Nagpur News: नागपूरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नोंदणी कक्षा पासून डॉक्टरांच्या तपासणीपर्यंत जाण्यासाठी रुग्णांना तासंतास प्रतिक्षा करावी लागत आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
अनिकेत शास्त्री, नागपूर: शासकीय स्तरावर आरोग्य सेवांचा विस्तार झाल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला, तरी प्रत्यक्षात शासकीय रुग्णालयांतील रुग्णांची गैरसोय कायम आहे. वाढत्या उपचारखर्चामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांसाठी मोठा आधार ठरणाऱ्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सध्या अव्यवस्थेचे चित्र आहे. मोजक्या नोंदणी कक्षांच्या भरवशावर ९ ते १० विभागांचा कारभार सुरू असल्याने उपचारासाठी येणाऱ्या शेकडो रुग्णांना नोंदणीपासून डॉक्टरांच्या तपासणीपर्यंत तासनतास ताटकळत राहावे लागत आहे.
चार हजार रुग्ण उपचारासाठी येतात
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सध्या न्यूरॉलॉजी, नेफ्रॉलॉजी, कार्डिओलॉजी, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, सीटीव्हीएस, युरोलॉजी यांसारखे महत्त्वाचे विभाग कार्यरत आहेत. प्रत्येक विभागाची आठवड्यातून दोन दिवस ओपीडी होते. सर्व विभागांमिळून दररोज सुमारे ६००हून अधिक, तर आठवडाभरात जवळपास चार हजार रुग्ण उपचारासाठी येतात. नागपूर शहरासह विदर्भातील विविध जिल्हे आणि मध्य प्रदेशातूनही रुग्ण येथे उपचारासाठी दाखल होतात.
रुग्णालयात पोहोचल्यानंतर वेगळाच मनस्ताप
चांगले उपचार मिळतील, या आशेने शेकडो किलोमीटर अंतरावरून येणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मात्र रुग्णालयात पोहोचल्यानंतर वेगळाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. उपचारासाठी सर्वप्रथम ओपीडी नोंदणी करणे अनिवार्य असते. मात्र, नोंदणी कक्षाची यंत्रणा अपुरी पडत असल्याने रुग्णांची पहिलीच पायरी अडथळ्यांची ठरत आहे.
येथे दोन ते तीन काउंटर असले, तरी नवीन आणि जुन्या रुग्णांच्या वर्गीकरणाव्यतिरिक्त विशेष व्यवस्था नाही. गंभीर रुग्ण, महिला, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र रांग किंवा वेगळा काउंटर नाही. त्यामुळे सर्वांनाच एकाच रांगेत उभे राहावे लागते. नोंदणीसाठीच रुग्णांना अर्धा ते पाऊण तास, तर अनेकदा दोन-दोन तास वेदना सहन करत प्रतीक्षा करावी लागत असल्याच्या तक्रारी आहेत.
ओपीडीसमोर पुन्हा रांग
नोंदणी पूर्ण झाल्यानंतरही रुग्णांचा त्रास संपत नाही. संबंधित ओपीडीसमोर पुन्हा रांग लागते. सकाळी रुग्णालयात पोहोचलेले अनेक रुग्ण दुपारपर्यंत केवळ नोंदणी आणि तपासणीच्या प्रतीक्षेत असतात. आजारामुळे आधीच अशक्त झालेल्या रुग्णांसाठी ही प्रतीक्षा अधिक त्रासदायक ठरत आहे.
“माझ्या पत्नीला हृदयाचा त्रास असल्याने कार्डिओलॉजी विभागात वारंवार यावे लागते. तपासणीपूर्वी नावनोंदणी करावी लागते आणि त्यासाठी मोठी रांग असते. नोंदणी झाल्यानंतर ओपीडीसमोर पुन्हा प्रतीक्षा करावी लागते. आजारामुळे पत्नीला आधीचत्रासअसताना इतका वेळ उभे राहणे किंवा बसून वाट पाहणे कठीण जाते. दूरवरून येत असल्याने पुन्हा-पुन्हा नागपुरात येणेही शक्य नसते. रांगेत उभे राहण्यातच अर्धा दिवस जातो. रुग्णसंख्या वाढत असेल, तर प्रशासनाने नोंदणी काउंटर आणि ओपीडीची व्यवस्था वाढवायला हवी,” असे उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाने सांगितले.
लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.
कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.
महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.
२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.… आणखी वाचा