Headlines

Jitendra Awhad Participate in CJP Protest in Delhi


कॉक्रोच जनता पार्टीला राजकीय नेतेमंडळींकडून मिळणारा प्रतिसाद वाढताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे आज दिल्लीत जंतरमंतर मैदानावर पोहोचले.

Jitendra Awhad
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नवी दिल्ली / ठाणे : नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि सर्व नगरसेवक सहभागी झाले. याप्रसंगी अभिजीत दिपके यांची भेट घेत जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच, महाराष्ट्रातील लढा आपणही ताकदीने लढू, असे आश्वासित केले.

नीट पेपर घोटाळाप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी सोनम वांगचूक आणि कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत जोरदार आंदोलन सुरू करण्यात आले आहे. २० जुलै रोजी या आंदोलकांवर जोरदार लाठीमार करण्यात आला. गुरूवारी या आंदोलनात जितेंद्र आव्हाड, मनोज प्रधान, ठाणे पालिकेचे विरोधी पक्ष नेते अशरफ शानू पठाण, गटनेते अभिजीत पवार, महिलाध्यक्ष मनिषा भगत यांच्यासह इतर नगरसेवकांनी सहभाग घेतला.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

जंतर मंतर मैदानावर जितेंद्र आव्हाड यांनी अभिजीत दिपके यांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी, विद्यार्थ्यांना हलक्यात घेऊ नका. या देशात विद्यार्थ्यांनीच क्रांती घडविली आहे. या देशात सर्वात ताकदवान असलेल्या इंदिरा गांधींना बिहार आणि गुजरातमधील विद्यार्थ्यांनीच हादरा दिला होता, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

विद्यार्थ्यांनीच १९७३ साली जयप्रकाश नारायण यांच्याकडे आंदोलनाचे नेतृत्व सोपविले होते. या आंदोलनानंतर आणीबाणी आणि पुढे इंदिरा गांधी यांना पायउतार व्हावे लागले होते. स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटीश सत्तेला सर्वात मोठा धक्का देणारे शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हेही विद्यार्थीच होते. आज देशात जे घडत आहे, त्याची हेटाळणी करणे ही इतिहासाची मोठी चूक ठरेल, असे जितेंद्र आव्हाड यांनी नमूद केले.

कॉक्रोच जनता पार्टीचा देशव्यापी आंदोलनाची हाक

दरम्यान, कॉक्रोच जनता पार्टीकडून 24 जुलैला देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. देशभरात विविध शहरांमध्ये उद्या नीट पेपरफुटीच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात वेगवेगळ्या शहरांमध्ये दररोज आंदोलने केली जात आहेत. मुंबईत तर जोरदार आंदोलने होत आहेत.

ठाकरे बंधूंची आंदोलनाची हाक

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 26 जुलैला एकत्र आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. या आंदोलनाकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे. ठाकरे बंधूंनी दिलेली आंदोलनाची हाक पाहता दिल्ली पाठोपाठ महाराष्ट्रातही वातावरण तापण्याची जास्त चिन्हं आहेत.