Headlines

क्लासेसमध्ये 5 डिजिटल यंत्रणा गरजेच्या; लखनऊमधील 14 विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर पालकांनो आता तरी जागे व्हा!। Maharashtra Times


लखनऊमधील अलीगंज येथील कोचिंग सेंटरमध्ये लागलेल्या भीषण आगीत 14 निष्पाप विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या हृदयद्रावक दुर्घटनेने व्यावसायिक इमारतींच्या तांत्रिक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. केवळ पारंपरिक अग्निशामक साधनांवर अवलंबून न राहता ‘स्मार्ट स्मोक डिटेक्टर्स’ आणि ‘ऑटोमॅटिक डोअर अनलॉक सिस्टीम’ सारखे आधुनिक तंत्रज्ञान अशा दुर्घटना कशा रोखू शकते, यावर टाकलेला हा एक तांत्रिक प्रकाश.

Lucknow Tragedies । Maharashtra Times
सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)
लखनऊच्या तीन मजली इमारतीमधील कोचिंग सेंटरमध्ये लागलेल्या भीषण आगीत 14 निष्पाप विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. अग्निकांडात अनेक विद्यार्थ्यांनी जीव वाचवण्यासाठी खिडकीतून उड्या मारल्या. शॉर्ट सर्किट आणि आपत्कालीन रस्त्यांवरील अडथळे हे या मृत्यूंचे मुख्य कारण ठरले. आजच्या डिजिटल युगात कोचिंग क्लासेस आणि शैक्षणिक संस्थांमध्ये ‘एआय थर्मल कॅमेरे’ आणि ‘ IoT सुरक्षा गॅजेट्स’चे डिजिटल ऑडिट अनिवार्य कसे करावे, अशा कोणत्या गॅझेट्समुळे प्राण वाचले असते, याविषयीची माहिती पुढे सविस्तर टेक अँगलने जाणून घेऊया.

आजच्या डिजिटल युगात केवळ मॅन्युअल यंत्रणेवर अवलंबून न राहता ‘फायर सेफ्टी टेक्नॉलॉजी’ वापरणे का गरजेचे आहे, याविषयी जाणून घेऊया.

अशा दुर्घटना रोखू शकणारे ‘5 फायर सेफ्टी गॅजेट्स’

1. IoT -आधारित स्मार्ट स्मोक अलार्म

सामान्य अलार्म केवळ वाजतात, परंतु IoT (Internet of Things) अलार्म सिस्टीम इमारतीत धूर किंवा आग लागताच अवघ्या काही सेकंदांत स्थानिक अग्निशामक दल, पोलिसांचे नियंत्रण कक्ष आणि इमारतीच्या मालकांच्या मोबाईलवर ऑटोमॅटिक इमर्जन्सी मेसेज आणि लोकेशन पाठवते. यामुळे पहिल्या 5 मिनिटांतच मदत पोहोचू शकते.

2. AI थर्मल इमेजिंग कॅमेरे

आजकालचे प्रगत सीसीटीव्ही कॅमेरे केवळ रेकॉर्डिंग करत नाहीत, तर ते ‘थर्मल सेन्सर्स’द्वारे इमारतीमधील शॉर्ट सर्किट किंवा वायरमधील अतिउष्णता आधीच ओळखतात. तापमान मर्यादेपेक्षा वाढल्यास हे कॅमेरे मुख्य कंट्रोल रूमला धोक्याचा इशारा देतात.

3. ऑटोमॅटिक मॅग्नेटिक डोअर अनलॉक सिस्टीम

अशा अपघातांमध्ये अनेकदा गच्चीचे किंवा आपत्कालीन रस्ते कुलूप लावून बंद असल्याचे आढळते. तांत्रिक नियमांनुसार, कोचिंग सेंटर्समध्ये ‘फेल-सेफ’ मॅग्नेटिक लॉक्स असावेत. इमारतीचा मुख्य वीज पुरवठा खंडित होताच किंवा आगीचा अलार्म वाजताच हे चुंबकीय दरवाजे आपोआप अनलॉक होतात.

4. स्वयंचलित गॅस आणि वॉटर स्प्रिंकलर सिस्टीम

कंप्युटर लॅब किंवा सर्व्हर रूममध्ये शॉर्ट सर्किट झाल्यास तिथे पाण्याचा वापर करता येत नाही. अशा संवेदनशील ठिकाणी ‘Fm200’ सारख्या गॅस सप्रेशन सिस्टीम किंवा स्वयंचलित वॉटर स्प्रिंकलर्स लावणे गरजेचे आहे, जे धूर ओळखताच आपोआप पाण्याचा किंवा गॅसचा मारा करून आग जागेवरच दाबतात.

5. क्लाऊड-आधारित ऑक्युपन्सी ट्रॅकर

इमारतीत नेमके किती विद्यार्थी हजर आहेत, याचा आकडा त्वरित समजण्यासाठी ‘डिजिटल अटेंडन्स किंवा ऑक्युपन्सी ट्रॅकर’ आवश्यक आहे. आग लागल्यास ढिगाऱ्याखाली किंवा इमारतीत किती लोक अडकले आहेत, याची अचूक माहिती क्लाऊड डेटावरून अग्निशामक दलाला मिळते, ज्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन जलद होते.

शुभम कुलकर्णी

लेखकाबद्दलशुभम कुलकर्णीशुभम कुलकर्णी जवळपास 6 वर्षांपासून मराठी माध्यमांमध्ये काम करतोय. आकाशवाणी (छत्रपती संभाजीनगर) पासून माध्यम क्षेत्रात कामाला सुरुवात केली. एका मुखपत्रासह मुंबईतील नामांकित मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये ‘बुलेटिन प्रोड्यूसर’ म्हणून जबाबदारी सांभाळली. शुभमला राजधानी दिल्लीतही बातमीवर संस्कार करण्याची संधी मिळाली. राजकारण, व्यापार-उद्योग, क्रीडा, तंत्रज्ञान, ऑटो या विषयावर लिहायला त्याला आवडतं. निसर्गाच्या सानिध्यात बसायला, फावल्या वेळेत चित्रपट, वेब सिरीज पाहाण्याचा शुभमचा छंद आहे.आणखी वाचा