![]()
गुलटेकडी येथील ठेकेदार खलील रज्जूलाल शेख यांच्या आत्महत्या प्रकरणात माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांना पुणे सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात आरोपी असलेल्या बाळा शेडगे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मात्र न्यायालयाने फेटाळला. धंगेकर यांचे वकील ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी गुरुवारी ही माहिती दिली. खलील रज्जूलाल शेख (वय ६५) यांनी गुलटेकडी येथील त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहिली होती आणि काही व्हिडिओ देखील तयार केले होते, असे पोलीस तपासात उघड झाले आहे. आर्थिक व्यवहार, व्यावसायिक वाद, मानसिक त्रास आणि धमक्यांच्या आरोपांवरून स्वारगेट पोलीस ठाण्यात माजी आमदार रवींद्र धंगेकर, त्यांची पत्नी आणि इतर काही व्यक्तींविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात नाव आल्यानंतर धंगेकर आणि त्यांच्या पत्नीने पुणे सत्र न्यायालयात अंतरिम अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. गांधी यांच्या न्यायालयात ॲड. विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत हा अर्ज सादर करण्यात आला. सरकार पक्ष आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने गुरुवारी या अर्जावर निर्णय दिला. धंगेकर यांच्या वतीने युक्तिवाद करताना, आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांचे नाव नसल्याचा दावा करण्यात आला. शेख यांच्या आत्महत्येशी धंगेकर यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध नसून, राजकीय द्वेषातून त्यांना या गुन्ह्यात गोवण्यात आल्याचे बचाव पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच, तपासासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि उपलब्ध कागदपत्रांचा विचार करून न्यायालयाने रवींद्र धंगेकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. दुसरीकडे, बाळा शेडगे यांचा अर्ज फेटाळल्याने त्यांच्या अटकेची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास स्वारगेट पोलीस करत आहेत. हे ही वाचा… कोण आहे पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया अहिर?:27 वर्षीय मॉडेलची देशभरात चर्चा; मुंबईतील विद्यार्थी आंदोलनात ठामपणे उभी राहिली मुंबईतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना घेऊन जाणाऱ्या व्हॅनसमोर ठामपणे उभे राहत ती रोखणारी 27 वर्षीय मॉडेल रिया अहिर सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे. शिवाजी पार्क परिसरातील या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून, अनेकांनी तिच्या धाडसाचे कौतुक केले आहे. हे ही वाचा… नीट पेपरफुटीविरोधात पुण्यात वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा:धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी, विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर चिंता व्यक्त पुण्यात वंचित बहुजन आघाडीने नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ मोर्चा काढला. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शनिवारवाडा येथून सुरू झालेला हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत नेण्यात आला. या मोर्चामध्ये वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला. सविस्तर वाचा…
Source link
ठेकेदार आत्महत्या प्रकरण:माजी आमदार रवींद्र धंगेकरांसह त्यांच्या पत्नीला अटकपूर्व जामीन मंजूर, बाळा शेडगे यांचा अर्ज फेटाळला
