Headlines

मयुरेश कदम आणि श्रावणी चव्हाण ठरले ‘मिस्टर व मिस फ्रेशर’ !


मालवण: स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात नुकत्याच प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वागत व ओरिएंटेशन कार्यक्रम १७ जुलै रोजी उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमामुळे महाविद्यालयाचे सभागृह नवचैतन्याने बहरून गेले होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) आणि वरिष्ठ वर्गातील विद्यार्थ्यांनी नवोदित विद्यार्थ्यांसाठी विविध मजेशीर गेम्सचे आयोजन केले होते. या स्पर्धांमध्ये मुलांमधून मयुरेश कदम याने ‘मिस्टर फ्रेशर’ तर मुलींमधून श्रावणी चव्हाण हिने ‘मिस फ्रेशर’चा किताब पटकावला.

विद्यार्थ्यांना दिले अभ्यासासोबत कौशल्य विकासाचे धडे कार्यक्रमाच्या उत्तरार्धात विद्यार्थ्यांसाठी ओरिएंटेशन सत्राचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रा. डॉ. उज्ज्वला सामंत यांनी महाविद्यालयाच्या ‘कोड ऑफ कंडक्ट’चे वाचन करत विद्यार्थ्यांना आदर्श वर्तणूक आणि नियमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात कार्यरत असलेल्या विविध विभागांची ओळख आणि त्यांच्या कार्यपद्धतीची माहिती संबंधित विभाग प्रमुखांनी दिली.

महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. के. के. राबते यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच महाविद्यालयामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध कौशल्य आधारित कोर्सेससाठी प्रवेश घेण्याचे आवाहन केले. नवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये आत्मसात करण्यावर त्यांनी भर दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा. डॉ. सुमेधा नाईक यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. एच. एम. चौगले यांनी केले. या कार्यक्रमास आयक्यूएसी कोऑर्डीनेटर श्री. संग्रामसिंह पवार, प्रा. देविदास हारगिले, प्रा. डॉ. एम. आर. खोत, प्रा. रोहिणी फाटक, प्रा. डॉ. एस. एस. बेळेकर, प्रा. मुंडले, प्रा. अनघा टिकले, कृतिका न्हिवेकर यांच्यासह प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयक्यूएसी आणि वरिष्ठ विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत