मूळच्या भारतीय असणाऱ्या रितू नारायण अमेरिकेतल्या Zum या कंपनीच्या संस्थापिका आहेत. मुलांना शाळेत सोडण्यासाठी आणि शाळेतून घरी आणण्यासाठी होणारी अडचण, रितू यांच्यासाठी व्यवसायाची संधी ठरली. याच संधीतून त्यांनी हजारो कोटींचा व्यवसाय उभारला. मुळात, एका भारतीय महिलेने अमेरिकेत जाऊन उभारलेले हे साम्राज्य देशासाठी अभिमानास्पद बाब आहे. रितू यांनी नक्की कसा उभरला हा व्यवसाय? नक्की वाचा.

रितू नारायण eBay या कंपनीत नोकरी करत होत्या. त्या कंपनीत महत्वाच्या पदावर होत्या. परंतु, नोकरीमुळे त्यांच्या मुलांना शाळेत ने-आण करण्यात मोठी अडचण होत होती. अशात अमेरिकेच्या बे परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे या अडचणीत मोठी वाढ झाली होती. दररोज या समस्येला तोंड देताना रितू यांना त्यांच्या बालपणीचे दिवस आठवले. त्यांच्या आईने मुलांच्या शिक्षणासाठी नोकरी सोडली होती. या विचाराने आता मलाही नोकरी सोडावी लागते की काय? असे त्यांना वाटू लागले. शेवटी मुलांच्या शिक्षणात कुठलाही व्यत्यय नको म्हणून रितू यांना नोकरी सोडावी लागली.
रितू यांनी नोकरी जरी सोडली तरी त्या वेळेला त्यांनी संधी म्हणून पाहणं पसंत केलं. त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यांना ठावूक होते की ज्या समस्यांना आपण तोंड देत आहोत त्याच समस्यांना तेथील अनेक पालक तोंड देत आहेत. रितू यांनी परिसरातील मुलांसाठी Liftee नावाची सेवा सुरू केली. शाळकरी मुलांना शाळेत सोडण्यासाठी आणि घरी आणण्यासाठी गाड्या उपलब्ध करून देण्याचा व्यवसाय होता. सुरुवातीच्या काळात स्वतः रितू देखील गाड्यांच्या चालक झाल्या. त्याकाळी परिसरातील एकूण 30 शाळांना ही सेवा पुरवण्यात येत होती.
या व्यवसायाला खरा वेग Covid च्या काळात मिळाला. रितू यांनी त्यांच्या दोन भावांसोबत सुरू केलेल्या या व्यवसायाला नवी दिशा मिळाली. या काळात त्यांनी पूर्ण शाळेची बस व्यवस्था हातळण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या व्यवसायाशी जोडलेल्या प्रत्येक पालकाच्या मोबाइलमध्ये नवीन सुविधा देण्यात आली. यातून कंपनीची बस कोणती?, बस चालक कोण आहे?, बस सध्या कुठे आहे? या सगळ्या प्रश्नांची माहिती पालकांना त्यांच्या मोबाइल फोनच्या माध्यमातून मिळू लागली. रितू यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी अनेक सुविधा तयार केल्या, त्यातून त्यांनी पालकांचा विश्वास जिंकला.
4 लाखांची कार घरी आणता-आणता पावणे 7 लाखांची होते, कधी विचार केलाय तुमच्या कष्टाचा पैसा कुठे जातो?रितू यांच्या कंपनीने आतापर्यंत 3,600 कोटी रुपयांची गुंतवणूक उभी केली आहे. कंपनीचे एकूण मूल्य सुमारे 14 हजार कोटी रुपये इतके आहे. कंपनीने 2025 साली केलेल्या एकूण कमाईचा आकडा पाहता त्यात 2024 च्या कमाईच्या तुलनेने 35% ची वाढ आहे. रितू यांनी बसचालकांची कमतरता आणि जुनी व्यवस्था याकडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलला. होणाऱ्या दैनंदिन अडचणीकडे त्यांनी व्यवसायची संधी म्हणून पाहिले. सध्या रितू यांची कंपनी अमेरिकेतील इतर राज्यांमध्ये विस्तार करण्याच्या प्रयत्नात आहे.

