मुंबई -पुणे आणि मुंबईकडे प्रवास करणार आहात तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.. राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई–पुणे मार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून रस्ते आणि रेल्वे या दोन्ही सेवा विस्कळीत झाल्या आहेत.
अतिवृष्टीमुळे मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील नव्याने सुरू करण्यात आलेल्या मिसिंग लिंक परिसरात दरड कोसळली आहे. तसेच जुन्या द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाजवळ आणि खालापूर टोल नाक्याजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. याशिवाय जुन्या मुंबई–पुणे महामार्गावरही दरड कोसळल्याने हा मार्गही वाहतुकीसाठी अनुपलब्ध झाला आहे.
रेल्वे वाहतुकीलाही पावसाचा मोठा फटका बसला आहे. पुणे–मुंबई लोहमार्गावरील ठाकूरवाडी परिसरात दरड कोसळल्यामुळे रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. या घटनेमुळे मुंबई–पुणे रेल्वे मार्गावरील अनेक गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले असून आतापर्यंत १६ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर ६ गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
महामार्ग आणि रेल्वे हे दोन्ही मार्ग बंद असल्याने पोलीस आणि प्रशासनाने अत्यावश्यक कारणाशिवाय मुंबई–पुणे प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. हवामानाची परिस्थिती लक्षात घेता पुढील काही तास नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
