Headlines

तब्बल 23 कोटींचा गोल्ड लोन घोटाळा, डोकं चक्रावणारं प्रकरण, खोटं सोनं गहाण ठेवून नामांकीत बँकेकडून लोन घेतलं


नागपुरात तब्बल 23 कोटींचा गोल्ड लोन घोटाळा समोर आला आहे. विशेष म्हणजे आरोपीवर खोटं सोनं गहाण ठेवून कर्ज मिळावल्याचा आरोप आहे. या प्रकरणी धक्कादायक प्रकार समोर आले आहेत.

Nagpur News
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नागपूर : बनावट सोन्याचे दागिने खरे असल्याचे भासवून ते बँकेत गहाण ठेवत कोट्यवधी रुपयांचे गोल्ड लोन घेतल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात समोर आला आहे. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत कथित मास्टरमाइंड सचिन राऊत याला अटक केली आहे. आतापर्यंत या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. आयसीआयसीआय (ICICI) बँकेच्या विविध शाखांमधील तब्बल 152 गोल्ड लोन खात्यांमध्ये अनियमितता आढळून आली आहे. या कथित फसवणुकीची रक्कम 23 कोटी 31 लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचे तपासात समोर आले आहे.

या प्रकरणाचा खुलासा 18 ऑक्टोबर 2025 रोजी गोल्ड लोन खात्यांच्या ऑडिटदरम्यान झाला. एका खात्यात गहाण ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या शुद्धतेबाबत संशय निर्माण झाला. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने तपासाचा विस्तार करत आयसीआयसीआय (ICICI) बँकेच्या विविध शाखांमधील गोल्ड लोन खात्यांची तपासणी सुरू केली.

तब्बल 152 गोल्ड लोन खात्यांमध्ये कथित अनियमितता

मनीष नगर, मेडिकल चौक, नरसाळा, काटोल रोड, अजनी चौक, छत्रपती चौक, वर्धा रोड, प्रतापनगर आणि नंदनवन येथील शाखांमध्ये तपास केल्यानंतर 152 गोल्ड लोन खात्यांमध्ये कथित अनियमितता आढळली. आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासानुसार, सचिन राऊत हा या संपूर्ण प्रकरणाचा कथित मास्टरमाइंड असल्याचे समोर आले आहे.

आरोपीने घोटाळा नेमका कसा केला?

सचिन राऊतने 2018-19 मध्ये स्वतः ICICI बँकेतून गोल्ड लोन घेतले होते. त्यानंतर त्याने आपल्या कर्जाची मर्यादाही वाढवून घेतली. पुढे त्याने कथितरित्या बनावट गोल्ड लोन ग्राहकांची व्यवस्था करण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे. या माध्यमातून विविध शाखांमध्ये बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कर्ज उचलण्यात आल्याचा संशय आहे.

सोन्याचे मुल्यांकन करणाराही संशयाच्या भोवऱ्यात

या प्रकरणात सोन्याच्या दागिन्यांचे मूल्यांकन करणाऱ्या अप्रेझर नंदू खरवडेची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात आहे. त्याने तब्बल 155 बनावट दागिने खरे असल्याचे प्रमाणित केल्याचा आरोप आहे. प्रत्येक मूल्यांकन अहवालासाठी त्याला कथितरित्या पाच हजार रुपये मिळत असल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच मित्र, नातेवाईक आणि परिचितांसह 38 कथित बनावट ग्राहकांची ओळख उपलब्ध करून दिल्याचाही त्याच्यावर आरोप आहे.

आर्थिक गुन्हे शाखेने कशी कारवाई केली?

आर्थिक गुन्हे शाखेने संशयित गोल्ड लोन खात्यांमधील आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्याबरोबरच आरोपींच्या कॉल डिटेल रेकॉर्डचीही (CDR) पडताळणी केली. या तपासातून कर्जदार, दागिन्यांचे अप्रेझर आणि बँकेशी संबंधित व्यक्तींमध्ये झालेल्या संपर्काची माहिती पोलिसांच्या हाती लागली. त्यानंतर आरोपींच्या ठिकाणांवर छापे टाकून मोबाइल फोन, लॅपटॉप, वाहने, बँकेशी संबंधित कागदपत्रे तसेच कथित बनावट ग्राहकांच्या याद्या जप्त करण्यात आल्या.

कर्ज देताना नियमांचे पालन झाले होते का?

दरम्यान, या प्रकरणाचा तपास आता बँक अधिकारी, गोल्ड लोन विभागातील कर्मचारी, अप्रेझर तसेच ऑडिटरपर्यंत पोहोचला आहे. कर्ज मंजूर करताना बँकेच्या नियमांचे पालन झाले होते का? बनावट दागिने मूल्यांकन प्रक्रियेत अस्सल म्हणून कसे प्रमाणित झाले आणि त्यांच्या आधारे कोट्यवधी रुपयांचे कर्ज कसे मंजूर झाले, याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

Maharashtra TimesMaharashtra Rain : महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस कधी येणार? पंजाबराव डख यांचा नवा हवामान अंदाज

23 कोटी 31 लाख रुपयांच्या फसवणुकीचा तपास सुरु

गोल्ड लोन मंजूर झाल्यानंतर सुमारे तीन महिन्यांनी खात्यांचे ऑडिट करणारे प्रमोद टेटे, राजेंद्र शिलंकार आणि धनंजय धोमणे यांची भूमिकाही तपासली जात आहे. कथितरित्या पैशांच्या मोबदल्यात बनावट दागिन्यांना खरे सोने असल्याचे प्रमाणित करून अहवाल दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. सचिन राऊतसह आतापर्यंत सात आरोपींना अटक झाली असून, 152 गोल्ड लोन खात्यांमधील कथित गैरव्यवहार आणि 23 कोटी 31 लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या फसवणुकीचा तपास सुरू आहे.