Headlines

पावसाने १७ षटके बुडवली त्याची भरपाई होणार! भारत-श्रीलंका कसोटीची वेळ बदलली; दुसऱ्या दिवशी सामना किती वाजता?


Ind vs SL 1st Test: भारत आणि श्रीलंका यांच्यातील गॉल कसोटीच्या दुसऱ्या दिवशीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. पहिल्या दिवशी २८८ धावांवर मजबूत स्थितीत असलेल्या टीम इंडियाची नजर आता मोठ्या धावसंख्येवर आहे. दुसऱ्या दिवशी पडिक्कल-पंतसमोर मोठी जबाबदारी असेल.

Galle Test Day 2 TIme
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या जात असलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या लढतीच्या दुसऱ्या दिवशीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. आज १५ ऑगस्ट रोजी सुरू झालेल्या या सामन्याच्या पहिल्या दिवशी दोन वेळा पावसाने हजेरी लावली होती, ज्यामुळे १७ षटके कमी टाकली गेली. या नुकसानीची भरपाई करण्यासाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने दुसऱ्या दिवशीचा सामना १५ मिनिटे आधी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

पहिल्या दिवशी सामन्याची वेळ सकाळी १०:०० वाजताची होती, मात्र आता दुसऱ्या दिवशीचा खेळ सकाळी ९:४५ वाजता सुरू होईल. तसेच, नुकसान भरून काढण्यासाठी दिवसभरात ९० ऐवजी ९८ षटके टाकली जातील.

Maharashtra TimesDevdutt Paddikal : देवदत्तचा सर्वात मोठा रेकॉर्ड! 150 वर्षांत कोणालाच जमलं नाही, ते पडिक्कलने करून दाखवलं; स्वातंत्र्यदिनी नेमकी कोणती कामगिरी?

भारताची नजर ६०० धावांवर

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाने गॉलच्या खेळपट्टीवर स्वतःला अत्यंत मजबूत स्थितीत आणून ठेवले आहे. गॉलमध्ये चौथ्या डावात फलंदाजी करणे नेहमीच कठीण असते, हे लक्षात घेत भारताने पहिल्याच दिवशी केवळ २ गडी गमावून २८८ धावांपर्यंत मजल मारली आहे. सामन्यावर आपली पकड पूर्णपणे घट्ट करण्यासाठी आणि श्रीलंकेला सामन्यातून बाहेर ढकलण्यासाठी भारतीय संघ दुसऱ्या दिवशी ६०० धावांचा टप्पा ओलांडण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

पडिक्कल आणि पंत सांभाळणार मोर्चा

पहिल्या दिवशी भारतीय डावाचे सर्वात मोठे आकर्षण युवा फलंदाज देवदत्त पडिक्कल ठरला. त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना १७८ चेंडूत १३१ धावांची ऐतिहासिक आणि नाबाद खेळी केली. दुसऱ्या दिवशी पडिक्कल भारतीय डावाला पुढे नेईल आणि त्याला साथ देण्यासाठी आक्रमक यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत क्रीझवर उपस्थित असेल. हे दोन्ही फलंदाज मिळून भारताला एका विशाल धावसंख्येवर पोहोचवण्याचा प्रयत्न करतील.

Maharashtra TimesIndia vs Sri Lanka : तिरंगा डौलात, स्कोअरबोर्ड जोमात! टीम इंडियाचा स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी श्रीलंकेविरुद्ध धुमाकूळ, 4 सुपरस्टार्सचा जलवा, दुसऱ्या दिवसाची रणनीती कशी असणार?

केएल राहुलच्या पुनरागमनाची शक्यता

पहिल्या दिवशी ७७ धावांवर रिटायर्ड हर्ट झालेला केएल राहुल दुसऱ्या दिवशी पुन्हा फलंदाजीला उतरण्याची दाट शक्यता आहे. क्रॅम्प्सचा सामना करत असलेल्या राहुलच्या फिटनेसमध्ये आता सुधारणा झाली आहे. दुसरीकडे, पहिल्या दिवशी विकेटसाठी तरसलेल्या श्रीलंकेच्या गोलंदाजांना दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीच्या सत्रात पुनरागमन करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे, कारण भारतीय फलंदाज खेळपट्टीवर पूर्णपणे स्थिरावलेले दिसत आहेत.