Headlines

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन संस्थांना मार्गदर्शनासह सर्वतोपरी सहकार्य!


ओटवणे प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला नवी गती देण्यासाठी आणि स्थानिक पर्यटन व्यावसायिकांच्या विविध समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासन स्तरावर सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. नवीन पर्यटन धोरण आणि योजनांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी भविष्यात विशेष पर्यटन कार्यशाळा आयोजित करून पर्यटन संस्थांना मार्गदर्शन केले जाईल. तसेच पर्यटन संस्थांच्या परिपूर्ण प्रस्तावांना तात्काळ मंजुरी दिली जाईल. अशी ग्वाही कोकण विभागीय पर्यटन उपसंचालक डॉ. प्रज्ञा मनोहर यांनी दिली.
​ सह्याद्री कृषी पर्यटन सहकारी संस्थेच्यावतीने कुणकेरी सावंत फार्म ॲग्रो टुरिझम येथे आयोजित बैठकीत उपसंचालक डॉ. प्रज्ञा मनोहर बोलत होत्या. यावेळी सह्याद्री कृषी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष रामानंद शिरोडकर, उपाध्यक्ष प्रमोद सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा रविकांत सावंत, दिव्या वायंगणकर, विभावरी सुकी, जोश कन्नई, बाबुराव कविटकर, सुहास देसाई, देवेंद्र टेमकर, अनंत घोगळे, रूपेश धर्णे, नरेंद्र तारी, शाम कासार, पराशर सावंत, विराज घोगळे, धर्माजी गावडे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पर्यटनप्रेमी, उद्योजक आणि नवीन पर्यटन व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कोकण विभागीय पर्यटन उपसंचालक डॉ. प्रज्ञा मनोहर यांच्याशी जिल्ह्यातील पर्यटन सुविधा, अडचणी आणि नव्या प्रस्तावांवर सविस्तर चर्चा करताना ​सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत समृद्ध असला, तरी स्थानिक व्यावसायिकांना अनेक पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे लक्ष वेधण्यात आले. तसेच निवास-न्याहारी (होम स्टे) आणि कृषी पर्यटनाशी निगडित असलेल्या विविध परवानग्या, करांमधील सवलती आणि शासनाकडून मिळणाऱ्या सुविधांमधील अडचणी पर्यटन उपसंचालकांसमोर मांडण्यात आल्या. यावेळी डॉ. प्रज्ञा मनोहर यांनी जास्त लाभार्थी असल्यास भविष्यात एकत्रित कार्यशाळा घेऊन सर्व शंकांचे निरसन करण्याची ग्वाही दिली.

​’होम स्टे’ सह प्रस्तावांना ऑनलाईन मंजुरीची मागणी –

​जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणावर तरुण वर्ग पर्यटन व्यवसायाकडे वळत आहे. ग्रामीण भागात ‘निवास न्याहारी योजना’ आणि ‘कृषी पर्यटन केंद्र’ सुरू करण्यासाठी अनेक नवीन प्रस्ताव सादर केले जात आहेत. हे सर्व प्रस्ताव विहित वेळेत मंजूर व्हावेत, जेणेकरून स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीला वेग येईल, असे साकडे पर्यटन उपसंचालकांना सह्याद्री कृषी पर्यटन सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी घातले. यावेळी त्यांनी हे प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याचे आवाहन करत योग्य ते मार्गदर्शन केले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत