या शिष्याच्या ठिकाणी इतकी असीम गुरूभक्ती असते की, गुरूच्या उपयोगी पडणाऱ्या सगळ्या वस्तू मीच होईन, असं तो म्हणतो. ‘श्रीगुरूंचे घर, उंबरे, दार सारं काही मीच होईन. गुरूंची झारी हातात घेणारा शागीर्द होईन.

स्वामी विवेकानंद यांची एक गोष्ट सांगतात. एकदा ते नदीकिनारी उभे होते. त्यांना एकाने विचारलं, ‘स्वामीजी, जीवनात गुरूचं स्थान काय?’ स्वामीजी म्हणाले, ‘समोरची होडी पाहा, नदीपार व्हायला तिला किती वेळ लागेल?’ तो म्हणाला, ‘एक तास.’ स्वामीजी म्हणाले, ‘हीच होडी दुसऱ्या मोठ्या बोटीला जोडली तर?’ तो म्हणाला, ‘पंधरा मिनिटांत ती नदीपलीकडे जाईल.’ विवेकानंद म्हणाले, ‘गुरू हा त्या मोठ्या बोटीसारखा असतो. क्षणात तो तुमची नौका पार करतो.’ किती सार्थ आहे हे वचन! म्हणून आई-वडील, वडीलबंधू, माउली आणि सर्व गुरूंना माझं वंदन. ‘ज्ञानेश्वरी’तून काय घ्यावं? असंख्य गोष्टी आहेत. यांपैकी एक महत्त्वाचा गुण ‘गुरुनिष्ठा’ होय. निवृत्तिनाथ हे ज्ञानदेवांचे वडीलबंधू आणि गुरू होत. त्यांच्याविषयी काय आणि किती बोलू ही ज्ञानियांची भावना. प्रत्येक अध्यायात याचा अनुभव येतो. तेराव्या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला ज्ञानी भक्ताचं वर्णन करतात. अशा भक्ताच्या ठिकाणी गुरुसेवा हा गुण असतो. याचं विवेचन करताना ज्ञानदेवांच्या वाणीला, लेखणीला जणू पाझर फुटतो. गुरुभावाने ओथंबलेल्या त्या ओव्या वाचताना आपलं हृदयही उचंबळून येतं. वानगीदाखल त्यातील काही कल्पना आपण पाहू या. ‘मी गुरूंच्या पादुका होऊन, त्या गुरूंच्या पायात मी लेववीन; आणि छत्रही मीच होऊन ते गुरूंवर धरीन.’
‘पाउवा (पादुका) मी होईन।
तिया मीचि लेववीन।
छत्र मी, आणि करीन।
बारीपण (छत्र धरणे) ॥
या शिष्याच्या ठिकाणी इतकी असीम गुरूभक्ती असते की, गुरूच्या उपयोगी पडणाऱ्या सगळ्या वस्तू मीच होईन, असं तो म्हणतो. ‘श्रीगुरूंचे घर, उंबरे, दार सारं काही मीच होईन. गुरूंची झारी हातात घेणारा शागीर्द होईन. त्यांना चूळ भरण्यास पाणीही देईन आणि गुरूंची चूळ टाकण्याचं तस्तही (भांडं) मीच होईन.’ काय हा सेवाभाव! हा ‘शिष्या’चा प्रवासही आहे. बाह्य साधनांनी गुरूची सेवा करता करता त्यांच्यात सामावून जाण्याचा हा प्रवास आहे. ज्ञानदेव तो इतक्या उत्कटतेने चित्रित करतात, कारण त्यांचं अंतःकरण ह्या समर्पण भावाने भरून गेलं आहे. हा भाव… ही नम्रता आपल्या अंतरंगाचाही ठाव घेते. भोवतालच्या ‘अहं’भावाच्या जगात वाट दाखवते आत्मप्रकाशाची!

