सावंतवाडी प्रतिनिधी : सावंतवाडी येथील डॉ. परुळेकर नर्सिंग होम येथे मुंबईस्थित सामंत ट्रस्टच्या वतीने आठ गरजू लाभार्थ्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांचे धनादेश डॉ. जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या उपक्रमांतर्गत सावंतवाडी येथील पांडुरंग नमशी आणि मुंबईतील सांताक्रूझ येथील अल्पिता शेडगे या विद्यार्थ्यांना शैक्षणिक आर्थिक सहाय्य देण्यात आले.
तसेच, मसुरे येथील ओमप्रसाद शेडगे (रक्ताचा कर्करोग), ओटवणे येथील अक्षता जाधव (स्तनाचा कर्करोग), पेंडूर येथील भाग्यश्री राऊत (आतड्यातील रक्तस्त्राव व ॲनिमिया), वर्दे येथील वासुदेव सावंत (पित्ताशयाचा आजार), पेंडूर येथील संजय गावडे (अपस्मार व मानसिक मतिमंदता), विद्या ढवळे (मूत्रपिंडाचा आजार) तसेच नेमळे येथील रेश्मा झोरे (शस्त्रक्रियेनंतर झालेला ग्रॅन्युलोमा आजार) या रुग्णांनाही प्रत्येकी १० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.
यावेळी डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी सामंत ट्रस्टच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत, गरजू विद्यार्थी आणि रुग्णांना अशा प्रकारची मदत मोठा आधार ठरत असल्याचे सांगितले.
