Headlines

Ritu Narayan Zum Success Story ; पालकांच्या अडचणीतून तयार झाली व्यवसायाची संधी! आईच्या काळजीने उभा राहिला हजारो कोटींचा व्यवसाय, कोण आहेत रितू नारायण


मूळच्या भारतीय असणाऱ्या रितू नारायण अमेरिकेतल्या Zum या कंपनीच्या संस्थापिका आहेत. मुलांना शाळेत सोडण्यासाठी आणि शाळेतून घरी आणण्यासाठी होणारी अडचण, रितू यांच्यासाठी व्यवसायाची संधी ठरली. याच संधीतून त्यांनी हजारो कोटींचा व्यवसाय उभारला. मुळात, एका भारतीय महिलेने अमेरिकेत जाऊन उभारलेले हे साम्राज्य देशासाठी अभिमानास्पद बाब आहे. रितू यांनी नक्की कसा उभरला हा व्यवसाय? नक्की वाचा.

Ritu Narayan Zum Success Story
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जेव्हा पालक नोकरी करणारे असतात तेव्हा अनेकदा मुलांना वेळ देण्यासाठी पालक कमी पडतात. मनात इच्छा असूनही मुलांना वेळ देता येत नाहीत. याच समस्येने अमेरिकेतील Zum या कंपनीला जन्म दिला. विशेष म्हणजे अमेरिकेत हजारो कोटींचे साम्राज्य विस्तारीत असणारी कंपनी Zum च्या मालकीण भारतीय आहेत. रितू नारायण यांनी आपल्या मुलांना शाळेत सोडण्यात होणाऱ्या अडचणीमुळे नोकरी सोडून टाकली आणि चक्क व्यवसायच सुरू केला. आपल्या मुलांसाठी असणाऱ्या आईच्या काळजीने एका विशाल व्यावसायिक साम्राज्याला जन्म दिला.

रितू नारायण eBay या कंपनीत नोकरी करत होत्या. त्या कंपनीत महत्वाच्या पदावर होत्या. परंतु, नोकरीमुळे त्यांच्या मुलांना शाळेत ने-आण करण्यात मोठी अडचण होत होती. अशात अमेरिकेच्या बे परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे या अडचणीत मोठी वाढ झाली होती. दररोज या समस्येला तोंड देताना रितू यांना त्यांच्या बालपणीचे दिवस आठवले. त्यांच्या आईने मुलांच्या शिक्षणासाठी नोकरी सोडली होती. या विचाराने आता मलाही नोकरी सोडावी लागते की काय? असे त्यांना वाटू लागले. शेवटी मुलांच्या शिक्षणात कुठलाही व्यत्यय नको म्हणून रितू यांना नोकरी सोडावी लागली.

रितू यांनी नोकरी जरी सोडली तरी त्या वेळेला त्यांनी संधी म्हणून पाहणं पसंत केलं. त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यांना ठावूक होते की ज्या समस्यांना आपण तोंड देत आहोत त्याच समस्यांना तेथील अनेक पालक तोंड देत आहेत. रितू यांनी परिसरातील मुलांसाठी Liftee नावाची सेवा सुरू केली. शाळकरी मुलांना शाळेत सोडण्यासाठी आणि घरी आणण्यासाठी गाड्या उपलब्ध करून देण्याचा व्यवसाय होता. सुरुवातीच्या काळात स्वतः रितू देखील गाड्यांच्या चालक झाल्या. त्याकाळी परिसरातील एकूण 30 शाळांना ही सेवा पुरवण्यात येत होती.

या व्यवसायाला खरा वेग Covid च्या काळात मिळाला. रितू यांनी त्यांच्या दोन भावांसोबत सुरू केलेल्या या व्यवसायाला नवी दिशा मिळाली. या काळात त्यांनी पूर्ण शाळेची बस व्यवस्था हातळण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या व्यवसायाशी जोडलेल्या प्रत्येक पालकाच्या मोबाइलमध्ये नवीन सुविधा देण्यात आली. यातून कंपनीची बस कोणती?, बस चालक कोण आहे?, बस सध्या कुठे आहे? या सगळ्या प्रश्नांची माहिती पालकांना त्यांच्या मोबाइल फोनच्या माध्यमातून मिळू लागली. रितू यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी अनेक सुविधा तयार केल्या, त्यातून त्यांनी पालकांचा विश्वास जिंकला.

Maharashtra Times4 लाखांची कार घरी आणता-आणता पावणे 7 लाखांची होते, कधी विचार केलाय तुमच्या कष्टाचा पैसा कुठे जातो?रितू यांच्या कंपनीने आतापर्यंत 3,600 कोटी रुपयांची गुंतवणूक उभी केली आहे. कंपनीचे एकूण मूल्य सुमारे 14 हजार कोटी रुपये इतके आहे. कंपनीने 2025 साली केलेल्या एकूण कमाईचा आकडा पाहता त्यात 2024 च्या कमाईच्या तुलनेने 35% ची वाढ आहे. रितू यांनी बसचालकांची कमतरता आणि जुनी व्यवस्था याकडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलला. होणाऱ्या दैनंदिन अडचणीकडे त्यांनी व्यवसायची संधी म्हणून पाहिले. सध्या रितू यांची कंपनी अमेरिकेतील इतर राज्यांमध्ये विस्तार करण्याच्या प्रयत्नात आहे.

दिवेश चव्हाण

लेखकाबद्दलदिवेश चव्हाणदिवेश दिनेश चव्हाण हे मराठी पत्रकार असून ते सध्या महाराष्ट्र टाइम्स येथे कंटेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. ऑगस्ट 2026 पासून ते महाराष्ट्र टाइम्स येथे अर्थ, पर्सनल फायनान्स आणि देश-विदेशातील बातम्यांसंबंधित लेखन करत आहेत. शेअर बाजारातील घडामोडी, बँकिंग, नवे आर्थिक धोरण आणि तांत्रिक नियम अतिशय सोप्या भाषेत आणि सविस्तर पद्धतीने समजावून सांगणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

यापूर्वी ते नवराष्ट्र या मराठी वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून काम करत होते. या काळात त्यांनी अर्थ, व्यवसाय, करिअर आणि नोकरीसह विविध क्षेत्रातील घडामोडींचे वार्तांकन केले आहे. यासोबतच काल्पनिक कथा लेखन आणि एखाद्या कथेचे स्वारस्यपूर्ण विश्लेषण करण्यातही ते पटाईत आहेत.

त्यांचे शिक्षण ठाणे येथील जोशी बेडेकर महाविद्यालयात झाले. याच ठिकाणी त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्याकडे मास्टर ऑफ आर्ट्स इन मल्टीमीडिया अँड मास कम्युनिकेशन ही पदव्युत्तर पदवी आहे. विविध विषयांवर अचूक आणि विश्वासार्ह बातम्या पुरवणे हा त्यांच्या लेखन, पत्रकारितेच्या माध्यमातून वाचकांना दर्जेदार माहिती देऊन त्यांना जागतिक घडामोडींविषयी जागरुक ठेवणे हा त्यांचा हेतु आहे.
जोशी बेडेकर महाविद्यालयात शिक्षण घेत असताना महाविद्यालयीन वार्षिक अंक Rta मध्ये इंग्रजी रिपोर्टींग विभागाचे हेड म्हणून त्यांनी कारोभार सांभाळला आहे.आणखी वाचा