Nagpur Airport : डॉ. बाबसाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास हा ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरीटीच्या सुरक्षा मंजुरीअभावी थांबला आहे. त्यामुळे विकासकामे रखडली आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म.टा. प्रतिनिधी, नागपूर: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विमानतळाच्या संपूर्ण विकासाचे काम २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य निर्धारित केले आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमीन मुद्रीकरणाची प्रक्रियाही सध्या वेगात सुरू आहे. मात्र, प्रकल्पाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच बीसीएएसच्या मंजुरीसाठी लागणारा वेळ पाहता, हे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. सद्यस्थितीत हा विलंब नागपूर विमानतळाच्या प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा ठरत आहे.
महत्त्वाच्या प्रस्तावांना अद्याप सुरक्षा मंजुरी नाही
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बहुप्रतीक्षित विकासकामांना ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीच्या (बीसीएएस) सुरक्षा मंजुरीअभावी ब्रेक लागला आहे. विमानतळ व्यवस्थापनाची जबाबदारी जीएमआर समूहाने स्वीकारून दोन महिने उलटून गेले असले तरी महत्त्वाच्या प्रस्तावांना अद्याप सुरक्षा मंजुरी न मिळाल्याने प्रत्यक्ष पायाभूत विकासकामांना सुरुवात होऊ शकलेली नाही, अशी माहिती आहे.
विकासासाठी कंपनीने निविदाही काढल्या
जीएमआर समूहाने २५ जून रोजी नागपूर विमानतळाचा कारभार अधिकृतपणे हाती घेतला. यानंतरच्या पहिल्या दोन महिन्यांतच विमानतळाला नव्या आणि जागतिक दर्जाच्या स्वरूपात विकसित करण्याच्या कामांना सुरुवात होईल, अशी दाट अपेक्षा होती. पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कंपनीने निविदाही काढल्या आहेत.
मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळाचे डिझाइन, विकास आराखडा आणि सुरक्षेशी संबंधित अनेक महत्त्वाचे प्रस्ताव बीसीएएसच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. जोपर्यंत या प्रस्तावांना अंतिम मंजुरी मिळत नाही, तोपर्यंत निविदांना अंतिम स्वरूप देऊन प्रत्यक्ष काम सुरू करता येणार नाही.
निविदा आणि सुरक्षा मंजुरीला होणाऱ्या या प्रशासकीय विलंबाचा मुद्दा जुलै महिन्यामध्ये ‘खासगी विमानतळ संचालकांच्या संघटने’नेही उपस्थित केला होता. विमानतळ विकासासारख्या प्रकल्पांमध्ये डिझाइन आणि सुरक्षेची खात्रीकरणे अत्यंत आवश्यक असते, मात्र मंजुरी प्रक्रियेतील संथपणामुळे विकासकामांच्या वेळापत्रकावर परिणाम होत आहे.
लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.
कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.
महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.
२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.… आणखी वाचा