Headlines

Sikkim Tunnel Tragedy: सिक्कीमच्या निमित्ताने… – 20 workers died in hydropower project tunnel collapse landslide accident in sikkim


Sikkim Tunnel Tragedy: प्राथमिक निरीक्षण असे की, सोमवारी दुपारी बोगद्यातील खडकांमध्ये संचय असलेल्या मिथेन वायूची अचानक मोठ्या प्रमाणात गळती होऊन स्फोट झाला. त्या स्फोटाने काही प्रमाणात भूस्खलन झाले.

sikkim1
सिक्कीम(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून दिल्लीत रण पेटलेले असताना सिक्कीममधील जलविद्युत प्रकल्पाच्या बांधकामाधीन बोगद्यात झालेली दुर्घटना कदाचित काहीशी दुर्लक्षित राहू शकते. त्यात किमान २० जणांनी प्राण गमावला. सिक्कीमच्या नामची जिल्ह्यात तीस्ता नदीवर राष्ट्रीय जलविद्युत मंडळाच्या (एनएचपीसी) तीस्ता स्टेज-६ जलविद्युत प्रकल्पाचे बांधकाम सध्या सुरू आहे. त्याच्या बोगद्यातील ही दुर्घटना.

विषारी वायूची गळती व भूस्खलन अशा दुहेरी संकटामुळे तेथे काम करीत असलेले कर्मचारी, अधिकारी यांना सुटकेसाठी वाव आणि वेळही मिळाला नसणार. या दुर्घटनेने सिक्कीमसह इतर ठिकाणच्या या प्रकारच्या प्रकल्पांबाबत विविध प्रश्न उपस्थित झाले आहेत; आणि अद्याप तरी, ‘या दुर्घटनेच्या आडून सिक्कीमला बदनाम करू नका’ अशी भाषा या राज्याचे मुख्यमंत्री प्रेमसिंह तामांग यांनी केलेली नाही! मुळात सिक्कीममध्ये जलविद्युत प्रकल्पांना होणारा विरोध जुनाच आहे. पर्यावरणाची हानी होत असल्याचा आक्षेप, स्थानिक संस्कृतीच्या मुळावर घाला घातला जाण्याची भीती ही त्यामागील प्रमुख कारणे आहेत.

विकासाचे जणू व्यसन लागलेल्या सध्याच्या काळात पर्यावरणातील ‘प’देखील काढणे म्हणजे अर्वाच्य टीकेला निमंत्रण. अशा स्थितीत पर्यावरणाचा मुद्दा उपस्थित होण्यासाठी अशी दुर्घटना घडावी लागते नि काही जणांना त्यात प्राण गमवावा लागतो, ही बाब दुर्दैवी म्हणावी लागेल. त्याचसोबत, इतक्या जोखमीच्या प्रकल्पांत बांधकामाच्या वेळी सुरक्षा नियम पाळले जातात अथवा नाही, हे बघणे नितांत गरजेचे. वरील प्रकल्पाबाबत बोलायचे तर, ‘नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे दिवसाचे काम सुरू करण्याआधी सोमवारी बोगद्यातील मिथेनसह इतर वायूंचे प्रमाण तपासण्यात आले होते,’ असे स्पष्टीकरण बांधकामाचे कंत्राट असलेल्या कंपनीने दिले आहे.

तपासात या स्पष्टीकरणाची निष्पक्ष शहानिशा होईल, अशी अपेक्षा. अशा प्रसंगांनंतर फिरून फिरून त्याच त्या प्रश्नावर साऱ्या चर्चा येऊन थांबतात… विकास महत्त्वाचा की पर्यावरण? सोपा बाळबोध प्रश्न समोर ठेवला की उत्तरही तसेच येणार. या बाळबोधपणाच्या पल्याडचे उत्तर शोधण्याची आपली तयारी आहे की नाही, हे महत्त्वाचे. सिक्कीमच्या दुर्घटनेने ते पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा