Ajinkya Rahane News : भारताची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी म्हणावी तशी चांगली नाही. गेल्या दोन वर्षांमध्ये भारताने घरच्या मैदानांवर खेळतानाही पराभवाचा सामना केला आहे. संघाच्या कामगिरीवर आता नुकतीच क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेल्या अजिंक्य रहाणेने चिंता व्यक्त केली आहे. तो नेमकं काय म्हणाला?
मुंबई : भारताचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणेने गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. निवृत्तीनंतर प्रथमच एका पॉडकास्टमध्ये बोलताना त्याने भारतीय कसोटी संघाच्या सध्याच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केली. कसोटी क्रिकेटमध्ये मजबूत मानसिकता, अनुभवी खेळाडू आणि संयम यांची कमतरता जाणवत असल्याचं रहाणेने सांगितलं. गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर भारताला मायदेशात सलग दोन कसोटी मालिकांमध्ये क्लीन स्वीपचा सामना करावा लागल्याच्या पार्श्वभूमीवर त्याचं हे वक्तव्य चर्चेत आलं आहे.
‘भारतीय कसोटी क्रिकेटची चिंता वाटते’
‘स्टिक टू क्रिकेट’ पॉडकास्टमध्ये रहाणे म्हणाला, “मी गेली दोन वर्षे कसोटी क्रिकेट खेळलेलो नाही. त्यामुळे घरी बसून भारतीय संघाचे सामने पाहत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर मनोबल मजबूत पाहिजे आणि त्याचबरोबर स्पर्धात्मक क्रिकेटचा अनुभव आवश्यक असतो.”
तो पुढे म्हणाला, “मला कसोटी क्रिकेटची चिंता वाटते. गेल्या दोन-तीन वर्षांत जे घडलं, ते पाहता वरिष्ठ खेळाडूंना संघात टिकवून ठेवणं आणि त्यांचा आदर करणं खूप महत्त्वाचं आहे. भारतात अनेक वरिष्ठ खेळाडूंनी एकाचवेळी निवृत्ती घेतल्यामुळे संघासमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे.”
रहाणेच्या मते, आजच्या क्रिकेटमध्ये संयम कमी होत चालला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये दीर्घकाळ खेळपट्टीवर टिकून राहणं आणि कठीण सत्रांमधून संघाला बाहेर काढणं हे मोठं कौशल्य आहे. मात्र, सध्याच्या पिढीत ही गोष्ट कमी प्रमाणात दिसत असल्याचं त्याने सांगितलं.
वरिष्ठ खेळाडूंची गरज अधोरेखित
भारतीय संघात आता १०० कसोटी सामने खेळलेला एकही क्रिकेटपटू नाही. रवींद्र जडेजा आणि केएल राहुल हेच सर्वाधिक अनुभवी खेळाडू आहेत. यावर रहाणे म्हणाला, “कसोटी क्रिकेटमध्ये ७ ते ८ अनुभवी आणि २ ते ३ युवा खेळाडूंचं योग्य मिश्रण असणं गरजेचं आहे. सध्या संघात बहुतेक खेळाडू नवीन आहेत. अनुभवी क्रिकेटपटूंची कमतरता स्पष्टपणे जाणवत आहे.”
मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरबाबत बोलताना रहाणे म्हणाला की, “मी त्यांच्यासोबत खेळलो आहे. मात्र ते प्रशिक्षक असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्याची संधी मला मिळाली नाही.”
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा