Ashleigh Gardner Monica Wright Cricket Australia Controversy : अॅशले गार्डनरची विभक्त झालेली पत्नी मोनिका राईट हिने आता ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डावर टीका केली आहे. अॅश्ले आणि जॉर्जिया वॉल यांच्या कथित प्रेमसंबंधांवर बोलताना आता तिने क्रिकेट ऑस्ट्रेलियावर आगपाखड केली आहे. तिने नेमकं काय म्हटलं आहे? जाणून घेऊयात.

जुलै २०२६ मध्ये सर्वात आधी हे प्रकरण बाहेर आलं होतं. तिने यावेळी सोशल मीडियावरुन गार्डनरच्या कथित अफेअरवरुन आरोप केले होते. त्यानंतर आता तिने कोड स्पोर्ट्सशी संवाद साधताना क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या कोणत्याही कारवाई न करण्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. तिने मांडलेल्या प्रतिक्रियेत असं म्हटलं आहे की, “देशाचे नेतृत्व करणाऱ्या आणि आदर्श मानल्या जाणाऱ्या खेळाडूंकडून नैतिक मानकांचे पालन होणे अपेक्षित आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या प्रकरणात सार्वजनिकरित्या एका शब्दाचेही भाष्य केलेलं नाही. असं का झालं हेही कळत नाही. क्रिकेट बोर्डाच्या मौनाचा अर्थ त्यांचा गार्डनर आणि वॉल यांच्या कथित प्रेमसंबंधांना पाठिंबा आहे असा घ्यायचा का,” असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
सोशल मीडियावरुन प्रकरण समोर
दरम्यान, जुलै महिन्यामध्ये राईटने सर्वात आधी या प्रकरणावर भाष्य केलं होतं. तिने त्यावेळी सोशल मीडियावर एक पोस्ट करत मला काही सांगायचंय असं म्हटलं होतं. त्यानंतर दुसऱ्या एका पोस्टमध्ये तिने गार्डनर आणि जॉर्जिया वॉल या दोघींचा एकत्र असलेला फोटो पोस्ट करुन पती-पत्नी या नात्यात आपली फसवणूक केली गेल्याचा आरोप केला होता. दरम्यान त्यापूर्वीपासून काही माध्यमांनी गार्डनर आणि राईट यांच्यातल्या वैवाहिक जीवनात अडचणी आणि कथित अफेअर असल्याच्या बातम्या प्रसारीत केल्या होत्या. पण त्यामध्ये कोणाचेही नाव घेण्यात आलेले नव्हते. पण राईटने केलेल्या या पोस्टनंतर सर्वांना धक्का बसला होता.
दरम्यान, गार्डनर आणि राईट या दोघींनी एप्रिल २०२५ मध्ये विवाह केला होता. पण त्यांच्या नात्यात लगेचच दुरावा निर्माण झाल्याचेही सांगण्यात येत होते. विशेषकरुन २०२५ मध्ये भारतातील महिला विश्वचषकादरम्यान त्याच्यातला दुरावा वाढला होता हा दुरावा दूर करण्यासाठी राईटने भारत गाठला होता, पण संघातील काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोघींच्या नात्यामधील अस्वस्थता स्पष्टपणे समोर आली होती. त्यानंतर दोघींनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. गार्डनरने सिडनीमधील घर सोडून घटस्फोटाची प्रक्रिया सुरु केली आहे. दरम्यान या सर्व आरोपांवर गार्डनर आणि वॉल यादोघींनीही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
ऑस्ट्रेलिया बोर्डाची प्रतिक्रिया काय?
दरम्यान, राईटने क्रिकेट ऑस्ट्रेलियावर केलेल्या आरोपांनंतर बोर्डाची प्रतिक्रिया समोर आली आहे. “ही पूर्णपणे वैयक्तिक बाब आहे”, असं म्हटलं आहे. परस्परविरोधातल्या हितसंबंधातून नेतृत्व करणाऱ्या कोणाच्याही कामात अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी आम्ही पूर्ण सहकार्यासाठी तयार असतो, संघातली एकी टिकावी यालाच आम्ही सर्वोच्च प्राधान्य देतो. असं ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने म्हटलं आहे.
गार्डनरला मिळतोय पाठिंबा
दरम्यान, या वादाच्या पार्श्वभूमीवर गार्डनरला पाठिंबा मिळताना दिसत आहे. डब्ल्यूबीबीएल, सिडनी सिक्सर्स या फ्रँचायझींनी तिला पाठिंबा जाहिर केला आहे. तर ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाच्या मॅनेजर रॅचेल हेन्स यांनी गार्डनरच्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टींवर भाष्य करण्यास नकार दिला, पण त्याचवेळी त्यांनी तिच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी बोलणं झाल्याचं सांगितलं आहे.

