Sanjay Shejwal Struggle : मराठी अभिनेता संजय शेजवळनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्याचा संघर्षकाळ सांगितला आहे. तसेच अभिनेत्यानं सचिन पिळगांवकर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभवही सांगितलाय.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं स्थान मिळवण्यासाठी प्रत्येक कलाकार अथक परिश्रम करतात. काही कलाकार तर चांगली नोकरी सोडून अभिनयाकडे वळले आहेत. मात्र, त्यातही संघर्ष करून त्यांनी आपलं स्थान मिळवलं आहे. मराठी अभिनेता संजय शेजवळनंही मराठी इंडस्ट्रीत स्थान मिळवण्यासाठी खूप कष्ट केले. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये संजयनं त्याच्या संघर्षाबद्दल आणि पहिल्या मालिकेबद्दल सांगितलं आहे. तसेच सचिन पिळगांवकर यांच्यासोबतचा काम करण्याचा अनुभवही अभिनेत्यानं सांगितला आहे.
मुलाखतीदरम्यान संजय शेजवळ म्हणाला की, ‘आपल्या मराठी इंडस्ट्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे. घरून सपोर्ट खूप कमी असतो. मी एमएसाठी एज्युकेशन लोन घेतलेलं. त्यामुळे तिथूनच माझी सुरुवात झाली. मी नाट्यशास्त्रातून एमए केलं. जेव्हा शिक्षण पूर्ण झालं, तेव्हा माझ्यावर ७०-८० हजारांचं कर्ज होतं. आता पुढे करणार काय? असा प्रश्न असायचा. शिक्षणासाठी लोन घेतल्यामुळे दोन-तीन महिन्यांनी तेफेडायला सुरुवात करायची असं होतं.’
सतीश राजवाडे- चैत्राली गुप्ते यांचा कमबॅक, ‘पुढच्या शुक्रवारी सात वाजता’ नाटक कसं घडलं?
सचिन पिळगांवकरांनी दिला पहिला ब्रेक
संजय पुढे म्हणाला की, ‘नशिबानं मला सचिन पिळगांवकर यांनी पहिला ब्रेक दिला. ईटीव्हीला ‘काटा रुते कुणाला’ ही मालिका आली आणि ती जवळपास दोन-अडीज वर्ष चालली. त्या मालिकेतून मी माझं सगळं लोन फेडलं.’
सचिन यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव
याच मुलाखतीदरम्यान सचिन पिळगांवकर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगताना संजय म्हणाला की, ‘मी सचिन सरांना खूप फॉलो केलं. मला मिलिंद शिंदे सरांकडून ‘आम्ही सातपुते’ सिनेमाबद्दल समजलं. मग मी त्यांच्याकडून सचिन सरांचा नंबर घेतला आणि फोन केला. त्यांनी मला दोन आठवड्यांनी फोन करायला सांगितला. पुन्हा त्यांनी मला १० दिवसांनी फोन करायला सांगितला. अडीज महिन्यांनी मला त्यांच्या ऑफिसमधून फोन आला आणि मला बोलावलं. आमची मीटिंग झाली आणि त्यांनी मला ‘आम्ही सातपुते’ सिनेमाबद्दल सांगितलं. सगळ्यात लहान भावाची भूमिका माझी होती.’
Ananya Raj : लोकप्रिय अभिनेत्री अनन्या राजचं वयाच्या 28 व्या वर्षी निधन, कुटुंबीयांनी दिली माहिती, मृत्यूचं कारणही समोर ‘मी घरी निघाल्यावर पुन्हा त्यांच्या ऑफिसमधून फोन आला आणि त्यांनी मला बोलावलं. ऑफिसमध्ये गेल्यावर मला सांगितलं, सिनेमाचं शूटिंग थोडं पुढे जातंय. पण, आम्ही डीडी नॅशनलला ‘तू तोता मै मैना’ नावाची मालिका करतोय. त्या मालिकेसाठी सचिन सरांनी मला विचारलं. मी लगेच होकार दिला. त्यांनी मला कधीच माझी पहिली मालिका असल्याचं जाणवू दिलं नाही. सचिन सरांनी मला आत्मविश्वास दिला. ‘ असं संजयनं शेवटी सांगितलं.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा