Sikkim Tunnel Tragedy: प्राथमिक निरीक्षण असे की, सोमवारी दुपारी बोगद्यातील खडकांमध्ये संचय असलेल्या मिथेन वायूची अचानक मोठ्या प्रमाणात गळती होऊन स्फोट झाला. त्या स्फोटाने काही प्रमाणात भूस्खलन झाले.

विषारी वायूची गळती व भूस्खलन अशा दुहेरी संकटामुळे तेथे काम करीत असलेले कर्मचारी, अधिकारी यांना सुटकेसाठी वाव आणि वेळही मिळाला नसणार. या दुर्घटनेने सिक्कीमसह इतर ठिकाणच्या या प्रकारच्या प्रकल्पांबाबत विविध प्रश्न उपस्थित झाले आहेत; आणि अद्याप तरी, ‘या दुर्घटनेच्या आडून सिक्कीमला बदनाम करू नका’ अशी भाषा या राज्याचे मुख्यमंत्री प्रेमसिंह तामांग यांनी केलेली नाही! मुळात सिक्कीममध्ये जलविद्युत प्रकल्पांना होणारा विरोध जुनाच आहे. पर्यावरणाची हानी होत असल्याचा आक्षेप, स्थानिक संस्कृतीच्या मुळावर घाला घातला जाण्याची भीती ही त्यामागील प्रमुख कारणे आहेत.
विकासाचे जणू व्यसन लागलेल्या सध्याच्या काळात पर्यावरणातील ‘प’देखील काढणे म्हणजे अर्वाच्य टीकेला निमंत्रण. अशा स्थितीत पर्यावरणाचा मुद्दा उपस्थित होण्यासाठी अशी दुर्घटना घडावी लागते नि काही जणांना त्यात प्राण गमवावा लागतो, ही बाब दुर्दैवी म्हणावी लागेल. त्याचसोबत, इतक्या जोखमीच्या प्रकल्पांत बांधकामाच्या वेळी सुरक्षा नियम पाळले जातात अथवा नाही, हे बघणे नितांत गरजेचे. वरील प्रकल्पाबाबत बोलायचे तर, ‘नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे दिवसाचे काम सुरू करण्याआधी सोमवारी बोगद्यातील मिथेनसह इतर वायूंचे प्रमाण तपासण्यात आले होते,’ असे स्पष्टीकरण बांधकामाचे कंत्राट असलेल्या कंपनीने दिले आहे.
तपासात या स्पष्टीकरणाची निष्पक्ष शहानिशा होईल, अशी अपेक्षा. अशा प्रसंगांनंतर फिरून फिरून त्याच त्या प्रश्नावर साऱ्या चर्चा येऊन थांबतात… विकास महत्त्वाचा की पर्यावरण? सोपा बाळबोध प्रश्न समोर ठेवला की उत्तरही तसेच येणार. या बाळबोधपणाच्या पल्याडचे उत्तर शोधण्याची आपली तयारी आहे की नाही, हे महत्त्वाचे. सिक्कीमच्या दुर्घटनेने ते पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे

