अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा एकेकाळी एका महिलेच्या सर्व गोष्टी ऐकायचा. तो एकवेळ आपल्या आई-वडिलांचं ऐकणार नाही, पण या महिलेच्या गोष्टी ऐकायचा. त्यामागे कारणही तसंच होतं. दाऊद या महिलेला आई मानायचा. ही महिला होती, मुंबईतली दारु माफिया. तिचं नाव होतं जेनाबाई दारुवाली! याच जेनाबाईची विस्तृत माहिती आपण जाणून घेऊयात.

गुन्हेगारीला प्रोत्साहन देणं असा आमचा अजिबात हेतू नाही. पण मुंबईच्या इतिहासात अशा काही गोष्टी घडून गेल्या ज्याची माहिती सर्वांना व्हावी, हाच यामागचा प्रामाणिक हेतू आहे. ज्येष्ठ पत्रकार एस. हुसेन झैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकात दाऊद जिला आई मानायचा त्या जेनाबाई दारुवालीची कहाणी सांगितली आहे. हीच जेनाबाई दारुवाली कोण होती? ते आपण जाणून घेऊयात.
जेनाबाई कोण होती?
झैनाब उर्फ जेनाबाई! मुंबईच्या माफिया महिलांमध्ये नाव घेतलं जाणारी पहिली महिला. ही महिला फार धूर्त होती, असा इतिहास सांगतो. जेनाबाई हिचा जन्म 1920 मध्ये मुस्लीम मेमन हलाई कुटुंबात झाला. जेनाबाईचे वडील व्हिक्टोरीया गाडी चालवायचे. तेच त्यांच्या कुटुंबाचं उदरनिर्वाहचं साधन होतं. जेनाबाई ही सहा भावंडांपैकी एक होती. मुंबईच महंमद अली रोडवरच्या डोंगरी येथील चाळीत एका खोलीत संपूर्ण कुटुंब राहायचं.
जेनाबाईचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग
1920 आणि 1930 च्या काळात मुंबईत स्वातंत्र्य लढ्यासाठी आंदोलने व्हायची. जेनाबाई हिनेदेखील स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभाग घेतल्याचं बोललं जातं. महात्मा गांधींच्या स्वातंत्र्य चळवळीची ती समर्थक होती, असं झैदी यांनी आपल्या पुस्तकात लिहीलं आहे.
जेनाबाई 14 वर्षांची असताना तिचा निकाह मोहमद शाह दरवेशबरोबर झाला. निकाहनंतर ती डोंगरीतल्या चुनावाला बिल्डिंगमध्ये राहायला गेली. पती दरवेशचा छोटा लाकडाचा व्यवसाय होता. जेनाबाईला दरवेशपासून पाच मुलं झाली. खदिजा, इक्बाल, सलीम, कमाल आणि शम्मी अशी त्यांची नावे होती. स्वातंत्र्य पूर्व काळात ब्रिटिशांनी ‘फोडा आणि राज्य करा’ हे धोरण अवलंबत हिंदू-मुस्लीम दंगली घडवून आणल्या. त्या काळात जेनाबाई हिंदूंना संरक्षण द्यायची. पण यामुळे तिला पतीकडून मारही खावा लागे.
फाळणीनंतर पती पाकिस्तानला गेला
देशाला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले. अखंड भारत हा दोन भागात विभागला गेला. जेनाबाईचा पती दरवेश हा पाकिस्तानला गेला. त्याने जेनाबाईला पाकिस्तान घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केला. पण जेनाबाईने ऐकलं नाही. जेनाबाई आपल्या पाच लेकरांसह मुंबईतच राहिली होती.
जेनाबाई सुरुवातीला चावलवाली म्हणून प्रसिद्धीच्या झोतात
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मुंबईत त्या काळात धान्य आणि तांदूळ यांची चणचण भासू लागली. त्या काळात जेनाबाईने आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी झटपट पैसा कमवण्याचा रस्ता धरला. यासाठी तिने घाऊक धान्यविक्रेते आणि काळ्या बाजारात चढ्या दराने धान्य विकणारे दुकानदार यांच्यामधील दलाल म्हणून तिने काम केलं. परवनागीशिवाय धान्य साठवणं आणि त्याची विक्री करणं शिक्षापात्र गुन्हा होता. पण जेनाबाई ते काम करायचं. विशेष म्हणजे पोलिसांनी अनेकदा जेनाबाईच्या चुनावाला येथील घरी छापा टाकला. पण पोलिसांना कधीच तिच्यावर गुन्हा दाखल होईल इतका पुरावा मिळाला नाही.
जेनाबाई ही मेमन असल्याने तिला चांगली गुजराती बोलता यायची. तसेच बहुसंख्य धान्य व्यापारी आणि दुकानदार हे गुजराती असल्याने त्यांच्याशी व्यवहार करणं जेनाबाईला सोप्प जाई. याशिवाय तांदूळच्या व्यवसायामुळे ती ‘जेनाबाई चावलवाली’ म्हणून ओळखली जाऊ लागली.
जेनाबाई आणि वरदराजन मुदलियारची भेट
जेनाबाईने पुढे 1950 च्या सुमारास इक्बाल गांधी नावाच्या व्यक्तीसोबत पुनर्विवाह केला. तिचा धान्याचा व्यवसाय सुरुच होता. पण त्याने फार कमी पैसे मिळायचे. त्यामुळे जेनाबाईला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ बिस्मिला शाहबाबांचा पुरातन दर्गा आहे, तिथे वरदाराजन नावाचा व्यक्ती गरिबांना दानधर्म करायचा, अशी माहिती मिळाली. जेनाबाईने वरदाची भेट घेतली आणि त्याच्याकडे आपल्या बिकट परिस्थितीचं रडगाणं गायलं.
वरदाराजनची माणसं त्यावेळी मुंबईत दारु बनवण्याचे काम करत होते. मुंबईत त्या काळात दारुबंदी होती. अशावेळी वदराला देखील मदतीची गरज होतीच. त्याने जेनाबाईला दारुविक्रिचा प्रस्ताव ठेवला. सुरुवातीला जेनाबाईने नकार दिला. पण नंतर जेनबाईने त्याला होकार दिला. जेनाबाईच्या मदतीने वरदाने प्रचंड दारुची विक्री केली. तसेच पुढे वरदराजनने हाजी मस्तान आणि करीम लाला यांच्यासोबत दोस्ती केली. वरदानेच जेनाबाईची या दोघांशी ओळख करुन दिली.
जेनाबाईचे दाऊदच्या कुटुंबियांसोबत संबंध
दारुच्या व्यवसायातून जेनाबाईने अफाट पैसा कमावला. त्याचबरोबर वरदाराजन, करीम लाला आणि मस्तान यांच्यासोबत चांगले संबंध प्रस्थापित झाल्याने जेनाबाईला मुंबईतील माफियांमध्ये विशेष ओळख मिळाली. तिचा दबदबा वाढला. कुख्यात गुंडांसोबत संबंध असल्याने हळूबळू जेनाबाईचे पोलिसांसोबत चांगले संबंध प्रस्थापित झाले. ती पोलिसांची खबरी झाली. याच काळात तिचे पोलीस कॉन्स्टेबल इब्राहिम कासकर आणि त्याची पत्नी आमिना यांच्यासोबत ओळख झाली. हे इतके जवळचे झाले की तिच्या कुटुंबाचा भाग झाले. दाऊद इब्राहिम हा त्यांचाच मुलगा होता. तिचा दाऊद सोबत जिव्हाळा होता. दाऊद तिला आई मानायचा.
जेनाबाईच्या घरात पोलिसांचा छापा
पोलिसांनी 1962 मध्ये जेनाबाईच्या घरावर छापा टाकला. तिचा सहकारी असलेल्या विकीच्या खोलीत पाण्याच्या टाकीत दारु आढळली. त्यामुळे जेनाबाईला अटक झाली. विशेष म्हणजे अटक झाल्यानंतर जेनाबाईची त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासोबत भेट झाल्याची चर्चा समोर आली होती. त्यावेळी जेनाबाईने आपली गरिबीची परिस्थितीमुळे आपल्याला असे धंदे करावे लागत असल्याचं म्हटलं होतं. तिने खूप रंगवून आपली व्यथा मांडली होती. त्यानंतर जेनाबाई ही पोलिसांची खबरी झाली होती.
जेनाबाईने दाऊदला वाचवलं
दाऊद हा त्या काळात तरुण होता. तो एका टोळीचा प्रमुख होता. त्याच्या मारामाऱ्या आणि गुंडगिरीमुळे त्याचे पोलीस कॉन्स्टेबल वडील इब्राहिम कासकर हे वैतागले होते. त्याच्या कृत्यांमुळे वडिलांनादेखील शरमेने मान खाली घालावे लागे. एकदा दाऊदने मनीष मार्केटमधील गुंड हमीद चूहा याच्यासोबत हाणामारी झाली. यात चूहा प्रचंड जखमी झाला. त्याला आयसीयूत दाखल करावे लागले होते. त्यावेळी इब्राहिम कासकर आपल्या मुलावर प्रचंड संतापले होते. दाऊद आठवडाभर घरी गेला नाही. पण जेनाबाईने त्यावेळी इब्राहिम कासकर आणि आमिना यांना समजावलं होतं. तसेच पोलीस अधिकाऱ्यांसोबतही मध्यस्थी केली होती. त्यामुळे दाऊद बचावला होता. त्यामुळे दाऊद जेनाबाईचं ऐकायचा.
जेनाबाईने आणलं सर्व गुन्हेगारांना एकसंघ
जेनाबाईने पुढे दाऊद इब्राहिम ज्या मुस्लीम टोळीच्या लोकांशी वाद घालायचा त्या सर्वांशी जेनाबाईने मध्यस्थी करत दाऊदसोत मैत्री करायला भाग पाडले. तसेच हाजी मस्तान आणि करीम लाला यांच्यासोबत दाऊची ओळख करुन दिली. पुढे पठाण टोळीचा मुख्य करीम लाला, त्याची टोळी, दाऊद, साबीर, माजिद कालिया, हुसेन सोमजी, दिलीप अजीज आणि हनिफ हे जेनाबाईच्या प्रयत्नांमुळे एक झाले. त्यांनी एकत्र पुढे गुन्हेगारी विश्वात काम केलं.

