Whoi is asmita dey, commomwealth games 2026 : त्रिपुरातील एका सामान्य कुटुंबातून आलेल्या अस्मिता डेने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ज्युडोमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. तिचा प्रेरणादायी प्रवास जाणून घ्या.

धावण्याच्या ट्रॅकपासून ज्युडोच्या मॅटपर्यंत
अस्मिताचा जन्म २२ मार्च २००३ रोजी त्रिपुरातील बेलोनिया येथे एका साध्या कुटुंबात झाला. तिचे वडील अर्जुन कुमार डे सायकल दुरुस्तीचे काम करायचे. सुरुवातीला अस्मिताला धावण्याची आवड होती. ती ८०० मीटर शर्यतीत धावायची. पण एका प्रशिक्षकांनी तिला ज्युडो मध्ये लक्ष घालण्याचा सल्ला दिला आणि तिथूनच तिचे आयुष्य बदलले. दरम्यान, ज्युडो हा एक मार्शल आर्टचा (युद्धकला) प्रकार आहे.
बेलोनिया विद्यापीठ कोचिंग सेंटरमध्ये प्रशिक्षक बीना देबनाथ यांच्याकडे तिने सुरुवातीचे धडे घेतले. त्यानंतर त्रिपुरा स्पोर्ट्स स्कूलमध्ये माणिक लाल देब यांनी तिला मार्गदर्शन केले. शालेय स्पर्धा आणि ‘खेलो इंडिया’मधील तिच्या चांगल्या कामगिरीमुळे २०१८ मध्ये भोपाळच्या ‘साई’ (SAI) सेंटरमध्ये तिची निवड झाली. तिथे ज्येष्ठ प्रशिक्षक यशपाल सोलांकी यांनी तिला राष्ट्रीय स्तरासाठी तयार केले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर विजयाची घोडदौड
अस्मिता भारतीय ज्युडोपटू अवतार सिंग आणि जपानची स्टार खेळाडू उता आबे यांना आपला आदर्श मानते. २०२२ मध्ये थायलंडमध्ये झालेल्या आशियाई ज्युनिअर स्पर्धेत तिने आंतरराष्ट्रीय पदक जिंकले. अशी कामगिरी करणारी ती त्रिपुराची पहिली ज्युडोपटू ठरली.
त्यानंतर २०२३ मध्ये मकाऊ येथे झालेल्या ज्युनिअर आशिया कपमध्ये ४८ किलो वजनी गटात तिने सुवर्णपदक पटकावले. २०२५ मध्ये मोरोक्को येथे झालेल्या कॅसाब्लांका आफ्रिकन ओपन स्पर्धेत तिने तिचे पहिले वरिष्ठ आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक जिंकले.
ग्लासगोमध्ये रचला ऐतिहासिक सुवर्ण इतिहास
ग्लासगो येथील राष्ट्रकुल स्पर्धेची रात्र अस्मितासाठी खूप खास ठरली. ४८ किलो वजनी गटात खेळताना तिने उपांत्यपूर्व फेरीत स्कॉटलंडच्या ईव्हा ईविंगचा पराभव केला. त्यानंतर उपांत्य फेरीत समर शॉ या स्थानिक खेळाडूला हरवून तिने फायनल गाठली.
सुवर्णपदकाच्या अंतिम सामन्यात तिचा सामना कॅनडाच्या हायडी क्वाच हिच्याशी झाला. एका टप्प्यावर अस्मिता मागे पडली होती. पण तिने संयम गमावला नाही. सामना ‘गोल्डन स्कोअर’मध्ये गेला आणि तिथे अस्मिताने निर्णायक डाव टाकत भारतासाठी ज्युडोमधील पहिलेवहिले राष्ट्रकुल सुवर्णपदक जिंकले.
ही तर फक्त सुरुवात आहे
बेलोनियातील सायकल दुरुस्तीच्या दुकानापासून सुरू झालेला अस्मिताचा हा प्रवास ग्लासगोच्या सुवर्णपदकापर्यंत पोहोचला आहे. वय अवघे २३ वर्षे असल्याने आणि ऑलिम्पिक पदक हेच तिचे मुख्य ध्येय असल्याने, तिच्या यशाची ही तर फक्त सुरुवात आहे. ८०० मीटर धावणारी एक मुलगी आज भारतीय क्रीडा इतिहासात सुवर्ण अक्षरांनी आपले नाव कोरत आहे.

