WTC Final 2027 : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या २०२५-२७ चक्रातील अंतिम सामना लंडनमधील द ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. ९ जूनपासून सुरू होणारा हा सामना १३ जूनपर्यंत चालेल. सध्याच्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया अव्वल, दक्षिण आफ्रिका दुसऱ्या तर भारत पाचव्या स्थानावर आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या २०२५-२७ चक्रातील अंतिम सामन्याची तारीख आणि ठिकाण निश्चित झालं आहे. लंडनमधील द ओव्हल मैदानावर पुढील वर्षी ९ ते १३ जूनदरम्यान डब्ल्यूटीसीची फायनल खेळवली जाणार आहे. या अंतिम सामन्यात कोणते दोन संघ आमनेसामने येणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. भारताने यापूर्वी दोन वेळा डब्ल्यूटीसीची अंतिम फेरी गाठली आहे. मात्र, दोन्ही वेळा टीम इंडियाला विजेतेपद मिळवता आलं नाही. सध्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर असलेल्या भारतासमोर यावेळी अंतिम फेरी गाठण्याचं मोठं आव्हान आहे.
द ओव्हलवर रंगणार डब्ल्यूटीसीची फायनल
आयसीसीने डब्ल्यूटीसीच्या पुढील तीन अंतिम सामन्यांचं आयोजन इंग्लंडमध्ये करण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर केला होता. त्यानुसार २०२७, २०२९ आणि २०३१ या वर्षांतील डब्ल्यूटीसी फायनल इंग्लंडमध्ये खेळवली जाणार आहे. आता २०२५-२७ चक्रातील अंतिम सामन्याची तारीखही निश्चित झाली आहे. ९ ते १३ जूनदरम्यान लंडनमधील द ओव्हल मैदानावर हा सामना होणार आहे.
भारताने २०२१ आणि २०२३मध्ये डब्ल्यूटीसीची अंतिम फेरी गाठली होती. मात्र, दोन्ही सामन्यांत टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. २०२३मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना झाला होता. ऑस्ट्रेलियाने भारताचा २०९ धावांनी पराभव करत डब्ल्यूटीसीचं विजेतेपद पटकावलं होतं. यापूर्वी न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या तीन संघांनी डब्ल्यूटीसीचं विजेतेपद मिळवलं आहे. मात्र, दोनदा अंतिम फेरीत पोहोचलेल्या भारताला अद्याप ही ट्रॉफी जिंकता आलेली नाही.
गुणतालिकेत भारत पाचव्या स्थानावर
डब्ल्यूटीसीच्या सध्याच्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका दुसऱ्या, तर न्यूझीलंड तिसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेश चौथ्या स्थानावर असून भारत पाचव्या स्थानावर आहे. डब्ल्यूटीसीच्या नियमानुसार गुणतालिकेतील पहिल्या दोन स्थानांवर असलेले संघ अंतिम सामन्यात आमनेसामने येतात. त्यामुळे भारताला अंतिम फेरी गाठायची असेल, तर उर्वरित सामन्यांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागणार आहे.
भारताचे डब्ल्यूटीसीच्या सध्याच्या चक्रात अजून ९ कसोटी सामने बाकी आहेत. त्यापैकी ८ सामन्यांमध्ये विजय मिळवणं भारतासाठी महत्त्वाचं असल्याचं चित्र आहे. मात्र, हे आव्हान टीम इंडियासाठी सोपं असणार नाही. भारताला न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरुद्ध त्यांच्या देशात कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची मालिका होणार आहे.
दरम्यान, भारतीय कसोटी संघातही मोठे बदल झाले आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे नव्या खेळाडूंच्या साथीने भारताला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचं आव्हान पेलावं लागणार आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा