Headlines

Ganesh Idols :गणपती बाप्पाला सुद्धा द्यावं लागणार फिटनेस सर्टिफिकेट ? गणेशोत्सव मंडळांमध्ये चिंतेचं वातावरण; मुंबई महापालिकेचं स्पष्टीकरण


Ganesh Idols: भुलेश्वर येथे घडलेली भुलेश्वर राजा मूर्तीच्या अपघाताची घटना ही गणेशभक्तांच मन हेलावून टाकणारी होती.या घटनेनंतर अनेक कारणांचे तर्क लावण्यात आले.यांमुळे गणेशमूर्तींच काम, उंची , आगमनासाठी वापरण्यात येणारी व्यवस्था यांवर आता निर्बंध येणार , मूर्तींच फिटनेस सर्टिफिकेट द्याव लागणार अशा चर्चां सुरू झाल्या मात्र यावर मुंबई महापालिकेने आपली भूमिका स्पष्ट केली.

फिटनेस सर्टिफिकेट
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.विशेष प्रतिनिधी,मुंबई:भुलेश्वर येथील मूर्तीच्या अपघातानंतर आता गणेशमूर्तींचे ‘ फिटनेस सर्टिफिकेट ’ आवश्यक असल्याची चर्चा सुरू झाल्यामुळे मुंबईतील गणेशोत्सव मंडळांमध्ये मंगळवारी चिंतेचे वातावरण होते.

‘फिटनेस सर्टिफिकेट’संभ्रम

या ‘फिटनेस सर्टिफिकेट’बाबत काहीच माहिती नसल्याने गणेशोत्सव समितीकडे प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली होती. मात्र गणेशमूर्तींसाठी ‘फिटनेस सर्टिफिकेट’ अनिवार्य करण्याबाबत कोणतेही निर्देश दिलेले नाहीत, असे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या प्रमाणपत्राबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर झाला आहे.

चर्चा सोशल मीडियावर सुरू

एक टनापेक्षा अधिक वजनाच्या गणेशमूर्तींसाठी फिटनेस प्रमाणपत्र बंधनकारक होणार, तसेच मूर्तीच्या जडणघडणीपासून वितरणापर्यंतची माहिती नोंदविणे आवश्यक राहील, अशा चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या होत्या. त्यामुळे हे फिटनेस सर्टिफिकेट नेमके काय, ते कुठून घ्यायचे, मूर्ती पूर्ण तयार झाल्यानंतर सांगाड्याची तपासणी कशी होणार, तपासणीसाठी कोण येणार आणि अर्ज कुठे करायचा, अशा प्रश्नांची सरबत्ती गणेशोत्सव समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे सुरू झाली होती.

गणेशभक्तांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

मात्र, महापालिकेने अशा कुठल्याही प्रकारच्या प्रमाणपत्राबाबत कोणतेही निर्देश दिले नसल्याचे स्पष्ट केले. ‘महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर गणेशमूर्तींसाठी फिटनेस प्रमाणपत्राबाबत कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे मंडळांनी आणि गणेशभक्तांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये’, असे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी सांगितले.

Maharashtra TimesMumbai News : भांडुपमध्ये दहाव्या मजल्यावरुन नवविवाहिता पडली, पण झाडावर अडकून बचावली; मांडीत फांदी घुसली, फायर ब्रिगेडने कौशल्याने उतरवलं

मुंबईतील जवळपास ५० टक्के गणेशमूर्ती मंडपांमध्ये पोहोचल्या

अखिल सार्वजनिक उत्सव समितीचे उपाध्यक्ष अमित कोकाटे यांनीही मंडळांच्या अडचणींकडे लक्ष वेधले. ‘मुंबईतील जवळपास ५० टक्के गणेशमूर्ती मंडपांमध्ये पोहोचल्या आहेत. अशा वेळी आता फिटनेस तपासणी कशी करणार, असा प्रश्न मंडळांकडून सातत्याने विचारला जात होता’, असे त्यांनी सांगितले. पूर्ण घडलेल्या मूर्तीतील वेल्डिंग कसे तपासणार, मोठ्या मूर्तींचे वजन कसे मोजणार आणि तपासणीसाठी कोणत्या यंत्रणेकडे जायचे, अशा अनेक शंका मंडळांनी उपस्थित केल्याचेही त्यांनी नमूद केले.

Maharashtra TimesDevendra Fadnavis :पुणे-चाकण परिसरात उद्योगांना बळ ; २,३२० कोटींची गुंतवणूक,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला विश्वास व्यक्त

प्रश्न मंडळे आणि मूर्तिकारांकडून उपस्थित

मूर्तींचे फिटनेस सर्टिफिकेट मिळवले तरी रस्त्यांची खात्री कोण देणार, असा प्रश्न मंडळे आणि मूर्तिकारांकडून उपस्थित करण्यात आला. मूर्ती यथायोग्य घडवण्याची जबाबदारी मूर्तिकार घेतात; मात्र मूर्ती ने-आण करताना रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे धोका निर्माण होतो. त्यामुळे रस्ते खड्डेमुक्त असतील, याची किमान पाच वर्षांची हमी द्यावी, अशी मागणी मूर्तिकार सिद्धेश दिघोळे यांनी केली.

समर्पक शब्दप्रयोग हवा

आयत्या वेळी असे निर्णय घेतले जाऊ नयेत,अशी अपेक्षाही मंडळांनी व्यक्त केली. तसेच, ‘गणेशमूर्तींचा फिटनेस’या शब्दप्रयोगाबाबतही काही मंडळे आणि गणेशभक्तांनी नाराजी व्यक्त केली. सणाचे पावित्र्य राखणारा अधिक समर्पक शब्दवापरला जावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.आणखी वाचा