Headlines

रबराच्या बदकांची शर्यत


अमेरिकेत शिकागो शहराच्या नजीक असलेल्या एका नदीत बदकांची शर्यत लावण्याची एक प्रथा आहे. अनेक वर्षांपासून प्रत्येक वर्षी या शर्यतीचे आयोजन करण्यात येते. मात्र, ही बदके नैसर्गिक नसून रबराची असतात. ज्यांना या शर्यतीत भाग घ्यायचा आहे, असे लोक 10 डॉलर खर्च करुन एक पिवळ्या रंगाचे रबराचे बदक विकत घेतात आणि ते बदक नदीत सोडून या शर्यतीत भाग घेतात.

या वर्षी या शर्यतीत 90 हजारहून अधिक बदकांनी भाग घेतला होता. ही शर्यत पाहण्यासाठी सहस्रावधी लोकांनी या नदीच्या काठी गर्दी केली होती. हे लोक त्यांच्या बदकांचा ‘उत्साह’ वाढविण्यासाठी तेथे जमा झाले होते. या शर्यतीचे नाव ‘शिकागो डकी डर्बी’ असे आहे. अशा प्रकारची शर्यत जगात हे स्थान सोडून अन्यत्र कोठेच आयोजित केली जात नाही. या शर्यतीचे स्वरुप असे आहे, की नदीच्या एका टोकाला ही सर्व बदके एकाचवेळी पाण्यात सोडली जातात. ती नैसर्गिक बदकांप्रमाणे पोहू लागतात. तशी व्यवस्था त्यांच्यात केलेली असते. त्यांच्यापैकी जे बदक शर्यतीची रेषा सर्वात आधी पार करेल, त्याच्या प्रायोजकाला पारितोषिक दिले जाते. शर्यत संपली की या बदकांना पाण्यातून बाहेर काढले जाते. या वर्षी या शर्यतीतून 7 लाख डॉलर्सची कमाई झालेली आहे. ही शर्यत का लावली जाते, असा प्रश्न विचारला जातो. त्याचे उत्तर आयोजकांनी दिले आहे. या शर्यतीतून मिळलेले धन विशेष इलिनॉय ऑलिंपिकला दिली जाणार आहे. बौद्धिकदृष्ट्या विकलांग असणाऱ्या खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षण, आवश्यक साधनसामग्री आणि उपचार देण्यासाठी या पैशाचा विनियोग केला जाणार आहे. या एका उदात्त सामाजिक उद्देशाने या शर्यतीचे आयोजन प्रत्येक वर्षी केले जाते. प्रत्येक वर्षी या कार्यक्रमाला मिळणाऱ्या लोकांच्या समर्थनात वाढ होत असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे. अशा प्रकारची ही जगातील एकमेव शर्यत असल्याने अनेकजण तिच्याकडे आकर्षित होतात. तिचा हेतू सामाजिक असल्याने लोकांना या शर्यतीसंबंधी एक प्रकारचा आदर वाटतो. अमेरिकेतील कोणालाही या शर्यतीत भाग घेण्याची मुभा असते. 10 डॉलरचे शुल्क भरुन कोणीही एक बदक प्रायोजित करु शकतो. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रायोजकांची संख्या 10 टक्के वाढली.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत