Headlines

US-Iran Peace Deal: कराराचे वर्तुळ| Maharashtra Times


शुक्रवारी स्वित्झर्लंडमध्ये अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करार होणार होता पण अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हॅन्स यांनी चर्चेतून माघार घेतल्यानंतर काही वेळातच रद्द करण्यात आला.

कराराचे वर्तुळ
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी युद्धबंदी करारावर केलेल्या स्वाक्षरीची शाई पुरती वाळण्याआधीच इस्रायलने लेबनॉनवरील हल्ले वाढवून युद्ध सुरू ठेवण्याचा आपला इरादा कृतीत आणला. युद्ध समाप्तीबाबत अमेरिका व इराण यांच्यात सहमती झाली असली, तरी इस्रायलची भूमिका पाहता या टापूत शांतता नांदण्याबाबत साशंकता होतीच. लेबनॉनच्या दक्षिण सीमेच्या आत इस्रायलने संरक्षण क्षेत्र तयार केले असून, तिथे त्याच्या फौजा आहेत. त्या तिथेच राहतील, या आपल्या वक्तव्याचा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी पुनरुच्चार केल्याने आणि अमेरिकेबरोबरील करारात लेबनॉनच्या सार्वभौमत्वाचा मुद्दा महत्त्वाचा असल्याची भूमिका इराणने घेतल्याने कराराच्या भवितव्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या कराराच्या अंमलबजावणीसाठी शुक्रवारी स्वित्झर्लंडमध्ये होणारी बैठक लांबणीवर पडल्याने आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी तिथे जाण्याचे तूर्त रद्द केल्याने हे प्रश्नचिन्ह आणखी ठळक होते. यामुळे आखातावरील संघर्षाची टांगती तलवार कायम राहिली आहे. कराराच्या अंमलबजावणीसाठी दमदार पावले टाकणे, इस्रायलला हल्ल्यांपासून परावृत्त करणे आणि हिजबुल्लाहसह अन्य दहशतवाद्यांना रोखणे हे यासाठीचे उपाय आहेत. पश्चिम आशियाच्या इतिहासातील गुंतागुंत, इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षाभोवती फिरणारे सामरिक डावपेच आणि प्रादेशिक सत्तासंघर्ष यांमुळे हे उपाय प्रत्यक्षात आणणे अवघड दिसते. असे असले, तरी अमेरिका आणि इराण यांच्यातील करार केवळ या टापूसाठी नव्हे, तर साऱ्या जगासाठी, इंधनकोंडी सुटण्यासाठी आणि अर्थव्यवस्थांवरील ताण कमी करण्यासाठी गरजेचे आहे. त्यामुळे स्वित्झर्लंडमधील बैठक शक्य तितक्या लवकर व्हायला हवी.

इराणच्या बहुतेक मागण्यांची दखल घेतल्याचे या कराराच्या मसुद्यावरून स्पष्ट होते. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याचा मुद्दा दोन्ही देशांसाठी, नव्हे तर जगासाठीच महत्त्वाचा होता; कारण वीस टक्के तेल वाहतूक येथून होते. त्यामुळे तेलपुरवठा सुरळीत होऊ शकेल आणि इंधनाची दरवाढ, तसेच महागाई कमी होऊ शकेल. या सामुद्रधुनीतील सर्व अडथळे अमेरिका तीस दिवसांत दूर करणार आहे, तर येथून वाहतुकीसाठी पहिले साठ दिवस इराण शुल्क आकारणार नाही. त्यानंतर मात्र तो ओमान आणि अन्य आखाती देशांशी वाटाघाटी करून निर्णय घेईल. इराणच्या अणुकार्यक्रमाचा मुद्दाही कळीचा होता. अण्वस्त्रनिर्मिती न करण्यास इराणने सहमती दर्शविली असली, तरी युरेनियम समृद्ध करण्याच्या आपल्या हक्कावर तो ठाम आहे. इराणने समृद्ध केलेल्या युरेनियमच्या साठ्याचे काय, हा प्रश्न होता. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या (आयएईए) देखरेखीखाली हे युरेनियम सौम्य करण्याचे इराणने करारात मान्य केले आहे. इराणवरील निर्बंध अमेरिकेने उठवल्याने तो आपले तेल अन्य देशांना विकू शकतो; परिणामी त्याची अर्थव्यवस्था सुधारू शकते. शिवाय इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका तीनशे अब्ज डॉलर देऊ करणार आहे. यास ट्रम्प अनुकूल नव्हते. मात्र, प्रादेशिक भागीदारांच्या मदतीने अमेरिका याची पूर्तता करेल; यामुळे इराणमध्ये गुंतवणूक होऊ शकते. त्याबरोबरच लेबनॉनचे ऐक्य आणि सार्वभौमत्व कायम राखण्याचा मुद्दा प्रादेशिक शांततेसाठी महत्त्वाचा आहे.

शंभरहून अधिक दिवस युद्ध करून अमेरिकेने काय साधले, हा प्रश्न उरतो. इराणमधील विद्यमान राजवट बदलण्यासह त्याचा अणुकार्यक्रम रोखणे, त्याची क्षेपणास्त्रे नष्ट करणे, लष्करी सामर्थ्य कमी करणे; तसेच हिजबुल्लाह, हमास, हुती या दहशतवाद्यांना पोसण्याचे त्याने थांबविणे आदी उद्दिष्टे समोर ठेवून अमेरिका आणि इस्रायलने हे युद्ध सुरू केले होते. त्याच्या आधी इराणी जनतेत असंतोष होता. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात ते रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे राजवट बदलण्यास मदत होईल, असा कयासही ट्रम्प यांचा होता. इराणच्या सर्वोच्च नेत्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची फळी या युद्धात मारली गेली हे खरे; परंतु विद्यमान राजवट कायम राहिली. इराणच्या क्षेपणास्त्रांवर मारा केला गेला; परंतु इराणनेही त्यास प्रत्युत्तर दिले. युरेनियमबाबतही इराण ठाम आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीचा शस्त्रासारखा वापरही त्याने केला. लेबनॉनच्या संरक्षणाचा मुद्दाही त्याने केंद्रस्थानी आणला. इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत अमेरिकेने २०१५मध्ये करार केला होता. ट्रम्प यांना तो मान्य नव्हता. आज पुन्हा नवा करार झाला असून, एक वर्तुळ पूर्ण झाले आहे.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा