IND vs ZIM : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामन्यात श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी झिम्बाब्वेला २० षटकांत ७ बाद १२५ धावांवर रोखलं. आता भारताला सामना जिंकण्यासाठी १२६ धावा कराव्या लागणार आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : आयर्लंड आणि इंग्लंडमधील कटू अनुभव मागे टाकून भारतीय संघ श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पुन्हा एकदा मैदानात उतरला आहे. मात्र, श्रेयसने नेतृत्व स्वीकारल्यापासून भारताला अद्याप विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला. कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी त्याचा निर्णय योग्य ठरवत झिम्बाब्वेला २० षटकांत ७ बाद १२५ धावांवर रोखलं. त्यामुळे भारतासमोर सामना जिंकण्यासाठी १२६ धावांचं लक्ष्य आहे.
झिम्बाब्वेला सुरुवातीलाच मोठे धक्के
श्रेयस अय्यरने खेळपट्टीचा अंदाज घेत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी पहिल्या षटकापासूनच शिस्तबद्ध मारा केला. मयंक यादवने डावाच्या पहिल्याच षटकात ब्रायन बेनेटला शून्यावर बाद करत झिम्बाब्वेला पहिला धक्का दिला. त्यानंतर प्रिन्स यादवने बेन करनला १० धावांवर माघारी धाडलं. मयंकने आपली प्रभावी गोलंदाजी सुरू ठेवत डिओन मायर्सला ६ धावांवर बाद केलं. त्यामुळे अवघ्या २० धावांत झिम्बाब्वेचे तीन फलंदाज माघारी परतले.
झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाला मोठी खेळी करता आली नाही. तो अवघ्या ४ धावा करून शिवम दुबेच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर वेस्ली माधेवरे आणि रायन बर्ल यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. रायन बर्लने ३५ चेंडूंत २६ धावा केल्या. त्याच्या खेळीत एक चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. त्याला रवी बिश्नोईने बाद केलं. दुसरीकडे, वेस्ली माधेवरेने झिम्बाब्वेकडून सर्वाधिक ३९ धावांची खेळी केली. त्याने ३४ चेंडूंचा सामना करत तीन चौकार आणि एक षटकार लगावला. मात्र, शिवम दुबेच्या अचूक नेमावर तो धावबाद झाला.
अखेरच्या टप्प्यात तादिवानाशे मारुमनीने नाबाद २७ धावा करत झिम्बाब्वेला १२५ धावांपर्यंत पोहोचवलं. त्याने २० चेंडूंचा सामना केला.
भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच झिम्बाब्वेच्या फलंदाजांवर दबाव कायम ठेवला. मयंक यादव आणि प्रिन्स यादव या जोडीने प्रत्येकी दोन बळी घेतले. मयंकने चार षटकांत केवळ १८ धावा देत दोन फलंदाजांना माघारी धाडलं. तर प्रिन्स यादवने चार षटकांत १९ धावा देत दोन बळी घेतले. रवी बिश्नोईने चार षटकांत २४ धावा देत एक बळी मिळवला. शिवम दुबेने चार षटकांत ३२ धावा देत एक बळी घेतला. त्याने एक महत्त्वाचं धावबादही केलं. अशोक शर्माला बळी मिळाला नसला तरी त्याने चार षटकांत २९ धावा दिल्या.
भारतीय गोलंदाजांच्या या शिस्तबद्ध कामगिरीमुळे झिम्बाब्वेला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. आता भारतासमोर १२६ धावांचं लक्ष्य असून, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ विजयाची प्रतीक्षा संपवतो का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा