Headlines

ऋषभ पंतला कुठे मिळणार जमीन? मुख्यमंत्र्यांचा 12 तासांतच प्रतिसाद, पुष्कर सिंह धामी नेमकं काय म्हणाले?


Rishabh Pant News : भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतला उत्तराखंडमध्ये जमीन खरेदी करून दिल्लीहून आपल्या मायभूमीत शिफ्ट व्हायचे आहे. पंतने केलेल्या विनंतीनंतर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे, जाणून घ्या.

Rishabh Pant News
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतला आपल्या मायभूमी उत्तराखंडमध्ये परतायचे आहे. यासाठी तो गेल्या तीन वर्षांपासून आपल्या गरजेनुसार जमीन शोधत आहे. मात्र, अद्याप योग्य प्रॉपर्टी मिळालेली नाही. आता पंतने थेट उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडे मदत मागितली आहे. पंतच्या पोस्टची दखल घेत मुख्यमंत्र्यांनीही संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने निर्देश दिले आहेत.

पंतच्या पोस्टनंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

शुक्रवार-शनिवारच्या मध्यरात्री ऋषभ पंतने एक्सवर पोस्ट करत उत्तराखंडमध्ये जमीन खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याला सरकारी दरानुसार जमीन खरेदी करायची असल्याचेही त्याने सांगितले. पंतच्या या पोस्टला मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी उत्तर दिले. उत्तराखंडचा गौरव असल्याचे सांगत धामी यांनी पंतच्या मायभूमीवरील प्रेमाचे कौतुक केले. तसेच या विषयासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अधिकारी लवकरच पंतशी संपर्क साधतील आणि नियमानुसार शक्य ती सर्व मदत करतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे सध्यातरी ऋषभला कुठे जमीन मिळणार हे स्पष्ट झालेले नाही, पण त्याच्यासाठी राज्य सरकारनं पुढाकार घेतला आहे.

Maharashtra TimesAshleigh Gardner News : पत्नीचे चीटिंगचे आरोप, जॉर्जियाशी कथित अफेअरमुळे उपकर्णधार गार्डनरचं करिअर धोक्यात? वादात क्रिकेट बोर्डाच्या एन्ट्रीनं ट्वीस्ट

दिल्लीहून उत्तराखंडमध्ये शिफ्ट होण्याची इच्छा

ऋषभ पंतचा जन्म उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यातील रुडकी येथे झाला. क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी त्याने दिल्लीचा रस्ता धरला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो दिल्लीचे प्रतिनिधित्व करतो. मात्र, आता आपल्या मायभूमीत परतण्याची पंतची इच्छा आहे. गेल्या तीन वर्षांपासून तो उत्तराखंडमध्ये जमीन शोधत असल्याचे त्याने सांगितले. आपल्या गरजा पूर्ण करणारी प्रॉपर्टी अद्याप मिळाली नसल्याने त्याने मुख्यमंत्र्यांकडे मदत मागितली.

सध्या टीम इंडियासोबत श्रीलंका दौऱ्यावर

दरम्यान, ऋषभ पंत सध्या भारतीय संघासोबत श्रीलंका दौऱ्यावर आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेत पंतकडून टीम इंडियाला मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.

Maharashtra TimesCricketer Ramandeep Singh Wedding : टीम इंडियाच्या स्टार क्रिकेटरची 7 वर्ष मोठ्या लोकप्रिय अभिनेत्रीने काढली विकेट! गुपचूप उरकला विवाह, कोण आहे पत्नी?
असे असतानाच, क्रिकेटच्या मैदानाबाहेर पंतने आपल्या मायभूमीत कायमस्वरूपी स्थायिक होण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर पंतला त्याच्या गरजेनुसार जमीन मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.