Billionaire Downfall Story: राणा कपूर येस बँकेचे संस्थापक, माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ होते, पण मग तुरुंगच त्यांचे दुसरे घर बनले. आपल्या पदाचा गैरवापर करून कुटुंबाला फायदा मिळवून दिल्याबद्दल आणि बँकेला मोठे नुकसान पोहोचवल्याबद्दल राणा कपूरवर खटले दाखल केले गेले असून एकेकाळी येस बँक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होती.

कुटुंबाच्या नावावर 4500 कोटींची संपत्ती
एकट्या भारतातच राणा कपूरच्या कुटुंबीयांच्या नावावर 4500 कोटींच्या मालमत्तेचे पुरावे सापडले आहेत. याशिवाय अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्समध्येही कपूर कुटुंबाच्या नावावर अनेक मालमत्ता आढळून आल्या आहेत. तसेच DHFL ला दिलेल्या 4450 कोटींच्या बदल्यात 600 कोटींची लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने एफआयआर दाखल केला आहे.
राणा कपूर कोण?
9 सप्टेंबर 1957 रोजी दिल्लीत जन्म आणि लहानाचे मोठे झालेले राणा कपूर एकेकाळी भारतातील सर्वात श्रीमंत बँकर म्हणून ओळखले जायचे. राणा कपूरला AIMA कडून मानद फेलोशिप, न्यू जर्सी येथील रटगर्स विद्यापीठाकडून राष्ट्रपती पदक आणि जी. बी. पंत कृषी विद्यापीठाकडून मानद फेलोशिप मिळाली.
बँकिंग क्षेत्रातील कारकीर्द
एमबीए पूर्ण केल्यानंतर 1980 मध्ये राणा कपूर बँक ऑफ अमेरिकेत व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झाले, जिथं त्यांनी 16 वर्ष काम केले. 1996 मध्ये ANZ ग्रिंडलेज इन्व्हेस्टमेंट बँक (एएनझेडआयबी) मध्ये महाव्यवस्थापक आणि कंट्री हेड म्हणून रुजू झाले, तर 2004 मध्ये राणा यांनी नातेवाईक अशोक कपूरसोबत येस बँकेची सह-स्थापना केली.
मुंबई हल्ल्यानंतर सुरू झाला वाद
26/11 रोजी मुंबईत झालेल्या दहशहतवाडी हल्ल्यात राणा कपूरचे येस बँकेचे सह-संस्थापक अशोक कपूर शाहिद झाले. यानंतर बँकेच्या मालकी हक्कावरून अशोकच्या पत्नी मधू आणि राणा यांच्यात तीव्र संघर्ष सुरू झाला. मधू यांना आपल्या मुलीसाठी बँकेच्या संचालक मंडळात स्थान हवं होतं, पण या वादामुळे बँकेचा पाया हळूहळू पोखरला गेला, ज्यामुळे बँक बिकट परिस्थितीत सापडली.
कर्ज वाटप बनले गळ्याचा फास
राणा कपूरने कर्ज वितरण आणि कर्जाची वसुली करण्यासाठी वेगळा मार्ग निवडला. येस बँकेने राणा कपूरच्या वैयक्तिक ओळखीच्या आधारावर व्यक्तींना कर्ज दिले. यामध्ये अनिल अंबानी ग्रुप, आयएल अँड एफएस, सीजी पॉवर, एस्सार पॉवर, रेडियस डेव्हलपर्स आणि मिनिस्टर ग्रुप यांसारख्या व्यावसायिक घराण्यांचा समावेश होता. पण हेच व्यावसायिक कर्जाची परतफेड करण्यात अपयशी ठरले, तेव्हा बँकेला मोठा धक्का बसला. 2017 मध्ये बँकेने 6,355 कोटींची कर्जे NPA किंवा बुडीत म्हणून वर्गीकृत केली, ज्यामुळे आरबीआयने बँकेवरील आपली पकड अधिक घट्ट केली.
राणा कपूरवर अनियमिततेचे आरोप
2018 मध्ये रिझर्व्ह बँकेने राणा कपूरवर कर्ज आणि ताळेबंदात अनियमितता केल्याचा आरोप केला व त्यांना बँकेचं अध्यक्षपदावरून जबरदस्तीने हटवले. बँकेच्या इतिहासात एखाद्या अध्यक्षाला अशा प्रकारे पदावरून हटवण्याची ही पहिलीच वेळ होती.
शेअर्स विकायची नामूशक्ती ओढवली
राणा कपूरना कधीच Yes बँकेचे शेअर्स विकायचे नव्हते. त्यांनी ट्विट केलेले की, “All good. I love Yes Bank. I will never sell my shares.” मात्र, ऑक्टोबर 2019 मध्ये त्यांचा आणि त्यांच्या समूहाचा हिस्सा 4.72% पर्यंत घसरला. 3 ऑक्टोबर रोजी वरिष्ठ समूह अध्यक्ष रजत मोंगा यांनी राजीनामा दिला.

