कोणाकडे पाहायचं?’

तेवढ्यात सगळीकडे विठ्ठलनामाचा गजर झाला. पहाट झाली होती. लगबगीने एकमेकांचा निरोप घेऊन दोघेही आपापल्या पालख्यांमध्ये परतले!

इकडे पंढरपुरात रुख्मिणी रात्रभर काळजीत होती, कारण विठ्ठल विटेवरून गायब होते. पहाटे पहाटे श्री विठ्ठल मंदिरी परतले आणि विटेवर उभे राहिले. रुक्मिणीने विचारले, ‘कुठे गेला होतात रात्रभर?’ कमरेवर हात ठेवत श्री विठ्ठल प्रसन्न स्वरात म्हणाले, ‘अगं पुण्यात होतो रात्री. तुकाराम बोल्होबा आंबिले-मोरे आणि ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी अशा नावांची दोन माणसं एकत्र येऊन, एकाच विचारानं चर्चा करतात, समाजाची काळजी करतात, असं दुर्मीळ दृश्य एरवी कधी पाहायला मिळणार होतं?’

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत