मुंबई – इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार होऊन गेले आहेत, ज्यांनी त्यांच्या काळात प्रचंड लोकप्रियता मिळवली, पण वृद्धापकाळात त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. अशीच एक दुःखद आणि धक्कादायक कहाणी आहे दाक्षिणात्य अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक मोहन शर्मा यांची. एकेकाळी तमिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटसृष्टीत आपलं वर्चस्व असलेले मोहन शर्मा आता चेन्नईतील एका वृद्धाश्रमात विस्मृतीत आणि आजारपणात जीवन जगत आहेत. ज्या माणसानं अनेक चित्रपटांची निर्मिती केली आणि शंभरहून अधिक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारली, तो आता आपल्या वैद्यकीय खर्चासाठीसुद्धा इतरांवर अवलंबून आहे.
मोहन शर्मा केवळ एक अभिनेतेच नव्हते, तर एक फोटोग्राफरसुद्धा होते. आपल्या यशस्वी कारकिर्दीत त्यांनी जवळपास २० चित्रपटांची निर्मिती केली आणि १०० हून अधिक चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेता म्हणून काम केलं. त्यांनी विविध भाषांमधील ५० हून अधिक चित्रपटांमध्ये व्यक्तिरेखाही साकारल्या. तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड या चारही भाषांमध्ये चित्रपटांची निर्मिती करणारे ते पहिले निर्माते ठरले. त्यांनी ‘साऊथ इंडियन फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स’चे अध्यक्ष म्हणूनही काम केलं. ‘चट्टाकारी’ (१९७४), ‘नेल्लो’ (१९७४), ‘सागर संगमम’ (१९८३), ‘सुलभ’ आणि ‘फ्रेंड्स’ (२००१) यांसारख्या अनेक यशस्वी आणि अविस्मरणीय चित्रपटांमध्ये त्यांनी आपली छाप पाडली.
मोहन शर्मा यांनी द्विभाषिक चित्रपट ‘ग्रामम/नम्मा ग्रामम’ची निर्मिती केली, तेव्हा त्यांची परिस्थिती खालावू लागली. या चित्रपटाला समीक्षकांची प्रशंसा मिळाली आणि अनेक राष्ट्रीय व राज्य पुरस्कारही मिळाले, परंतु हा सिनेमा व्यावसायिकदृष्ट्या पूर्णपणे अयशस्वी ठरला. चित्रपटाचा खर्च त्याच्या बजेटपेक्षा खूप जास्त झाला. अंदाजे १.२५ कोटींचं बजेट २ कोटींहून अधिक झालं. चित्रपटाचे थिएटरमधील प्रदर्शन, प्रसिद्धी आणि पोस्टर्सचा खर्च भागवण्यासाठी मोहन शर्मा यांना मोठं कर्ज घ्यावं लागलंं. हे कर्ज फेडण्यासाठी, त्यांना त्यांची संपत्ती विकावी लागली.
आर्थिक अडचणींसोबतच मोहन यांना आजरपण आलं. पायामध्ये गाठ झाल्यानं त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आणि त्यामुळे ते चालू शकत नव्हते. इतकंच नाही, तर लिगामेंट फाटल्यामुळे झालेल्या उपचारांवर आणि शस्त्रक्रियेवर ४-५ लाख रुपये खर्च आला. आता मोहन यांना डायबीटीस झाला असून त्यांना दररोज इन्सुलिनचं इंजेक्शन घ्यावं लागतं. केवळ औषधांवरच दरमहिना सुमारे ३५,००० रुपये खर्च येतो. आर्थिक परिस्थिती अधिक खालावल्यानंतर मोहन यांच्या मित्रांनी त्यांना वृद्धाश्रमात राहण्याचा सल्ला दिला.
मोहन शर्मा यांचं वैयक्तिक आयुष्यही चढ-उतारांनी भरलेलं आहे. त्यांनी १९७५ मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री लक्ष्मीसोबत लग्न केलं, पण १९८० मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. नंतर त्यांनी शांती नावाच्या महिलेशी लग्न केलं. पत्नी आणि मेहुण्यामधील वादामुळे त्यांना पत्नीच्या नावावर असलेल्या अपार्टमेंटमधून बाहेर पडावं लागलं. मेहुण्याच्या दबावामुळे त्यांना घटस्फोटाची नोटीससुद्धा पाठवण्यात आली. मोहन यांना एक मुलगा असून जो जर्मनीमध्ये राहतो. तो वडिलांना आर्थिक मदत करू शकत नाही. मोहन यांचा मुलगा त्यांची काळजी घेण्यासाठी भारतात येण्यास तयार होता, मात्र लेकाच्या करिअरसाठी त्यांनी नकार दिला.
संकटाच्या काळात रजनीकांत देवदूत ठरले
रजनीकांत यांनी मोहन यांना आर्थिक मदत केली. मोहन शर्मा म्हणाले, ‘रजनीकांत माझ्या आयुष्यात देवासारखे आले. त्यांनी माझा स्वाभिमान वाचवला. जगासाठी ते सुपरस्टार असतील, पण माझ्यासाठी ते साक्षात देव आहेत.’
मुख्यमंत्री विजय यांच्याकडून मदतीची आशा
सध्या नातेवाईक आणि मित्रांकडून मिळणाऱ्या तुटपुंज्या आर्थिक मदतीवर उदरनिर्वाह करणाऱ्या मोहन शर्मा यांनी आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्या टीमकडे मदतीसाठी आवाहन केलं आहे. मोहन शर्मा म्हणाले की, ते विजय यांना गेल्या २५ वर्षांपासून ओळखतात आणि त्यांच्या चित्रपटांमध्ये कामही केलं आहे.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा