Headlines

30 विकेट्स, 518 धावा, रणजी-दुलीप ट्रॉफीत धुमाकूळ; आता हरभजननेही सांगितली सारांश जैनची सर्वात मोठी ताकद, नेमकी काय?


Saransh Jain News : वयाच्या ३३व्या वर्षी सारांश जैनचं टीम इंडियात खेळण्याचं स्वप्न पूर्ण झालं. देशांतर्गत क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर त्याने भारतीय कसोटी संघात स्थान मिळवलं. आता माजी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंहने सारांशच्या गोलंदाजीतील सर्वात मोठी ताकद सांगितली आहे. नेमकं काय आहे सारांश जैनमध्ये खास? जाणून घ्या.

saransh jain sri lanka test selection harbhajan singh
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारतीय कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी अनेक खेळाडूंना वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागते. मध्य प्रदेशचा अनुभवी ऑफस्पिनर सारांश जैन याच्यासाठीही हा प्रवास सोपा नव्हता. मात्र, वयाच्या ३३व्या वर्षी त्याच्या मेहनतीला अखेर मोठं यश मिळालं आहे. श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी सारांश जैनची पहिल्यांदाच भारतीय संघात निवड झाली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या सारांशने आपल्या कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाचं दार ठोठावलं आणि अखेर निवड समितीने त्याला संधी दिली.

रणजीत ३० विकेट्ससह ५१८ धावा

सारांश जैनसाठी २०२५-२६ रणजी ट्रॉफीचा हंगाम खास ठरला. त्याने या स्पर्धेत गोलंदाज म्हणून प्रभावी कामगिरी करताना ३० विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे केवळ गोलंदाजीतच नव्हे, तर फलंदाजीतही त्याने योगदान दिलं. सारांशच्या नावावर या हंगामात ५१८ धावांची नोंद आहे. याशिवाय दुलीप ट्रॉफीमध्ये त्याला मालिकावीर पुरस्कार मिळाला. त्याच्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर सेंट्रल झोनने तब्बल ११ वर्षांनंतर दुलीप ट्रॉफीचं विजेतेपद मिळवलं. त्यामुळे देशांतर्गत क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरीचं फळ अखेर सारांशला मिळालं आहे.

Maharashtra TimesRyan ten Doeschate : गौतमच्या जिगरीचा करार BCCI ने थांबवला, भारताचे एक्स कोच डोशेट यांना दुसऱ्याच दिवशी मोठी ऑफर

हरभजन सिंहने सांगितली मोठी ताकद

सारांश जैनच्या भारतीय संघातील निवडीचं माजी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंहने मनापासून स्वागत केलं आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना हरभजनने सारांशच्या स्वभावाचंही कौतुक केलं. “तो खूप नम्र व्यक्ती आहे आणि त्याला काय करायचं आहे, याची त्याला चांगली जाणीव आहे. त्याला माझ्याकडून खूप शुभेच्छा. हा त्याच्या कुटुंबासाठी आणि त्याला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकासाठी खास क्षण आहे,” असं हरभजन म्हणाला.

मात्र, हरभजनच्या मते सारांशची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची विकेट घेण्याची मानसिकता आहे. अनेक गोलंदाज धावा रोखण्यावर किंवा आपले षटक पूर्ण करण्यावर अधिक भर देतात. मात्र, सारांशचा दृष्टिकोन फलंदाजाला बाद करण्याचा आहे. हीच गोष्ट त्याला इतरांपेक्षा वेगळं बनवते, असं हरभजनचं मत आहे.

Maharashtra TimesS. Srikkanth : ‘रजत पाटीदारच्या तुलनेत तो काहीच नाही’; माजी खेळाडू एस. श्रीकांत टीममधील खेळाडूचं नाव घेत स्पष्टच बोलले

‘आज अनेक गोलंदाजांमध्ये ती भूक नाही’

हरभजनने सारांशच्या गोलंदाजीतील काही महत्त्वाच्या गुणांकडेही लक्ष वेधलं. त्याच्या मते सारांश फलंदाजाला आपल्या पद्धतीने खेळण्यास भाग पाडतो. त्याचं गोलंदाजी अॅक्शन चांगलं आहे. तो अनावश्यक प्रयोग करण्याऐवजी आपल्या मूलभूत कौशल्यावर विश्वास ठेवतो. चेंडू सोडण्याची सीम पोझिशन, नियंत्रण आणि अनुभव ही सारांशची मोठी ताकद असल्याचं हरभजनने सांगितलं. “आज अनेक गोलंदाजांमध्ये विकेट घेण्याची भूक दिसत नाही. मात्र, सारांशमध्ये ती क्षमता आहे,” असंही त्याने म्हटलं.

घराच्या गच्चीवर सुरू झाला प्रवास

सारांश जैनचा टीम इंडियापर्यंतचा प्रवासही तितकाच खास आहे. त्याने कोणत्याही मोठ्या क्रिकेट अकादमीतून आपली कारकीर्द सुरू केली नाही. इंदूरमधील घराच्या गच्चीवर त्याच्या क्रिकेट प्रवासाची सुरुवात झाली. त्याचे वडील सुबोध जैन हे स्वतः मध्य प्रदेशकडून रणजी ट्रॉफी खेळले आहेत. सारांश लहान असताना त्याचे वडील त्याच्यासोबत घराच्या गच्चीवर तासन्‌तास सराव करायचे. त्यामुळे क्रिकेटचं बाळकडू त्याला घरातूनच मिळालं. सुबोध जैन यांच्या मते, सध्याच्या काळात आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर अनेक खेळाडूंना भारतीय संघात संधी मिळते. मात्र, त्यांच्या मुलाने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत टीम इंडियात स्थान मिळवलं आहे.

Maharashtra TimesGautam Gambhir : गौतम गंभीरला हटवले तर टीम इंडियाची कमान कोणाकडे? हेड कोचसाठी 4 दिग्गज रेसमध्ये, एक सर्वात पुढे

आता श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत सारांश जैनला प्रत्यक्ष पदार्पणाची संधी मिळते का, याकडे सर्वांचं लक्ष असेल. मात्र, ३३व्या वर्षी भारतीय संघात स्थान मिळवून त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने मेहनत करणाऱ्या खेळाडूंसाठी नक्कीच एक मोठं उदाहरण सेट केलं आहे.