Commonwealth Games 2026 : कॉमनवेल्थ गेम्स २०२६ला अद्याप सुरुवात झालेली नसतानाच भारताचं एक पदक निश्चित झालं आहे. महिला बॉक्सिंगमधील लवलीना बोरगोहेनला ७५ किलो वजनी गटात थेट उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला आहे. त्यामुळे तिचं किमान कांस्यपदक निश्चित झालं असून, आता तिचं लक्ष्य सुवर्णपदकावर आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धेत जगभरातील तीन हजारांहून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेला अद्याप सुरुवात व्हायची आहे. मात्र, भारताच्या खात्यात एक पदक निश्चित झालं आहे. भारताची स्टार महिला बॉक्सर लवलीना बोरगोहेन हिला 75 किलो वजनी गटात बाय मिळाला आहे. त्यामुळे तिला थेट उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला आहे. उपांत्य फेरीत पोहोचल्यामुळे लवलीनाचं किमान कांस्य पदक निश्चित झालं आहे. त्यामुळे आता पुढील सामन्यात निकाल काहीही लागला तरी तिच्या गळ्यात पदक असणार आहे. या बातमीमुळे भारतीय क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. लवलीनाच्या कामगिरीमुळे इतर भारतीय खेळाडूंनाही प्रेरणा मिळण्याची शक्यता आहे.
लवलीनाचं पदक निश्चित कसं झालं?
लवलीना बोरगोहेनची उपांत्य फेरीतील लढत 31 जुलैला होणार आहे. या सामन्यात विजय मिळवल्यास ती थेट सुवर्णपदकाच्या लढतीत पोहोचेल. मात्र, पराभव झाला तरी तिचं कांस्य पदक निश्चित आहे. यामागे बॉक्सिंगमधील महत्त्वाचा नियम आहे. कॉमनवेल्थ गेम्स आणि ऑलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या दोन्ही बॉक्सरना कांस्य पदक दिलं जातं. तिसऱ्या क्रमांकासाठी स्वतंत्र सामना घेतला जात नाही. त्यामुळे लवलीनाला थेट उपांत्य फेरीत प्रवेश मिळाल्याने तिचं किमान कांस्य पदक पक्कं झालं आहे.
आता लवलीना बोरगोहेनची लढत 31 जुलैला तुवालूच्या टॅरोन ताफाकी हिच्याशी होणार आहे. 75 किलो वजनी गटातील या सामन्यात विजय मिळवल्यास लवलीना सुवर्णपदकासाठी अंतिम फेरीत पोहोचेल. अंतिम सामना जिंकल्यास तिच्या खात्यात सुवर्णपदक जमा होईल. अन्यथा तिला रजत पदकावर समाधान मानावं लागेल.
दरम्यान, या वजनी गटात पाचच स्पर्धक असल्याने दुसऱ्या उपांत्य फेरीतील एक खेळाडू निश्चित झाला आहे. इंग्लंडच्या मॅरी केट स्मिथला थेट उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला आहे. तिच्यासमोर कोण असेल, हे 27 जुलैच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यानंतर स्पष्ट होईल. या सामन्यात नायजेरियाची पॅट्रिशिया म्बाटा आणि जमैकाची शॅशोने वेब्स्टर आमनेसामने येणार आहेत. या लढतीतील विजेता 31 जुलैला मॅरी केट स्मिथविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना खेळेल. तथापि या स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. पण आणखीन ओपनिंग सेरेमनी झालेली नाही.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा