मुख्यमंत्री सावंत : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचे कौतुक
पणजी : भारताचे पहिले खासगीरित्या विकसित केलेले कक्षीय रॉकेट ‘विक्रम-1’च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आनंद व्यक्त केला आहे. हे ऐतिहासिक यश म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंतराळ क्षेत्रात राबवलेल्या धाडसी धोरणात्मक सुधारणांचे थेट फळ आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी काल, शनिवारी संध्याकाळी पंतप्रधानांच्या दूरदृष्टीचे कौतुक केले.
हैदराबादस्थित ‘स्कायरूट एरोस्पेस’ या स्टार्ट-अप कंपनीने तयार केलेल्या ‘विक्रम-1’ रॉकेटचे शनिवारी दुपारी 12:05 वाजता श्रीहरिकोटा येथून ‘मिशन आगमन’अंतर्गत यशस्वी उ•ाण झाले. या ऐतिहासिक घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, पूर्वी अंतराळ क्षेत्र केवळ सरकारी संस्थांपुरते मर्यादित होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे क्षेत्र देशातील तरुण उद्योजक, स्टार्ट-अप्स आणि खाजगी कंपन्यांसाठी खुले करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. केंद्र सरकारने ‘इन्-स्पेस’ सारख्या स्वायत्त संस्थेची स्थापना करून इस्रोच्या जागतिक दर्जाच्या सुविधा खासगी क्षेत्राला उपलब्ध करून दिल्या. या धोरणामुळेच देशातील तरुणांच्या कौशल्याला नवे पंख मिळाले आहेत.
‘विक्रम-1’च्या यशामुळे स्वत:चे खासगी रॉकेट अंतराळ कक्षेत पाठवणारा भारत हा जगातील मोजक्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. हे यश आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया मोहिमेचे सर्वात मोठे आणि यशस्वी उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले.
या यशस्वी मोहिमेमुळे आता भारतामध्ये अत्यंत कमी खर्चात आणि जलद गतीने व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे जागतिक अंतराळ बाजारात भारताची व्यापारी ताकद प्रचंड वाढणार असून, गोव्यासह देशातील अनेक तंत्रज्ञान विषयक स्टार्ट-अप्सना यातून प्रेरणा मिळेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. या सुवर्णक्षराबद्दल त्यांनी ‘स्कायरूट एरोस्पेस’ यांचे तरुण वैज्ञानिक आणि इस्रोच्या संपूर्ण टीमचेही मन:पूर्वक अभिनंदन केले आहे.
गोमंतकीय तरुण अन् स्टार्ट-अप्सना नवी दिशा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यावेळी म्हणाले की, गोवा सरकार सध्या राज्यात आयटी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्ट-अप्सना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देत आहे. केंद्र सरकारने अंतराळ क्षेत्र खाजगी कंपन्यांसाठी खुले केल्यामुळे आता गोव्यातील तंत्रज्ञान क्षेत्रातील तरुण संशोधक आणि स्टार्ट-अप्सना देखील अंतराळ तंत्रज्ञानात काम करण्याची नवी दारे खुली झाली आहेत. भविष्यात गोव्याचे तरुणही अशा देशपातळीवरील मोहिमांमध्ये मोलाचे योगदान देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधानांच्या क्रांतिकारी निर्णयाचा विजय
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, पूर्वी अंतराळ क्षेत्र केवळ सरकारी संस्थांपुरते मर्यादित होते मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुणांच्या क्षमतेवर विश्वास ठेवून हे क्षेत्र खुले करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. केंद्र सरकारने ‘इन्-स्पेस’ सारख्या स्वायत्त संस्थेची स्थापना करून इस्रोच्या जागतिक दर्जाच्या सुविधा खाजगी क्षेत्राला उपलब्ध करून दिल्या, ज्यामुळेच आज ‘स्कायरूट’ सारख्या भारतीय कंपनीने इतिहास रचला आहे, असेही मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
