सातार्डा : सातार्डा पंचक्रोशीमध्ये मोकाट गुरांचा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मोकाट गुरांची समस्या सोडविण्यासाठी प्रभारी प्रांताधिकारी विरसिंग वसावे, तहसीलदार श्रीधर पाटील यांचे लक्ष वेधणार असल्याचे जि प सदस्य सुदन कवठणकर यांनी सांगितले.
परिसरातील शेतकरी गुरे मोकाट सोडून आरामात रहातात.मोकाट गुरे शेतीचे, व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. दोन्ही मुख्य बाजारपेठेच्या ठिकाणी मोकाट गुरांचा कळप असतो. मोकाट गुरांच्या उपद्रवामुळे गोवा राज्यात जाणाऱ्या – येणाऱ्या वाहनांच्या अपघातात वाढ झाली आहे. अपघातग्रस्त चालकांवर गोवा जिल्हा रुग्णालय तसेच बांबोळी रुग्णालयामध्ये उपचार केले जात आहेत.
मोकाट गुरांमुळे होत असलेल्या अपघातांमुळे कुटुंबियांची ओढाताण होत आहे. मोकाट गुरे शेतीचे, भाजी विकेत्यांचे नुकसान करत आहेत. दुकानात घुसून व्यापाऱ्यांना त्रास करत आहेत.मोकाट गुरांच्या उच्छादामुळे विद्यार्थ्यांना धोका आहे.ग्रामपंचायतने मोकाट गुरांच्या मालकांवर कारवाईचा बडगा उचलूनही शेतकऱ्यांनी असहकार्य दर्शविले आहे. अपघात झाल्यानंतर गुरांच्या नुकसान भरपाईसाठी मोकाट गुरे सोडणारे शेतकरी पुढे धावतात. त्यामुळे मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रांताधिकारी व तहसीलदार यांचे लक्ष वेधणार असल्याचे जि प सदस्य श्री कवठणकर यांनी स्पष्ट केले आहे.
