Headlines

लेकी मानलं तुला! आईच्या कष्टाचं चीज केलंस, कांचनने जळगावकरांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आणले


आयुष्यात प्रेरणा घ्यावी म्हणजे नेमकी कुणाची घ्यावी हे जळगावच्या कांचन महाजन नावाच्या तरुणीने दाखवून दिलं आहे. काचंन हिने एमपीएससी परीक्षेत 23 व्वा रँक मिळवत ‘राज्य कर निरीक्षक’ पदी बाजी मारली आहे. कांचनच्या वडिलांचं 19 वर्षांपूर्वी निधन झालं. आईने मोलमजुरी करुन मुलीला वाढवलं. त्याच मुलीने आज आईच्या कष्टाचं चीज केलं.

Jalgaon Student Kanchan Mahajan Achieved 23rd rank in MPSC Exam
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
निलेश पाटील, जळगाव : ज्या हातांनी आयुष्यभर दुसऱ्याच्या शेतात खुरपणी केली, उन्हातान्हात कष्ट उपसले, आज त्याच आईच्या हातांनी आपल्या लेकीच्या डोक्यावर यशाचा गुलाल उधळला. वडिलांचे छत्र हरपल्यानंतरही हिंमत न हारता, केवळ आईच्या घामाचे चीज करण्यासाठी अहोरात्र एक करणाऱ्या कांचन महाजन यांनी MPSC परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवले आहे. त्यांची ‘राज्य कर निरीक्षक’ (STI) पदी निवड झाली आहे. एका शेतमजूर आईच्या संघर्षाचे रूपांतर आज स्वाभिमानाच्या सुवर्णक्षणात झाले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या STI (सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर) पदाच्या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. कांचन जयंत महाजन यांनी ओबीसी प्रवर्गातून 23 व्या क्रमांकाने दैदिप्यमान यश मिळवत STI पदावर निवड झाली आहे. कांचनच्या या यशाची बातमी समजताच कुटुंबीयांनी आनंदोत्सव साजरा केला.

कांचन यांच्या वडिलांचे 19 वर्षांपूर्वी निधन

कांचन महाजन हिने बी.एस्सी.पर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांच्या वडिलांचे 19 वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या आई हेमलता महाजन यांच्या खांद्यावर आली. एक मुलगा आणि एक मुलगी अशा दोन्ही मुलांचे पालनपोषण करण्यासाठी हेमलता महाजन यांनी परिस्थितीशी दोन हात करत शेतात शेतमजुरी केली. उन्हाची, पावसाची आणि कष्टाची पर्वा न करता त्यांनी मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले.

Kanchan Mahajan

आईने लेकरांसाठी जीवाचं रान केलं

समाजात असे म्हटले जाते की वडील हे मुलांचे आधारस्तंभ असतात. कांचनचा तोच आधार 19 वर्षांपूर्वी हरपला. पण आई त्यांच्यासाठी ढाल बनवून उभी राहिली. वडिलांचे निधन झाले आणि नियतीने मोठा आघात केला. पण, खचून न जाता आईने स्वतःच्या दुःखाला बाजूला सारत संसाराचा गाडा हाकला. दुसऱ्याच्या शेतात मजुरी करून, दिवस-रात्र घाम गाळून आईने कांचन यांच्या पाठीशी भक्कम ढाल बनून उभे राहणे पसंत केले. “पोटाला पीळ पडला तरी चालेल, पण लेकीच्या शिक्षणात खंड पडू देणार नाही,” या एकाच ध्येयाने आईने आयुष्यभर कष्ट उपसले.

आईच्या या संघर्षाला कांचनने आपल्या जिद्दीची आणि मेहनतीची जोड दिली. अनेक अडचणी, आर्थिक परिस्थिती आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत तिने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली. अखेर एमपीएससीच्या अंतिम निकालात 23 वा क्रमांक मिळवत तिने आपल्या आईच्या कष्टाचे चीज केले.

आईच्या कष्टामुळेच शिखर गाठले

“आईने केलेल्या कष्टांमुळेच आज मी या यशाच्या शिखरावर पोहोचले,” अशी भावना कांचन महाजन यांनी व्यक्त केली. आपल्या यशानंतर त्यांनी युवक-युवतींना प्रेरणादायी संदेश देताना सांगितले की, “आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि आपण करत असलेल्या मेहनतीवरही विश्वास ठेवा. नैराश्यात जगू नका. आजच्या हायटेक युगात युवक-युवतींसमोर यशाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. गरज आहे ती त्या संधी ओळखून जिद्दीने प्रयत्न करण्याची.”

कांचन यांची भावूक करणारी प्रतिक्रिया

“वडिलांचे मी 5 वर्षाची असतांना निधन झाले. मला एक भाऊ कुणाल महाजन त्याचे देखील MBA चे शिक्षण आईने पूर्ण केले. आई दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करून आम्हला सांभाळायची आणि आमचे शिक्षण पूर्ण केले. माझे हे यश कोणत्याही पुस्तकातून किंवा क्लासमधून आलेले नाही, तर ते माझ्या आईच्या शेतातील घामातून आले आहे. तिने माझ्यासाठी स्वतःची स्वप्ने मारली. आज मी जे काही आहे, ते फक्त आणि फक्त तिच्या त्यागामुळे आहे”, असं कांचन महाजन म्हणाल्या.

कांचन यांचं यश तरुणांना प्रेरणा देणारं

कांचन महाजन यांच्या या यशामुळे विधवा आईच्या संघर्षाला, मुलीच्या जिद्दीला आणि मेहनतीला मिळालेला हा विजय म्हणून रावेर शहरात त्यांच्या कुटुंबाचे कौतुक होत आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मिळवलेले कांचनचे यश अनेक विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवक-युवतींसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.