Headlines

FIFA World Cup 2026: विश्वचषकाचे… गोल आणि ‘सेल्फ गोल’! – fifa world cup 2026 spain vs argentina final kick



-आशिष पेंडसे

अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या देशांत आयोजित २३व्या वर्ल्ड कप फुटबॉलचे गेल्या डिसेंबरमध्ये बिगुल वाजले ते आव्हानांच्या अनेक किक लगावूनच. महागडी तिकिटे, फुटबॉल पर्यटक व्हिसा समस्या इथपासून ते थेट अमेरिका-इराण-इस्रायलच्या संघर्षामधून युद्धाच्या खाईत लोटले गेलेले विश्व, अशा वातावरणात विश्वचषकाचा किक-ऑफ झाला.
आत्तापर्यंतचा सर्वाधिक ४८ संघांचा सहभाग, तीन यजमान देश, सामन्यांची वाढलेली संख्या यामुळे संयोजनाची एकूण व्याप्ती वाढली. स्पर्धेतील अनेक संघ हे जागतिक फुटबॉल महासंघाच्या (फिफा) मानांकनात खालच्या क्रमांकावरील होते. परिणामी, स्पर्धेचा दर्जा टिकून राहण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.

भारतामध्ये विश्वचषकाचे प्रक्षेपक मिळण्याबाबत अखेरच्या क्षणापर्यंत अनिश्चितता होती. त्यातच सामन्यांच्या मध्यरात्रीनंतरच्या गैरसोयीच्या वेळांमुळे स्पर्धेला प्रतिसाद मिळण्याबाबत साशंकता होती.

दी लास्ट डान्स…
या पार्श्वभूमीवर एकेक टप्पा पार करत स्पर्धा पुढे जात असताना चित्र पालटू लागले. एम्बाप्पे-डेंबेले, केन-बेलिंघम, हालंड, यमाल, मो-सालाह आणि त्यांनी लगावलेले गोल घरोघरी चर्चेत येऊ लागले. रोनाल्डो, मेस्सी, नेमार या जगप्रसिद्ध फुटबॉलपटूंचा अखेरचा विश्वचषक म्हणून स्पर्धेचे – ‘दी लास्ट डान्स’ असे केलेले मार्केटिंग प्रभावी ठरू लागले. त्यातच, सर्वंच दिग्गज स्ट्रायकरनी एकामागून एक गोलचा धडाका लावला. मेस्सी, एम्बाप्पे, रोनाल्डो यांनी केलेले विक्रम स्पर्धेला वेगळ्या उंचीवर नेत होते. बाद फेरीपर्यंत पोचताना प्रत्येकाचेच फेव्हरिट अधिक फेव्हरिट होऊ लागले. तर, स्पर्धेचा कल पाहून कुंपणावरील चाहत्यांनी टोप्या फिरवल्या!

मानांकित संघांची हाराकिरी
केवळ मार्केटिंगमुळे कोणती स्पर्धा खपण्यास मर्यादा असतात. त्याला मैदानातील प्रत्यक्ष कामगिरीची जोड लागतेच. त्यानेच अधिक मने जिंकली जातात आणि लाईक्स मिळतात, हेदेखील या स्पर्धेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

गटसाखळीमध्ये उरुग्वे, कोरिया, तुर्किए, चेकिया आणि पात्रता फेरीत इटलीला नमविलेल्या बोस्निया यांनी काहीशी निराशा केली. तर, जर्मनी, कोलंबिया यांच्यासारख्या दिग्गज संघांचा अनपेक्षित सनसनाटी पाडाव झाला. तुल्यबळ संघांचेच आव्हान उभे ठाकल्याने हॉलंड, जपान यांना लवकर गाशा गुंडाळावा लागला. नॉर्वेचे व्हायकिंग या स्पर्धेच्या स्मृतींमध्ये अढळ राहतील.
अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या यजमानांनी अपेक्षित मजल मारली. फुटबॉलची परंपरा असलेल्या मेक्सिकोने तिसऱ्यांदा विश्वचषकाचे आयोजन केले होते. मात्र, त्यामध्ये विशेष उल्लेख करावा लागेल तो अमेरिका आणि कॅनडा यांच्या गुणवान खेळाडूंचा. फुटबॉलची (म्हणजेच त्यांच्या भाषेत ‘सॉकर’ या खेळाची) संस्कृती नसताना त्यांनी मारलेली मजल आणि केलेल्या कौशल्यपूर्ण खेळाची प्रशंसा झाली. या स्पर्धेच्या निमित्ताने तिथे फुटबॉलला प्रचंड मागणी निर्माण झाली आहे. अमेरिकेने तर २०३८ सालच्या ६४ संघ सहभागी असलेल्या स्पर्धेचे एकट्याने आयोजन करण्याची तयारी दर्शवली आहे. पारंपरिक युरोपीय, लॅटिन मार्केटबाहेर अटलांटिक महासागर ओलांडून सॉकररूपातील फुटबॉलची ही संभाव्य भरारी अर्थपूर्ण आणि स्वागतार्ह आहे. आफ्रिका खंडातील नऊ देश यंदा स्पर्धेसाठी पात्र ठरले होते. त्यापैकी तब्बल आठ संघांनी बाद फेरी गाठून विक्रम केला. अरब देशांचे वर्चस्व दिसून आले. त्यात मोरोक्को, इजिप्तकडून विशेष लक्षवेध झाला.

फुटबॉलचे लोकशाहीकरण
फुटबॉलचे मार्केट जागतिक आहे. आफ्रिका, उत्तर-दक्षिण अमेरिकेतील बहुतांश खेळाडू हे युरोपीय क्लबमधून व्यावसायिक फुटबॉल खेळतात. त्यामुळेच, फिफा मानांकनातील खालचे स्थान, अपरिचित देश असे कोणतेही मानसिक ओझे या देशांवर नव्हते. त्यांनी वर्ल्ड कपसारख्या सर्वोच्च पातळीवर आपली फुटबॉल अभिव्यक्ती दिलखुलासपणे प्रदर्शित केली. एआय आधारित फुटबॉल विश्लेषणासाठी फिफाने रिअल टाइम डेटा सर्व संघांना मोफत उपलब्ध करून दिला. त्यामुळेच, स्पर्धेदरम्यान कामगिरी सुधारून जागतिक दर्जाच्या संघांना टक्कर देण्याइतकी प्रभावी करणे शक्य झाले. फुटबॉलचे हे तंत्रज्ञान आणि भौगोलिक लोकशाहीकरण, हे यंदाच्या स्पर्धेचे मोठे फलित मानावे लागेल.

बाद फेरीचा रोमहर्षक थरार
प्रत्येक वर्ल्ड कपमध्ये बाद फेरीचा थरार असतो. यंदा ४० टक्क्यांहून अधिक गोल हे ७५व्या मिनिटानंतर लगविण्यात आले. तब्बल ६०हून अधिक गोल हे ९० मिनिटांनंतर अतिरिक्त वेळात करण्यात आले. पाच खेळाडू बदली करण्याची मुभा असल्याने अर्धा संघ नव्याने मैदानात उतरतो. त्यामुळेच, वाढलेला वेग व अखेरच्या क्षणापर्यंत राहिलेली चुरस, यामुळे सामने थरारक झाले. जर्मनी-पॅराग्वे, पोर्तुगाल-क्रोएशिया, मेक्सिको-इंग्लंड, ब्राझील-नॉर्वे, सेनेगल-बेल्जियम, स्पेन-पोर्तुगाल आणि बेल्जियम, अर्जेंटिना-केप वर्दे आणि इजिप्त आदी रोमहर्षक सामन्यांच्या स्मृती कोरल्या गेल्या.

सर्वांत नजीक आणि स्वस्त असल्याने चार वर्षांपूर्वी कतारमध्ये जवळपास ७५ हजार भारतीयांनी विश्वचषकाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. अमेरिकेत मोठ्या संख्येने असलेला भारतीय समुदाय विश्वचषक रंगात रंगून गेला होता. मात्र, अव्वाच्या सव्वा तिकिट दरांमुळे प्रत्यक्ष सामने पाहण्यास जाण्यासाठी मर्यादित उत्साह होता. तिकिटाच्या पैशात भारताचे रिटर्न तिकीट घेऊ, अशी प्रतिक्रिया व्यक्त झाली. या व्यतिरिक्त फुटबॉल पर्यटनासाठी गेलेल्यांची संख्या खूपच कमी होती. जगभरातील इतर भागांतील ७० लाख पर्यंटकांनी अविस्मरणीय लढतींबरोबरच अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोच्या पाहुणचाराचा आस्वाद लुटला.

ट्रम्प आणि व्हीएआरचे सेल्फगोल
अमेरिकेच्या एका खेळाडूला देण्यात आलेले ‘रेड कार्ड’ मागे घेण्यासाठी थेट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यालयाकडून हस्तक्षेप झाल्याचे प्रकरण गाजले. प्रतिस्पर्धी संघ असलेल्या बेल्जियमनेही त्यावर जाहीर निवेदन केले. स्पर्धेपूर्वी ट्रम्प यांना ‘फिफा शांतता पुरस्कार’ दिलेल्या महासंघाचे अध्यक्ष जियानिनी इन्फांटिनो यांनी अमेरिकेपुढे लोटांगण घातल्याची टीका झाली. संयुक्त राष्ट्रसंघाचे १८३ सदस्य देश आहेत. तर, फिफा विश्वचषक पात्रता फेरीत खेळतात २११. त्यामुळेच, फुटबॉलच्या या जागतिक व्यासपीठाचा गैरवापर भूराजकीय सत्ताकेंद्राने केल्याची टीकाही होत आहे.

व्हिडीओ असिस्टंट रेफरी – म्हणजेच ‘व्हीएआर’. निर्णयप्रक्रिया वेगवान होऊन त्यात अचूकता यावी आणि खेळ प्रवाही राहावा, या उदात्त हेतूने अद्ययावत तंत्रज्ञानाची ही सहाय्यक यंत्रणा तैनात करण्यात आली. पण, त्याचा लाभ घेऊन निर्णय देताना पंचांच्या भूमिकेत सातत्य राहिले नाही. सामन्यातील परिस्थितीनुसार नियमांचा अन्वयार्थ लावण्यात ते कमी पडले. आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण म्हणतो तसे, अनेकदा कितीही अद्ययावत साधनांपेक्षा निर्णयप्रक्रियेत ‘कॉमन सेन्स’ अधिक उपयुक्त, निर्णायक ठरतो. तिथेच ‘व्हीएआर’ सपशेल नापास झाले. कायद्यातील तरतुदींचा कीस पाडला गेला आणि तंत्रज्ञान ‘खलयानक’ ठरले.

ध्रुवीकरण आणि विखारी सोशल मीडिया
स्पर्धेचा किक-ऑफ झाल्यापासून गटसाखळी संपेपर्यंत त्या संदर्भात सुमारे ९५ दशलक्ष पोस्ट टाकण्यात आल्या. अंतिम सामन्यापर्यंत ८४५ अब्ज नेटिझनपर्यंत वर्ल्ड कप पोचला आणि सुमारे १८ अब्ज नेटिझन फुटबॉल चाहते त्यावर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात व्यक्त झाले. संपूर्ण कतार वर्ल्ड कपमध्ये सुमारे ९३ दशलक्ष पोस्ट टाकण्यात आल्या होत्या. या आकडेवारीची तुलना केल्यास सोशल मीडियाने चार वर्षांतच किती भरारी मारली आहे, हे लक्षात येईल. फिफाच्या वर्ल्ड कप पोर्टललादेखील आठ कोटींहून अधिक विक्रमी प्रतिसाद मिळाला.

मात्र, यंदाच्या विश्वचषक फुटबॉल सोशल मीडियामध्ये विखार अधिक दिसला. ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम – गोट – रोनाल्डो की मेस्सी ही चर्चा काही आजची नाही; पण, ती कधी इतकी विखारी, नकारात्मक झाली नव्हती. मिम्स पूर्वीही यायच्या. पण, त्यात आपल्या कार्टूनसारखे मार्मिक व्यंग, ट्रोलिंग होते. अवहेलना आणि खालच्या पातळीवर टिप्पणी नसायची. सध्या सभोवताली ध्रुवीकरणाचे वातावरण आहे. त्यामध्ये फुटबॉलविश्व आणि रोनाल्डो-मेस्सी चाहत्यांनी टोकाच्या तिरस्काराचे ‘सेल्फ गोल’ केले. फुटबॉलचा गंधही नसलेली सोशल मीडिया ‘मेंढरे’ या दोन्ही बाजूंच्या कळपात सामील झाली नसती तरच नवल!

भारताचे स्पोर्ट्स नागरिकत्व
यंदाच्या विश्वचषकात न्यूझीलंड, कतार, ऑस्ट्रेलिया आणि काँगो या देशांकडून चार भारतीय मैदानात उतरले होते. रायन विल्यम्स या ऑस्ट्रेलियन फुटबॉलपटूने भारतीय पासपोर्ट स्वीकारत ‘ब्ल्यू टायगर्स’ची जर्सी परिधान केली आहे. भारतीय फुटबॉल संघाचा दर्जा उंचाविण्यासाठी राष्ट्रीय क्लब साखळी स्पर्धेत आणि कालांतराने राष्ट्रीय संघाकडून अशा परदेशस्थ भारतीयांना खेळण्याची मुभा देण्याबाबत विचार सुरू झाला आहे. ओसीआय घटकात स्पोर्ट्स नागरिकत्व दिल्यास अनेक खेळांमध्ये भारताला त्याचा फायदा होऊ शकेल.

आत्तापर्यंतच्या अनेक विश्वचषकांपेक्षा यंदाची स्पर्धा सर्वार्थाने विक्रमी, ऐतिहासिक ठरली. फुटबॉल हाच जगातील अव्वल खेळ आहे आणि भारतामध्येही फुटबॉलची प्रचंड ‘क्रेझ’ आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. मैदानाबाहेरचे ‘सेल्फ गोल’ इतिहासजमा करूयात. मैदानातील ऐतिहासिक कामगिरी आणि जगभर सौहार्द प्रस्थापित करणाऱया फुटबॉलच्या हृदयस्पर्थी स्मृती जतन करूयात. भारताच्या पुढाकाराने हाच क्रीडासंस्कृतीचा सकारात्मक ‘गोल’ अखिल विश्वात वृद्धिंगत होईल, ही अपेक्षा!

नवोदितांची प्रशंसा
विश्वचषकाची व्याप्ती वाढविल्याचे सकारात्मक परिणाम दिसले. केप वर्दे, काँगो यांनी मने जिंकली. स्पेन, उरुग्वे, अर्जेंटिनाला रोखणारा केप वर्देचा गोलकीपर व्होझिना याच्या सोशल मीडिया फॉलोअर्समध्ये ४० हजारांवरून ६० लाखांपर्यंत वाढ झाली, यातच विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची जागतिक व्याप्ती आणि चाहत्यांची गुणग्राहकता दिसून आली.

भारताने काय साधले?
भारतीय फुटबॉलप्रेमींमध्ये इंग्लिश प्रीमियर लीग, स्पेनमधील ला-लिगा, जर्मनीतील बुंडेस लिगा आणि आता सौदी प्रीमियर लीग या विशेष लोकप्रिय आहेत. त्यामुळेच, त्यांचे कोणते खेळाडू कोणत्या संघात आहेत, याची इत्यंभूत माहिती भारतीय फुटबॉलप्रेमींना असते. आता कुणी विचारेल, की रात्रीचा दिवस करून हे १०४ सामने पाहून कुणी काय साध्य केले? मुळात, सध्याची सामाजिक-आर्थिक परिस्थिती खूपच अस्वस्थ, भरकटलेली आहे. अशात शालेय-युवा पिढी कोणत्या फुटबॉलसारख्या वैश्विक विषयामध्ये रस घेते आहे, नव्हे ध्यास घेऊन झपाटल्यासारखी ‘फॉलो’ करते आहे, ही आश्वासक बाब आहे. मैदानावरील फुटबॉल प्रतिभेला हेरून प्रशिक्षित करण्याचे ‘ग्रासरूट’ प्रकल्प सुरू आहेतच. त्याच्या जोडीला मैदानाबाहेर अशी क्रीडासंस्कृती रुजली, तर आपण ‘स्पोर्ट्स नेशन’ म्हणून नाव मिरवू शकू. विश्वचषकासाठी धूम असताना गल्ली ते दिल्लीपर्यंत पायाभूत सुविधा, फुटबॉल विकासाबाबत मात्र सरकारी व संघटना स्तरावर अनास्था असल्याचा आरोप केला जात आहे. मुंबईतील एका पारंपरिक फुटबॉल मैदानावर ‘विकासप्रकल्प’ उभारण्यास विरोध होत आहे. मैदानाबाहेरील हे ‘सेल्फ गोल’ दुर्लक्षून चालणार नाहीत.
————————————————————-
(लेखक ‘व्हिवा’ फुटबॉल मासिकाचे संपादक आहेत.)



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत