Team India Practice Match Against : श्रीलंका कसोटी मालिकेआधी टीम इंडियाच्या सराव सामन्यातील कामगिरीने चिंता वाढवली आहे. पाच खेळाडूंच्या अपयशामुळे टेस्ट संघाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी टीम इंडियासाठी सराव सामना हा तयारीची संधी होता. मात्र, श्रीलंका इलेव्हनविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाची कामगिरी पाहता अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यजमानांच्या संघाने भारतीय गोलंदाजांची परीक्षा घेतल्यानंतर फलंदाजांकडूनही सातत्यपूर्ण कामगिरी पाहायला मिळाली नाही. त्यामुळे दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेआधी टीम इंडियासाठी हा सामना एक प्रकारचा इशारा मानला जात आहे.
ऋषभ पंतकडून पुन्हा निराशा
ऋषभ पंतकडून मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र, सराव सामन्यात त्याला मोठी खेळी करता आली नाही. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्याकडून जबाबदारीने फलंदाजी करण्याची अपेक्षा असताना त्याच्या शॉट सिलेक्शनवर पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. टीम इंडियासाठी पंतचा फॉर्म हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
यशस्वी जयस्वाललाही या सामन्यात मोठी खेळी करता आली नाही. गेल्या काही काळातील त्याच्या कामगिरीचा आलेख अपेक्षेप्रमाणे राहिलेला नाही. वनडे संघात स्थान मिळवायचे असेल तर मोठ्या धावा करणे त्याच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
ध्रुव जुरेलकडेही स्वतःला सिद्ध करण्याची संधी होती. पंतच्या खराब फॉर्ममुळे भविष्यात विकेटकीपर-फलंदाज म्हणून आपली जागा मजबूत करण्याची संधी त्याच्याकडे आहे. मात्र, त्यालाही या सामन्यात प्रभाव पाडता आला नाही.
गोलंदाजीत प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांना अपेक्षित यश मिळाले नाही. सराव सामन्यात गोलंदाजांचा उद्देश प्रत्येक वेळी विकेट घेणे नसतो, हे मान्य असले तरी श्रीलंका इलेव्हनच्या फलंदाजांना रोखण्यात भारतीय गोलंदाजांना अडचणी आल्या.
असे असतानाच, देवदत्त पडिक्कल आणि रवींद्र जडेजा यांनी फलंदाजीत चांगली कामगिरी केली. मानव सुथार आणि गुरनूर ब्रार यांनीही धावांचे योगदान दिले. गोलंदाजीत कुलदीप यादव आणि जडेजाने विकेट्स मिळवल्या.
श्रीलंका मालिकेआधी मोठा इशारा
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीनंतर भारतीय कसोटी क्रिकेटमध्ये संकटाचा काळ सुरू आहे. मात्र, या प्रक्रियेला आता बराच काळ झाला आहे. त्यामुळे नव्या खेळाडूंनी सातत्याने चांगली कामगिरी करण्याची गरज आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा