Javed Miandad, Imran Khan News : इमरान खानच्या तुरुंगातील परिस्थितीवर बोलताना जावेद मियांदाद हे कॅमेऱ्यासमोर भावूक झाले. इमरानच्या प्रामाणिकपणाची शपथ घेत त्याने पाकिस्तान सरकारकडे एक मोठी विनंतीवजा मागणी केली आहे.

इमरानसाठी मियांदाद भावूक
एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत मियांदाद यांनी इमरान खान यांच्या तुरुंगातील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. त्यांनी म्हटलं की, ते इमरानला अनेक वर्षांपासून ओळखतात आणि त्यांच्या प्रामाणिकपणावर त्याचा पूर्ण विश्वास आहे. “तो एक प्रामाणिक माणूस आहे. त्याने भ्रष्टाचार केला असता तर आतापर्यंत त्याने खूप काही कमावले असते. त्याला बाहेर येऊ दिलं तर काय होणार आहे? तो कोणाचं नुकसान करणार आहे का? तोही कोणाचा तरी मुलगा आहे,” असे मियांदाद यांनी म्हटलं आहे.
Robin Uthappa : एकविसाव्या वर्षीच 3.2 कोटी रुपये कमावले; पण त्यामुळेच 23व्या मजल्यावरुन उडी मारणार होता रॉबिन उथप्पा, नेमकं काय घडलेलं?
इमरान कोणत्या परिस्थितीत तुरुंगात राहत असेल, याचा विचार करून आपल्याला वाईट वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले. क्रिकेट खेळताना दोघांमध्ये मतभेद असले तरी पाकिस्तानला जिंकवणे हेच त्यांचे अंतिम लक्ष्य होते, असेही मियांदाद यांनी स्पष्ट केले.
दाऊद इब्राहिमसोबतच्या नात्यानेही गाजला होता
इमरान यांच्यासाठी भावूक झालेला मियांदाद यापूर्वी दाऊद इब्राहिमसोबतच्या कौटुंबिक नात्यामुळेही चर्चेत आले होते. मियांदादचा मुलगा जुनैद याचा विवाह दाऊद इब्राहिमची मुलगी महरुख हिच्याशी झाला आहे. २०२४ मध्ये एका पाकिस्तानी पत्रकाराच्या यूट्यूब चॅनेलवरील मुलाखतीत मियांदाद यांनी दाऊदला आपण दुबईच्या काळापासून ओळखत असल्याचे सांगितले होते. आपल्या मुलाचा विवाह दाऊदच्या मुलीशी झाल्याचा आपल्याला अभिमान असल्याचेही त्यांनी म्हटले होते.
इमरान यांच्या कुटुंबीयांनीही व्यक्त केली होती चिंता
इमरान खान यांच्या तुरुंगातील परिस्थितीवर त्यांच्या मुलांनीही यापूर्वी चिंता व्यक्त केली आहे. लॉर्ड्सवर पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यादरम्यान इमरानचा मुलगा कासिम याने एका मुलाखतीत आपल्या वडिलांना दिवसातील बहुतांश वेळ एकटं ठेवलं जात असल्याचा आरोप केला होता. तुरुंगात त्यांना इजा करण्याचा प्रयत्न होत असल्याची भीतीही त्याने व्यक्त केली होती. या मुलाखतीच्या प्रसारणावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संबंधित ब्रॉडकास्टरकडे नाराजी व्यक्त केली होती.
क्रिकेटविश्वातील दिग्गजांकडूनही चिंता
दरम्यान, इमरान खान यांच्या आरोग्याबाबत आणि तुरुंगातील परिस्थितीबाबत क्रिकेटविश्वातील काही दिग्गजांनी यापूर्वी चिंता व्यक्त केली आहे. भारताचे माजी कर्णधार कपिल देव आणि सुनील गावसकर, ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार ग्रेग चॅपेल तसेच पॅट कमिन्स यांच्यासह जगभरातल्या माजी कर्णधारांनी इमरान यांना योग्य वैद्यकीय सुविधा आणि सन्मान मिळावा, अशी मागणी एका पत्रकाद्वारे केली होती.
१९९२च्या विश्वचषकात पाकिस्तानला विजेतेपद मिळवून देताना इमरान खान आणि जावेद मियांदाद यांची भूमिका महत्त्वाची होती. मेलबर्न येथे झालेल्या अंतिम सामन्यात दोघांनी मिळून १३९ धावांची भागीदारी केली होती.

