![]()
माण तालुक्यातील लोधवडे येथील नाळावावस्तीवर मध्यरात्री वयस्कर दाम्पत्याच्या घरात घुसून शस्त्राचा धाक दाखवत सोन्याचे दागिने लुटणाऱ्या टोळीचा दहिवडी पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणी सात आरोपींसह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली हत्यारे, चार मोटारसायकली आणि रोख रक्कम असा सुमारे 3 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लोधवडे गावाच्या हद्दीतील नाळावावस्ती येथे नारायण बीरा चोपडे (वय 66) हे पत्नी तंगुबाई यांच्यासह राहत आहेत. 10 जुलै रोजी मध्यरात्री सुमारे दोनच्या सुमारास काही अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या घरात प्रवेश केला. शस्त्राचा धाक दाखवून दाम्पत्याला गप्प बसण्यास सांगितल्यानंतर आरोपींनी तंगुबाई यांच्याकडून पेटी व कपाटाच्या चाव्या घेतल्या. त्यानंतर घरातील पेटीतील मोहनमाळ, राणीहार, कर्णफुले आदी सोन्याचे दागिने काढून घेतले. घरातून बाहेर पडताना आरोपींनी तंगुबाई यांच्या गळ्यातील सोन्याचे मणीमंगळसूत्र हिसकावून तोडले. या घटनेत एकूण 2 लाख 60 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जबरीने चोरून नेण्यात आले. याप्रकरणी नारायण चोपडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दहिवडी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तांत्रिक पुरावे अन् गोपनीय माहितीच्या आधारे तपास गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. तांत्रिक पुरावे तसेच गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात आली. दहिवडी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी भाऊसाहेब गोसावी यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपास करून सात आरोपी आणि एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून चोरीस गेलेले सर्व सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली हत्यारे, चार मोटारसायकली आणि रोख रक्कम असा एकूण 3 लाख 70 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक निखील पिंगळे, उपविभागीय पोलिस अधिकारी वैशाली कडूकर आणि दहिवडी उपविभागाचे कॅम्प वडूज येथील उपविभागीय पोलिस अधिकारी रणजीत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी, महिला पोलिस उपनिरीक्षक चांदणी मोटे, पोलिस हवालदार श्रीनिवास सानप, रामचंद्र गाढवे, रविंद्र खाडे, सचिन जगताप, पोलिस नाईक नितीन धुमाळ, पोलिस कॉन्स्टेबल अजिनाथ नरबट, निलेश कुदळे, महेंद्र खाडे, अजय भोसले, मल्हारी खाडे तसेच सातारा सायबर विभागाच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी करीत आहेत.
Source link
माण तालुक्यात वयस्कर दाम्पत्याच्या घरावर दरोडा:सात आरोपींसह विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात, 3 लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त
