Headlines

Water Breaking During Pregnancy Signs, symptoms, causes, remedies, PPROM & Emergency Symptoms; गर्भावस्थेत पाण्याची पिशवी फाटल्याची लक्षणे, संकेत, कारणे व उपाय


Pregnancy Water Leak Or Break : गर्भावस्थेच्या शेवटच्या टप्प्यात पाणी सुटणे ही प्रसूतीची महत्त्वाची सुरुवात असू शकते. मात्र, ते लघवी किंवा सामान्य योनिस्रावापेक्षा कसे वेगळे ओळखायचे, याची माहिती प्रत्येक गरोदर महिलेला असणे गरजेचे आहे. ॲम्निऑटिक द्रव रंगहीन किंवा फिकट पिवळसर असून त्याचा प्रवाह थांबवता येत नाही. पाणी सुटल्याची शंका आल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि स्वच्छ सॅनिटरी पॅडचा वापर करावा. हिरवे, तपकिरी किंवा रक्तमिश्रित पाणी, ताप, बाळाची हालचाल कमी होणे किंवा नाळ बाहेर येणे ही आपत्कालीन लक्षणे असून तातडीने रुग्णालय गाठणे आवश्यक आहे.

pregnancy water leak causes symptoms
pregnancy water leak causes symptoms
गर्भावस्थेच्या शेवटच्या आठवड्यांत प्रत्येक गरोदर महिलेच्या मनात एक अत्यंत सामान्य प्रश्न येतो “माझी पाण्याची पिशवी फाटली” (Water Broken) हे मला कसे कळेल?” चित्रपटांमध्ये दाखवल्याप्रमाणे अचानक भरपूर पाणी वाहू लागणे आणि लगेच हॉस्पिटलमध्ये पळापळ होणे, असे प्रत्यक्ष आयुष्यात प्रत्येक वेळी घडत नाही. पाण्याची पिशवी किंवा थैली फुटण्याची लक्षणे ओळखणे, त्यानंतर काय करावे हे समजून घेणे आणि आपत्कालीन परिस्थिती कधी निर्माण होते हे जाणणे माता आणि बाळ दोघांच्याही सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

‘पाण्याची पिशवी फुटणे’ म्हणजे काय आणि ते कसे ओळखावे?

'पाण्याची पिशवी फुटणे' म्हणजे काय आणि ते कसे ओळखावे?

गर्भावस्थेत बाळ गर्भाशयातील एका पिशवीत म्हणजेच ‘ॲम्निऑटिक सॅक’मध्ये (Amniotic Sac) वाढते, ज्यामध्ये ‘ॲम्निऑटिक द्रव’ (Amniotic Fluid – गर्भाशय द्रव) भरलेला असतो. हा द्रव बाळाचे बाहेरील आघातांपासून रक्षण करतो, संसर्गापासून वाचवतो आणि त्याची हालचाल व वाढ सुलभ करतो. जेव्हा ही पिशवी फुटते, तेव्हा हे पाणी योनिमार्गाद्वारे बाहेर येऊ लागते. यालाच वैद्यकीय भाषेत ‘मेंब्रेन्स रप्चर’ (Rupture of Membranes) किंवा पाण्याची पिशवी फुटणे म्हणतात.

पाण्याची पिशवी फुटली हे कसे ओळखावे?

पाण्याची पिशवी फुटली हे कसे ओळखावे?
  • रंग आणि वास : ॲम्निऑटिक द्रव सहसा रंगहीन किंवा फिकट पिवळसर असतो आणि त्याला तीव्र वास नसतो.
  • नियंत्रण नसणे : लघवीसारखे या द्रवाच्या प्रवाहावर महिलांचे नियंत्रण नसते. ते थांबवणे शक्य होत नाही.
  • लघवी आणि योनिस्रावातील फरक : गर्भावस्थेच्या शेवटच्या टप्प्यात मूत्राशयावर दाब वाढल्याने अनेकदा लघवी लीक होते. परंतु, मूत्राशय रिकामे केल्यानंतरही कपडे ओले होत राहिल्यास ते ॲम्निऑटिक द्रव असू शकते. तसेच, सामान्य योनिस्राव (Vaginal Discharge) हा घट्ट आणि चिकट असतो, तर ॲम्निऑटिक द्रव पाण्यासारखा पातळ असतो.

पाण्याची पिशवी फुटल्यावर त्वरित काय करावे?

पाण्याची पिशवी फुटल्यावर त्वरित काय करावे?

जर बाळाच्या अवतीभोवती असलेली पाण्याची पिशवी फुटली आहे असे तुम्हाला वाटत असेल, तर अजिबात घाबरून न जाता खालील गोष्टी करा:

  • नोंद ठेवा : द्रव बाहेर पडण्याची वेळ, त्याचा रंग, प्रमाण आणि वास याची नोंद घ्या. ही माहिती तुमच्या स्त्रीरोगतज्ज्ञांना योग्य निर्णय घेण्यास मदत करते.
  • काहीही आत घालू नका : योनिमार्गात टॅम्पॉन किंवा इतर कोणतीही वस्तू घालू नका. तसेच हा प्रवाह थांबवण्यासाठी कोणतेही घरगुती उपाय करू नका.
  • पॅड वापरा : द्रव शोषून घेण्यासाठी स्वच्छ सॅनिटरी पॅड (Sanitary Pad) वापरा.
  • डॉक्टरांशी संपर्क साधा : वेदना किंवा कळा सुरू नसतील, तरीही त्वरित तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा किंवा हॉस्पिटल गाठणे आवश्यक आहे. कारण पिशवी फुटल्याने बाळाभोवतीचे संरषक कवच कमी होते आणि प्रसूतीला उशीर झाल्यास संसर्गाचा धोका वाढतो.

३७ व्या आठवड्याआधी पाण्याची पिशवी लिक झाल्यास काय होते?

३७ व्या आठवड्याआधी पाण्याची पिशवी लिक झाल्यास काय होते?

जर गर्भावस्थेचे ३७ आठवडे पूर्ण होण्यापूर्वीच बाळाभोवतीची पाण्याची पिशवी फुलली तर त्याला वैद्यकीय भाषेत ‘प्रिटर्म प्रीलॅबर रप्चर ऑफ मेंब्रेन्स’ (PPROM) म्हणतात. अशावेळी त्वरित वैद्यकीय उपचारांची गरज असते.

  • धोके : वेळेआधी पाण्याची पिशवी फुटल्यामुळे गर्भाशयात संसर्ग होण्याचा, मुदतपूर्व प्रसूतीचा (Premature Birth) आणि बाळाला वैद्यकीय गुंतागुंत होण्याचा धोका वाढतो.
  • वैद्यकीय उपचार : गर्भावस्थेचा कोणता आठवडा सुरू आहे हे पाहून डॉक्टर रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतात. संसर्ग रोखण्यासाठी अँटीबायोटिक्स, बाळाच्या फुफ्फुसांची वाढ लवकर होण्यासाठी स्टिरॉईड्सची इंजेक्शन्स दिली जातात आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली योग्य वेळी प्रसूती केली जाते.

‘या’ गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

'या' गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

खालीलपैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास एका मिनिटाचाही विलंब न करता तातडीने आपत्कालीन वैद्यकीय मदत घ्यावी:

  • द्रवाचा रंग बदलणे : जर बाहेर येणारे पाणी हिरवे, तपकिरी किंवा रक्ताळलेले असेल, तर ते बाळाला पोटात त्रास होत असल्याचे (Fetal Distress) किंवा बाळाने पोटात विष्ठा (Meconium) केल्याचे लक्षण असू शकते.
  • संसर्गाची लक्षणे : तातापणे, थंडी वाजून येणे किंवा बाहेर पडणाऱ्या पाण्याला दुर्गंधी येणे.
  • बाळाची हालचाल कमी होणे : पोटात बाळाची हालचाल अचानक कमी होणे किंवा अजिबात न जाणवणे.
  • नाळ बाहेर येणे (Cord Prolapse) : योनिमार्गाच्या मुखाशी नाळ (Umbilical Cord) दिसणे किंवा काहीतरी बाहेर आल्यासारखे वाटणे.
  • तीव्र वेदना : योनिमार्गातून जास्त रक्तस्त्राव होणे किंवा पोटात असह्य वेदना होणे.

गरोदर महिलांसाठी महत्त्वाचा सल्ला

गरोदर महिलांसाठी महत्त्वाचा सल्ला

सामान्य प्रसूतीदरम्यान पाण्याची पिशवी फाटणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, त्यामुळे ती रोखण्याचा कोणताही निश्चित मार्ग नाही. तथापि, वेळेआधी पाण्याची पिशवी फाटण्याचा धोका कमी करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेता येते :

  • नियमित तपासणी : गरोदरपणाच्या सुरुवातीपासून नियमित अँटेनेटल चेक-अप (ANC) करा.
  • संसर्गावर उपचार : लघवीचा किंवा योनिमार्गाचा संसर्ग (UTI/Vaginal Infection) असल्यास तातडीने उपचार घ्या.
  • आरोग्यदायी जीवनशैली : चांगला आहार घ्या, भरपूर पाणी प्या आणि धूम्रपान/व्यसनांपासून दूर राहा.
    प्रत्येक गरोदरपण आणि प्रसूतीचा अनुभव वेगळा असतो. पाणी सुटणे म्हणजे लगेच काही मिनिटांत बाळ जन्माला येईलच असे नाही, परंतु ही प्रसूतीची प्रक्रिया सुरू झाल्याची महत्त्वाची पायरी आहे. द्रव लीक होत आहे की नाही याबद्दल शंका असल्यास इंटरनेटवरील सल्ल्यांवर अवलंबून न राहता किंवा वाट न पाहता त्वरित तुमच्या स्त्रीरोगतज्ज्ञांशी संपर्क साधा. शांत राहा, सतर्क राहा आणि वैद्यकीय सल्ल्याचे तंतोतंत पालन करा!
आम्ही या लेखाचे पुनरावलोकन कसे केले

आमची टीम आरोग्य आणि वेलनेसविषयी सतत नवे व उपयुक्त लेख तयार करते. प्रत्येक लेख वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने लिहिला जातो, त्यामुळे दिलेली माहिती विश्वासार्ह आणि अचूक असते.

  • नवीन आवृत्ती
  • Jul 23, 2026, 03:16 PMMedically Reviewed byDr. Richa Bharadwaj
  • Jul 23, 2026, 03:16 PMWritten byप्रतीक्षा सुनील मोरेमहाराष्ट्रटाइम्स.कॉम