Headlines

नेपाळच्या महाप्रलयातून महाराष्ट्रातील भाविकांची सुखरूप घरवापसी:नागपूरचे 106 तर मुंबईत 37 नागरिक सुरक्षित; मुंबईतील डॉक्टर दाम्पत्याशी संपर्क तुटला




नेपाळमध्ये आलेल्या भीषण महाप्रलयात 600 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून हजारो लोक बेपत्ता आहेत. या नैसर्गिक आपत्तीत जखमी झालेल्यांवर काठमांडू येथील रुग्णालयात उपचार सुरू असून त्यात काही भारतीयांचाही समावेश आहे. या जीवघेण्या संकटात अडकलेल्या महाराष्ट्रातील भाविकांना सुखरूप मायदेशी आणण्यात प्रशासनाला यश आले आहे. या बचावकार्यांतर्गत राज्यातील इतर भागांतील 37 नागरिक मुंबईत सुखरूप पोहोचले आहेत, तर नागपूरचे 106 भाविक आपल्या घराकडे रवाना झाले आहेत. काठमांडूमध्ये अडकलेल्या या भाविकांच्या सुरक्षित देशवापसीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने पुढाकार घेतला. त्यांनी नेपाळ प्रशासनाशी समन्वय साधून भाविकांना सुरक्षित बाहेर काढण्याच्या सूचना दिल्या. या विशेष प्रयत्नांतून काठमांडू प्रशासनाने चार खासगी बसची व्यवस्था केली आणि शुक्रवारी सर्व 106 भाविकांना सुरक्षितपणे नेपाळ सीमेवरील सीतामढी येथे आणण्यात आले. शासनाच्या या तत्परतेमुळे जीव मुठीत धरून अडकलेल्या भाविकांना आणि त्यांच्या चिंतेत असलेल्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला. सीतामढी येथे पोहोचल्यानंतर बिहार सरकारच्या सहकार्याने या सर्व भाविकांना रात्री पाटणा येथे आणण्यात आले. तेथून त्यांच्या पुढील रेल्वे व विमान प्रवासाचे नियोजन करण्यात आले. यातील 4 भाविक विमानाने दिल्लीला पोहोचले असून तेथून ते केरळ एक्स्प्रेसने नागपूरकडे रवाना झाले. तर, उर्वरित 102 भाविक शनिवारी सकाळी 7:36 वाजता पाटणा येथून रेल्वे क्रमांक 17609 ने नागपूरच्या दिशेने सुखरूप मार्गस्थ झाले आहेत. संकटाच्या काळात प्रशासनाकडून मिळालेल्या या जलद आणि नियोजनबद्ध मदतीबद्दल सर्व प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. 37 भाविकांची मुंबईत सुखरूप वापसी कैलास मानसरोवर यात्रेहून परतताना नेपाळमधील महाप्रलयानंतर तिबेटच्या सागा येथे अडकलेले महाराष्ट्रातील 37 भाविक आज मुंबईत परतणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या तातडीच्या पुढाकारामुळे या सर्व पर्यटकांना सुरक्षितपणे मायदेशी आणणे शक्य झाले. काठमांडूहून हे भाविक काही वेळातच मुंबई विमानतळावर दाखल होणार असून, त्यांच्या स्वागतासाठी भाजप आमदार मनीषा चौधरी आणि माजी नगरसेवक विनोद शेलार उपस्थित आहेत. मुंबईतील डॉक्टर दाम्पत्याशी संपर्क तुटला एकीकडे भाविक परतत असताना, नेपाळमध्ये अडकलेल्या मुंबईतील एका डॉक्टर दाम्पत्याचा मात्र अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. हिंदुजा रुग्णालयातील रक्त संक्रमण शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. आनंद देशपांडे आणि नानावटी रुग्णालयाच्या प्रसूती व स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख डॉ. गायत्री देशपांडे हे ‘हिल्स अँड ट्रेल्स’ या टूर कंपनीमार्फत नेपाळला गेले होते. बुधवारी सकाळी 8.28 वाजता त्यांचा कुटुंबीयांशी शेवटचा संपर्क झाला होता. त्यानंतर व्हॉट्सॲप मेसेज करूनही त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही. राज्य सरकारकडून शोधकार्यासाठी वेगाने प्रयत्न डॉ. देशपांडे दाम्पत्यासह महाराष्ट्रातील आणखी अनेक पर्यटक नेपाळच्या या नैसर्गिक आपत्तीत अडकले असण्याची शक्यता आहे. या सर्व बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी राज्य सरकारकडून केंद्र सरकार आणि नेपाळ प्रशासनाशी सातत्याने समन्वय साधला जात आहे. नेपाळ सरकारचे विशेष बचाव पथकही या अडकलेल्या पर्यटकांच्या शोधासाठी रवाना झाले असून, शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत