Headlines

25 years of Dil Chahta hai: खाली पडलेले फोटो ते झोया अख्तरने पाहिले, ‘दिल चाहता है’मध्ये अशी झालेली सोनाली कुलकर्णीची निवड, भन्नाट आणि फिल्मी आहे किस्सा


25 years of Dil Chahta hai:२५ वर्षांपूर्वी पडद्यावर आलेल्या ‘दिल चाहता है’नं हिंदी सिनेमात मैत्री, नातेसंबंध आणि तरुणाईकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन दिला. या चित्रपटातील पूजा ही भूमिका सहज, निरागस आणि मनमोकळ्या अभिनयातून जिवंत करत सोनाली कुलकर्णी हिनं प्रेक्षकांच्या मनात वेगळी छाप उमटवली. हिंदी कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यावर मिळालेला हा सिनेमा तिच्यासाठी आयुष्यातलं सुंदर पर्व ठरलं.

25 years of Dil Chahta hai sonali kulkarni
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सोनाली कुलकर्णी , अभिनेत्री

पंचवीस वर्षांपूर्वी ‘ दिल चाहता है ‘ घडला. माझ्यासाठी तो केवळ एकचित्रपट राहिलेला नाही, तर माझ्या आयुष्यातील एका सुंदर वळणाची आठवण बनला आहे. त्यावेळी मी २५-२६ वर्षांची होते आणि हिंदीतील माझ्या कारकिर्दीची नुकतीच सुरुवात झाली होती. मुंबईच्या झगमगाटाशी आणि व्यावसायिक सिनेविश्वाशी मी पूर्णपणे परिचित झाले नव्हते. पुण्यातून आलेली असल्यामुळे माझं जग तेव्हा खूप साधं होतं. त्यामुळे ‘दिल चाहता है’ मध्ये दिसणारे पेहराव, जीवनशैली, तरुणाईचा मोकळा दृष्टिकोन आणि मुंबईचा आधुनिक रंग मला स्वतःसाठीही एका नव्या जगाची ओळख करून देणारा ठरला. पूजाच्या व्यक्तिरेखेशीही मला खूप जवळीक वाटली, कारण माझा स्वभाव तिच्यासारखाच आहे; आजूबाजूची माणसं आनंदी असावीत, मित्रमैत्रिणींनी सतत सोबत असावं आणि आयुष्य शक्य तितकं मनमोकळेपणानं जगावं, ही भावना माझ्यात तेव्हाही होती आणि आजही आहे.

Maharashtra TimesMaharashtrachi Hasyajatra फेम ओंकार राऊतची मोठ्या पडद्यावर वर्णी, कोकणातील गूढकथेवर आधारित मराठी सिनेमा; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

त्या घरातला आपलेपणा आजही आठवतो

फरहान अख्तर आणि झोया अख्तर यांच्यामुळे मला तो अनुभव घेता आला. त्यांनी आम्हा कलाकारांना या विश्वात इतक्या आपलेपणानं सामावून घेतलं, की कधीच आपण एखाद्या मोठ्या स्टारच्या सेटवर आहोत, असं जाणवलं नाही. प्रीती झिंटाच्या कारकिर्दीचीही ती सुरुवातीचीच वर्ष होती. आमच्यासोबत आमिर खान, सैफ अली खान आणि अक्षय खन्ना यांसारखे स्टार्स होते; डिंपल कपाडिया हे नाव तर आधीपासूनच मोठं होतं. फरहानचं ते दिग्दर्शकीय पदार्पण होतं. वांद्रे येथे चित्रीकरण असायचं, तेव्हा आम्ही फरहानच्या घरी जेवायलाही जायचो. त्या घरातला आपलेपणा आजही आठवतो.

योगायोगानं ते फोटो झोयाच्या नजरेस पडले

मला ‘दिल चाहता है’ मिळण्याची गोष्टही अगदी फिल्मी आहे. तो फोटोशूटचा जमाना होता. त्यातले माझे काही फोटो कोणाकडे तरी होते. ते घेऊन जात असताना त्यातील काही फोटो खाली पडले आणि योगायोगानं ते झोयाच्या नजरेस पडले. तिनं फोटो पाहून विचारलं, ‘ही कोण आहे?’ आणि जेव्हा तिला कळलं, की ती सोनाली कुलकर्णी आहे, तेव्हा तिनं माझं काम पाहिलं असल्याचं सांगितलं. त्यानंतर मला ऑडिशनसाठी बोलावण्यात आलं. माझ्यासाठी ती ऑडिशनपेक्षा मैत्रीपूर्ण गप्पांचा सुंदर अनुभव होता. ती व्यक्तिरेखा आपल्याला मिळावी, असा विचारही माझ्या मनात आला नव्हता. काही दिवसांनी आलेल्या एका फोननं या सुंदर सिनेमाचा मी भाग होऊ शकले, ज्याचा आनंद शब्दातीत आहे. ‘वी वॉन्ट यू टू प्ले पूजा’… या एका वाक्यानं माझ्या आयुष्यात ‘दिल चाहता है’ नावाचं एक सुंदर पर्व सुरू झालं; ज्याला आता २५ वर्षं झाली.
Maharashtra TimesAjay Devgn Host Crime Patrol : अनुप सोनी नव्हे तर आता अजय देवगण करणार क्राइम पेट्रोलचे सूत्रसंचालन, प्रोमो समोर

मनाच्या जवळचं ‘वो लडकी है कहाँ’

‘वो लडकी है कहाँ’ हे गाणं आणि त्यातील हुक स्टेप आजही माझ्या आठवणीत ताजी आहे. चित्रकरणाच्या शेवटच्या टप्प्यात हे गाणं तयार झालं. एके दिवशी मला तालमीला बोलवलं. त्याच दिवशी माझा नाटकाचा प्रयोग असल्यानं मी फक्त चार तास देऊ शकते, असं सांगितलं. फराह खानची सहाय्यक गीता कपूर हिनं मला स्टेप्स शिकवल्या. मी त्या केल्या आणि अवघ्या दहा-पंधरा मिनिटांत त्यांनी मला जायला सांगितलं. चित्रीकरणाला मी बॉडी-हगिंग सलवार-कमीज आणि जुन्या काळातल्या हेअरस्टाइलमध्ये पोहोचल्यावर सैफ अली खानला हसू आवरेना. त्याला वाटलं, तो त्याच्या आई शर्मिला टागोर यांच्या काळात नाचतोय. गाडीच्या बोनटवर बसल्यावर आम्ही सगळे इतके हसलो, की आजही तो दिवस आठवला की, मजा येते.

शब्दांकन : कल्पेशराज कुबल

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला  हा  त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे.  या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल  कंटेंट प्रोड्युसर या  वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय  म्हणजेच कंटेंट तयार करण्यात  हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता  पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे.  या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान  यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.

विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव.  काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.

आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.आणखी वाचा