Headlines

Saorabh Choughule : ‘तू डोंबिवलीचं नाव घेतलंस, मराठी मुलगा शून्यातून वर आला आणि आज स्वतःला सिद्ध केलं’, अजिंक्य राहणेसाठी मराठी अभिनेत्याची खास पोस्ट


Saorabh Choughule : मराठी अभिनेता सौरभ चौघुलेनं अजिंक्य राहणेसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

Ajinkya Rahane
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – भारताच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या अजिंक्य रहाणेनं गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आता पुढे जाण्याची हीच योग्य वेळ आहे, असं त्यानं सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत म्हटलं. रहाणेनं २०१३ मध्ये सुरू झालेल्या आपल्या कारकिर्दीत भारतासाठी एकूण ८५ कसोटी, ९० एकदिवसीय आणि २० टी-२० सामने खेळले. मात्र, २०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध परदेशात झालेल्या कसोटी मालिकेनंतर तो भारतासाठी खेळलेला नाही. रहाणेनं इन्स्टाग्रामवर एक भावनिक व्हिडिओ शेअर करत म्हटलं की, ‘आज मला वाटतं की पुढे जाण्याची आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून माझी निवृत्ती जाहीर करण्याची हीच योग्य वेळ आहे.’ अजिंक्य राहणेच्या निवृत्तीनं सर्वांनाच धक्का बसला असून त्याचे चाहतेही भावूक झाले. अशातच आता मराठी अभिनेता सौरभ चौघुलेनंही अजिंक्यसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

सौरभ चौघुलेची पोस्ट

मराठी अभिनेता सौरभ चौघुले आणि अजिंक्य राहणे यांनी एकत्र क्रिकेटचं प्रशिक्षण घेतलं आहे. सौरभने संपूर्ण संघाचा फोटो शेअर करत लिहिलं की, ‘Hi अजिंक्य @ajinkyarahane…इतके वर्ष हा जपून ठेवलेला फोटो, मागच्या वर्षी कपाट साफ करताना सापडला. अपलोड करायची खूप इच्छा होती पण माहित नाही का, मी कधी केला नाही. आपण रेल्वे ग्राउंड आणि त्या नंतर डोंबिवली जिमखाना इथे एकत्र खेळलो. खातू सरांसोबत तांडेल सरांकडे शिकायची संधी मिळाली. तू लहान असताना पण नेहमी मोठ्या प्लेअर्सच्या नेटमध्ये प्रॅक्टिस करायचास आणि तुला बॉलिंग करायला द्यायला त्यांना सुद्धा खूप मजा यायची, कारण तू प्रत्येक बॉल बॅटने भिरकावून लावायचास.

Sachin Deshpande Interview : रिल्स स्टारमुळे आम्हाला कोणी विचारत नाहीये, सचिन देशपांडेंची खदखद

सौरभनं पुढे म्हटलं की, ‘आम्हाला नेहमी सांगितलं जायचं “अजिंक्य कडे बघा तो कसा खेळतोय, त्याला observe करा….” मी अजिबात चांगला खेळायचो नाही. जेव्हा क्लब लेव्हल किंवा स्टेट लेव्हल मॅचेस असायच्या तेव्हा तू १४ वर्षांचा होतास. तू अंडर १४ नाही तर नेहमी अंडर १९ मध्ये खेळायचास आणि तुझे बाबा आवर्जून तुझ्या प्रत्येक मॅचला हजर असायचे. मला आठवतंय 2011 मध्ये जेव्हा तू डेब्यू केलंस तेव्हा मी 23 वर्षांचा असेन आणि तू ही. जेव्हा पहिल्यांदा तुझं नाव ‘इंडियन टीम’ मध्ये आलं खूप खूप अभिमान वाटला तुझा, जास्त करून माझ्या आई बाबांना. तेव्हा एकदम टिपिकली मला आई बोली होती “बघ तो कुठे पोहचला नाहीतर तू!”

‘आज तुझा व्हिडिओ पाहिला आणि भरून आलं, खास करून जेव्हा तू डोंबिवलीचं नाव घेतलंस. एक मराठी मुलगा शून्यातून वर आला आणि त्याने आज स्वतःला सिद्ध केलं. आम्हाला तुझा खूप अभिमान आहे अजिंक्य. Thank you for every single innings you played. Every single Indian is proud of you…आणि मला एक डोंबिवलीकर म्हणून सगळ्यांपेक्षा थोडा जास्त अभिमान आहे!! ….आणि ह्याच फोटोत बरोबर मध्ये उभा असलेला टीम इंडियासाठी खेळलेला क्रिकेटरला तुम्ही ओळखलं का? (एक गोलंदाज)’ असं सौरभनं शेवटी म्हटलंय.