Nagpur News: रस्ते खोदकाम आणि त्यांच्या निकृष्ट दुरुस्तीवरून नागपूरच्या महापौर नीता ठाकरे यांनी कंत्राटदारांची जबाबदारी निश्चित करून दोषींवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

एनडीएसच्या कार्यपद्धतीवर नगरसेवकांनी नाराजी
नव्या उपद्रवांची अधिसूचना काढण्यात येणार असून, प्रथमच नियमभंग करणारे आणि पुनरावृत्ती करणाऱ्यांसाठी स्वतंत्र दंडाची तरतूद केली जाणार असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले. पारदर्शकतेसाठी एनडीएस जवानांना बॉडी कॅमेरे व जीपीएस यंत्रणा देण्याचेही संकेत देण्यात आले. दरम्यान, एनडीएसच्या कार्यपद्धतीवर नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली.
कंत्राटदारांना अल्टिमेटम
अमृत २.० योजनेंतर्गत शहरात सुरू असलेल्या रस्ते खोदकाम आणि त्यानंतरच्या निकृष्ट दुरुस्तीवरून सोमवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महापालिका अधिकारी व कंत्राटदारांना अल्टिमेटम दिल्यानंतर या मुद्द्याचे पडसाद सभागृहात उमटले. नागरिकांना रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे होणारा त्रास आणि अपघात लक्षात घेता संबंधित अधिकारी व कंत्राटदारांची जबाबदारी निश्चित करून दोषींवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश महापौर नीता ठाकरे यांनी प्रशासनाला दिले.
Gadchiroli Student Death :सर्पदंशाच्या घटनेनंतर आश्रमशाळांसाठी नवी ‘एसओपी’
महापौरांनी प्रशासनाच्या भूमिकेबद्दल संताप व्यक्त केला
अमृत योजनेअंतर्गत खोदकाम झाल्यानंतर रस्ते वेळेत पूर्ववत केले जात नसल्याचा मुद्दा नगरसेवकांनी उपस्थित केला. त्यावर महापौरांनी प्रशासनाच्या भूमिकेबद्दल संताप व्यक्त केला. खोदकाम पूर्ण झाल्यानंतर रस्ते पूर्ववत करण्यासाठी निश्चित कालमर्यादा ठरवावी आणि रस्ते दीर्घकाळ उखडलेल्या अवस्थेत राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले. रस्ते दुरुस्तीच्या कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी संबंधित सहायक आयुक्तांवर निश्चित करण्याचेही निर्देश देण्यात आले.
महापालिका प्रशासनाने स्वतंत्र एसओपी तयार करावी
अमृत योजनेच्या कामानंतर रस्ते पूर्ववत करण्यासाठी महापालिका प्रशासनाने स्वतंत्र एसओपी तयार करावी, असा निर्णय सभागृहात घेण्यात आला. हे काम महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागामार्फत सुरू असून, या विभागाची जबाबदारी अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी यांच्याकडे आहे. संबंधित विभाग आणि कंत्राटदार संस्थांची बैठक घेऊन आवश्यक सूचना देण्याचे निर्देश महापौरांनी आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांना दिले.
कठोर कारवाई केली जाईल
नागरिकांकडून रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत छायाचित्रांसह तक्रारी प्राप्त झाल्यास त्या गांभीर्याने घेण्याचे निर्देशही महापौरांनी दिले. संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करून तक्रारीची खातरजमा करावी. तक्रारींकडे दुर्लक्ष करणे, पाहणी न करता अहवाल देणे किंवा दुरुस्तीबाबत चुकीची माहिती देणे आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
वाहने घसरून अपघात
नगरसेवक अभिजित झा यांनी तहकुबीच्या सूचनेद्वारे हा मुद्दा उपस्थित केला. अमृत योजनेअंतर्गत खोदलेल्या रस्त्यांची निकृष्ट दुरुस्ती झाल्याने वाहनचालकांची वाहने घसरून अपघात होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
‘पेटी’ कंत्राटदारांवर बोरकरांचा सवाल
सत्तापक्ष नेते नरेंद्र ऊर्फ बाल्या बोरकर यांनी अमृत योजनेची कामे मिळविणारे मुख्य कंत्राटदार पुढे ही कामे ‘पेटी’ कंत्राटदारांना देत असल्याचा आरोप केला. अशा स्थितीत कामाच्या गुणवत्तेवर नियंत्रण कसे ठेवले जाते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनी सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाच्या कार्यपद्धतीवर टीका केली. प्रत्यक्ष कामांची माहिती विभागप्रमुखांनाच नसल्याचा आरोप करत, अमृत २.० योजनेचा डीपीआर गुगल मॅपच्या आधारे तयार करण्यात आल्याचे सांगितले जात असल्याचा दावाही त्यांनी केला.

