Headlines

तब्बल नऊ वर्षांनी सावंतवाडी पंचायत समितीची आमसभा


सावंतवाडी प्रतिनिधी : तब्बल नऊ वर्षांनंतर सावंतवाडी पंचायत समितीची आमसभा ६ ऑगस्ट रोजी आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यापूर्वी २९ डिसेंबर २०१६ रोजी आमसभा झाली होती. त्यानंतर एकदाही आमसभा झाली नाही.

माजी सभापती प्रमोद सावंत यांच्या कार्यकाळात आमसभा झाली होती. मात्र, त्यानंतर जवळपास सहा सभापती होऊन गेले, तरी आमसभेचे आयोजन झाले नाही. आमदार दीपक केसरकर हे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून तब्बल चार वेळा, म्हणजे जवळपास वीस वर्षे आमदार म्हणून कार्यरत आहेत. या संपूर्ण कार्यकाळात त्यांच्या अध्यक्षतेखाली अवघी एकच आमसभा झाली होती. आता त्यांच्या अध्यक्षतेखाली दुसऱ्यांदा आमसभा होत आहे.

सावंतवाडी पंचायत समितीवर आमदार दीपक केसरकर आमदार झाल्यापासून प्रथमच त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा झेंडा फडकला असून, सुष्मिता जाधव या सभापतीपदी विराजमान आहेत. सध्या पंचायत समितीवर शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे. यापूर्वी केसरकर सलग तीन वेळा आमदार असताना पंचायत समितीवर त्यांच्या पक्षाची सत्ता नव्हती. तसेच त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळात पंचायत समितीवर प्रशासकीय कारभार असल्यामुळे आमसभा होऊ शकली नव्हती. गेल्या चार महिन्यांपूर्वी पंचायत समितीवर सदस्य निवडून आले. त्यानंतर शिवसेनेचे सभापती आणि भाजपचे उपसभापती असे समीकरण जुळून आले. पहिल्याच पंचायत समिती बैठकीत सभापती व उपसभापती यांनी आमसभा घेण्याची मागणी केली होती. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विरोधी सदस्य उदय पारिपत्ते यांनी, “आमसभा कधी होणार?” असा सवाल उपस्थित केला होता. त्यानंतर आमदार दीपक केसरकर यांना निवेदनही देण्यात आले. त्या मागणीनुसार आमदार केसरकर यांनी ६ ऑगस्ट ही तारीख निश्चित केली.

प्रशासकीय कारभारानंतर प्रथमच सावंतवाडी पंचायत समितीची आमसभा होत असल्याने या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या आमसभेत आमदार दीपक केसरकर यांनी केलेल्या विविध विकासकामांच्या घोषणा, रोजगार, आरोग्य सुविधा, प्रस्तावित प्रकल्प, कारखाने, मल्टिस्पेशालिटी रुग्णालय, एसटी बसस्थानक अशा विविध विषयांवर जोरदार चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, आमदार दीपक केसरकर यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, आमसभा म्हणजे पंचायत समितीच्या एकंदरीत कामकाजाचा आढावा घेण्याचे व्यासपीठ आहे. ती आमदारांनी केलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठीची सभा नाही. त्यामुळे या आमसभेत पंचायत समितीच्या विकासकामांचा आढावा घेतला जाणार आहे.

आमदार दीपक केसरकर यांना विविध प्रश्नांवर विरोधक घेरण्याची शक्यता असली, तरी पंचायत समितीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेस पक्षाच्या सदस्यांची संख्या फारच कमी आहे. मात्र, आमसभेला तालुक्यातील सर्व नागरिकांना निमंत्रित केले जात असल्याने, सर्वसामान्य जनता कोणते प्रश्न उपस्थित करते, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. ही आमसभा ६ ऑगस्ट रोजी सावंतवाडी नगरपालिकेच्या बॅ. नाथ पै सभागृहात होणार असून, तालुक्यातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सहाय्यक गटविकास अधिकारी नितीन जाधव यांनी केले आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत